मस्तानी तलाव पर्यटन केंद्र करणार - विजय शिवतारे

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 4 मे 2018

फुरसुंगी - ऐतिहासिक मस्तानी तलावाच्या खोलीकरणामुळे जलसाठवण क्षमता वाढून परिसरातील गावांचा पाणी प्रश्न मिटणार असून, या तलावाचे लवकरच पर्यटन केंद्र करणार असल्याची घोषणा जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी केली. 

फुरसुंगी - ऐतिहासिक मस्तानी तलावाच्या खोलीकरणामुळे जलसाठवण क्षमता वाढून परिसरातील गावांचा पाणी प्रश्न मिटणार असून, या तलावाचे लवकरच पर्यटन केंद्र करणार असल्याची घोषणा जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी केली. 

पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) वतीने वडकी येथील मस्तानी तलावातील गाळ काढून खोलीकरण करण्याच्या कामाची सुरवात शिवतारे यांच्या हस्ते झाली. या वेळी ते बोलत होते. पीएमआरडीएचे आयुक्त किरण गित्ते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. वडकीच्या सरपंच सुनंदा आंबेकर, शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख उल्हास शेवाळे, जिल्हा परिषद सदस्य दिलीप यादव, महाराष्ट्र केसरी दत्ता गायकवाड, दिलीप गायकवाड, सुनील गायकवाड, सचिन मोडक, सर्जेराव गायकवाड, अमित गुरव, अमोल गायकवाड, रामदास मोडक, सचिन गायकवाड, संतोष मोडक, कार्यकारी अभियंता एस. बी. देवढे यासह ग्रामस्थ उपस्थित होते. 

या तलावातील गाळ काढून त्याची जलसाठवण क्षमता वाढवण्याची मागणी येथील ग्रामस्थ अनेक वर्षांपासून करत होते. खोलीकरण झाल्यास दिवेघाटाच्या डोंगरावरून पावसाळ्यात वाहून जाणारे पाणी तलावात साठल्याने वडकी, उरुळी देवाची, फुरसुंगी या गावांचा पाणी प्रश्न मिटणार आहे. एक पोकलेन मशिन, दोन डंपरच्या माध्यमातून गाळ काढला जात आहे. परिसरातील उद्योजक, ग्रामस्थांनीही या कामासाठी स्वत-ची मशिनरी उपलब्ध करून देणार असल्याचे सांगितले. केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून सुमारे दहा कोटींचा निधी मिळवून त्यातून तलावाचे पर्यटनस्थळ करणार असल्याचे शिवतारे यांनी सांगितले.

Web Title: Mastani lake tourism center