मावळातील धरणांच्या साठ्यात घट

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 10 एप्रिल 2019

वडिवळे, आंद्रात समाधानकारक साठा
नाणे मावळातील वडिवळे धरणातून वडगाव, इंदोरी, कामशेत, टाकवे बुद्रूक आदी गावांसह सुमारे १५ ग्रामपंचायती, टाकवे औद्योगिक वसाहत तसेच सुमारे अकराशे हेक्‍टर शेतीसाठी पाणीपुरवठा केला जातो. धरणातून आठवड्यातून दोन दिवस १२० ते १५० दशलक्ष लिटर पाणी सोडले जाते. कुंडलिका नदीच्या माध्यमातून ते इंद्रायणीला सोडले जाते. सध्या धरणात ०.५७ टीएमसी (५२.६८ टक्के) पाणीसाठा आहे. तो जुलै ते ऑगस्टपर्यंत पुरेल, अशी माहिती शाखा अभियंता मनोहर खाडे यांनी दिली.

वडगाव मावळ - सध्या तापमान ४० अंशावर असल्याने मावळ तालुक्‍यातील सर्व धरणांच्या पाणीसाठ्यात दिवसेंदिवस घट होत आहे. त्यामुळे संभाव्य पाणीटंचाई टाळण्यासाठी, तसेच पावसाळ्यापर्यंत धरणातील पाणीसाठा टिकवून ठेवण्यासाठी पाणीकपात व काटकसरीने वापर करणे गरजेचे बनले आहे.

मावळ तालुक्‍यात पवना, वडिवळे, आंद्रा, जाधववाडी, कासारसाई ही पिण्याचे पाणी, शेती व उद्योगाला पाणीपुरवठा करणारी महत्त्वाची धरणे आहेत. त्यात प्रामुख्याने पवना धरण सर्वांत मोठे असून, त्यातून पिंपरी-चिंचवड, देहूरोड, तळेगाव ही शहरे, पिंपरी-चिंचवड व मावळमधील औद्योगिक वसाहती, संत तुकाराम कारखाना, मावळ तालुक्‍यातील पन्नास ते साठ ग्रामपंचायतीच्या पाणी योजना व शेतीसाठी पाणीपुरवठा केला जातो. यापैकी एकट्या पिंपरी-चिंचवड शहराला वर्षभरात सुमारे ६० टक्के पाणीपुरवठा केला जातो. सध्या धरणात ३.१८ टीएमसी (३७.३४ टक्के) पाणीसाठा आहे. गेल्या वर्षी या तारखेपर्यंत ४५ टक्के साठा होता. 

सप्टेंबरमध्ये परतीचा पाऊस न झाल्याने धरणातील पाणीसाठ्यात घट झाली आहे. 

पिंपरी-चिंचवड शहरासाठी धरणातून रोज सुमारे ५०० दशलक्ष लिटर पाणी सोडले जाते. यंदा पाणीसाठा कमी असल्याने ४४० दशलक्ष लिटरच पाणी घ्यावे, अशी सूचना पाटबंधारे विभागाने ऑक्‍टोबरमध्ये केली होती. परंतु, त्याची अंमलबजावणी झाली नाही. १५ मार्चपासून ४७० दशलक्ष लिटर एवढेच पाणी रोज सोडण्यात येत आहे. 

पवना धरणाचे शाखा अभियंता ए. एम. गदवाल व तळेगाव उपविभागाचे उपअभियंता ए. आर. शेटे यांनी सांगितले की, सध्याच्या कडक उन्हाळ्यामुळे दिवसेंदिवस पाणीसाठा कमी होत आहे. सध्या धरणात असलेला पाणीसाठा १५ जूनपर्यंत पुरेल. संभाव्य पाणीटंचाई टाळण्यासाठी व पाणीसाठा २५ जुलैपर्यंत पुरविण्यासाठी धरणातून रोज ४४० दशलक्ष लिटर पाणी सोडण्याची अंमलबजावणी होणे आवश्‍यक आहे. तसेच नागरिकांनी पाण्याची काटकसर करण्याची गरज आहे. धरणाच्या पाण्यातून यंदा विक्रमी म्हणजे ५४ कोटी रुपयांचा महसूल मिळाले.

आंद्रातून २२ संस्थांना पाणी
आंदर मावळातील आंद्रा धरणातून तळेगाव नगरपरिषद, तळेगाव एमआयडीसी, आळंदी नगरपरिषद आदी २२ संस्थांना पाणीपुरवठा केला जातो. धरणातून दोन ते तीन आठवड्यातून २०० ते ५०० दशलक्ष लिटर पाणी सोडले जाते. आंद्रा नदीच्या माध्यमातून हे पाणी इंद्रायणीत सोडले जाते. सध्या धरणात १.८९ टीएमसी (६४.८० टक्के) पाणीसाठा असून तो येत्या जुलैअखेरपर्यंत पुरेल अशी माहिती शाखा अभियंता ए. आर. हांडे यांनी दिली.

जाधववाडीत ५४ टक्के साठा
पूर्व भागातील जाधववाडी धरणातून पंचक्रोशीतील गावांना पिण्यासाठी व शेतीसाठी पाणी पुरवठा केला जातो. सध्या धरणात ५४ टक्के एवढा पाणीसाठा असल्याची माहिती शाखा अभियंता नारायण गदादे यांनी दिली.

Web Title: Maval Dam Water Storage Decrease Summer Temperature