मावळ तहसीलदारांना पंधरा लाखांचा दंड 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 11 सप्टेंबर 2019

आदेशाकडे दुर्लक्ष करीत कामात पुन्हा दिरंगाई केल्याप्रकरणी मावळचे तहसीलदार, लोणावळा नगरपरिषद तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ व पाटबंधारे विभागाला राष्ट्रीय हरित लवादाने दणका दिला आहे. वेळेत अहवाल सादर न केल्याने दंड ठोठावला आहे.

लोणावळा : आदेशाकडे दुर्लक्ष करीत कामात पुन्हा दिरंगाई केल्याप्रकरणी मावळचे तहसीलदार, लोणावळा नगरपरिषद तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ व पाटबंधारे विभागाला राष्ट्रीय हरित लवादाने दणका दिला आहे. वेळेत अहवाल सादर न केल्याने दंड ठोठावला आहे. 

लोणावळा-भुशी येथील सर्व्हे क्रमांक 24 येथील व्यावसायिक प्रकाश पोरवाल यांनी इंद्रायणी नदीपात्रात भराव टाकून बांधकाम केले. याप्रकरणी सुरेश पुजारी, आशिष शिंदे यांनी राष्ट्रीय हरित लवादाकडे दाद मागितली. याची राष्ट्रीय हरित लवादाच्या नवी दिल्लीतील खंडपीठापुढे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणी सुरू आहे. 
लवादाने या जागेची पाहणी करण्यासाठी 27 फेब्रुवारीला आदेश दिला. मावळ तहसीलदार, पाटबंधारे विभाग, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, नगरपरिषदेचे नगर अभियंता यांची संयुक्त समिती स्थापण्याचे निर्देश दिले. नोडल एजन्सी म्हणून नगरपरिषदेची नियुक्ती केली. समितीच्या सदस्यांना याबाबत अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते. परंतु, अहवाल सादर न झाल्याने लवादाने नगरपरिषदेला तीन महिन्यांपूर्वी पाच लाखांचा दंड ठोठावला होता. मात्र, त्यानंतरही समितीने कुठलाही अहवाल सादर न झाल्याने लवादाचे न्यायमूर्ती एस. पी. वांगडी, डॉ. नगीन नंदा यांनी संबंधितांना एकत्रित पंधरा लाख रुपयांचा दंड पंधरा दिवसांत केंद्रीय प्रदूषण मंडळाकडे भरण्याचे आदेश दिले आहेत. 

....अन्यथा अधिकाऱ्यांकडून दंड 
पुढील तारखेपर्यंत अहवाल सादर न केल्यास संबंधित अधिकाऱ्यांच्या खिशातून दंड वसूल करण्याचे आदेश राष्ट्रीय हरित लवादाने दिले आहेत. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maval tahsildar fined 15 lakh