esakal | माथेरानमधील अश्वांना मिळाला चारा; ‘सकाळ रिलीफ फंडाच्या आवाहनास प्रतिसाद

बोलून बातमी शोधा

Sakal Relief Fund

माथेरानमधील अश्वांना मिळाला चारा; ‘सकाळ रिलीफ फंडाच्या आवाहनास प्रतिसाद

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे - लॉकडाउनमुळे माथेरान येथील पर्यटन बंद असल्याने तेथील चारशे साठ अश्वांचे चाऱ्याशिवाय हाल होऊ लागले होते. माथेरानमध्ये एप्रिल ते जून या तीन महिन्यांत पर्यटक पर्यटनासाठी येत असतात. येथील निसर्गरम्य स्थळे उंचावर असून, सर्व भाग डोंगराळ असल्याने पर्यटकांची वाहने त्या ठिकाणी पोचू शकत नाहीत. त्यामुळे पर्यटकांकडून वाहतुकीसाठी अश्वांचा वापर केला जातो.

माथेरान हे ठिकाण रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात येते. कर्जत व माथेरान परिसरात आदिवासी, कातकरी समाज मोठ्या प्रमाणात आहे. या समाजातील लोक अश्व पाळून माथेरानच्या ठिकाणी पर्यटक वाहतुकीचा व्यवसाय करतात. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील वर्षी व यावर्षीसुद्धा माथेरान परिसरातील पर्यटन बंद आहे. त्यामुळे अश्वपालकांचा घोडेसफारी हा व्यवसाय बंद असल्याने उत्पन्नाचा मार्ग बंद झाला होता. त्यामुळे घोड्यांच्या खुराकावर खर्च करणे अश्वपालकांना शक्य होत नव्हते. त्यामुळे तेथील चारशे साठ अश्वांच्या चाऱ्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला होता.

हेही वाचा: Pune Corona Update: कालच्यापेक्षा आज अधिक रुग्ण; दगावणाऱ्यांची संख्याही वाढली

सकाळ रिलिफ फंडाच्या पदाधिकाऱ्यांनी तेथील परिस्थितीचे गांभीर्य ओळखून, माथेरान परिसरातील अश्वांना चारा उपलब्ध होण्यासाठी दानशूर व्यक्तींना व संस्थांना मदतीचे आवाहन केले होते. या आवाहनास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. अनेक व्यक्तींनी व संस्थांनी प्रत्यक्ष अश्वांचा चारा व खाद्य खरेदी करून माथेरान परिसरातील चारशे साठ अश्वांना चाऱ्याचे व खाद्याचे वाटप केले. पुणे शहरातील व्यावसायिक व जीवरक्षा ॲनिमल वेल्फेअर संस्थेचे मनोज ओसवाल यांनी दोन लाख रुपये किमतीच्या पन्नास किलो खाद्याच्या दोनशे बॅगचे वाटप केले. यावेळी जीवरक्षा ॲनिमल वेल्फेअर संस्थेचे सुनील कदम, माथेरान अश्व संघटनेच्या आशा कदम व मुलवासी अश्वपाल संस्थेचे भगवान चांचे उपस्थित होते.