मेकॅनिकल इंजिनिअर ते चित्रकार! | Artist | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Deepak Londhe
मेकॅनिकल इंजिनिअर ते चित्रकार!

मेकॅनिकल इंजिनिअर ते चित्रकार!

पुणे - काही कारणामुळे नोकरी गेली होती. नव्या नोकरीच्या शोधात असताना, कोरोनाची भयंकर लाट सुरू झाली. अन् एका दिवसाच्या लॉकडाउननंतर महिनाभराचे लॉकडाउन जाहीर झाले. काय करावे सुचत नव्हते. ताण वाढू लागल्याने सहज चित्र रेखाटण्याचा प्रयत्न केला. चित्र इतके छान झाले की, सर्वांनी कौतुक केले. बहिणीने चित्र काढण्याचा आग्रह केला. यातूनच उपजत चित्रकला बहरू लागली. रेखाटलेले चित्र बघून अनेकांनी स्वतःचे चित्र काढून देण्याची विनंती केली. चित्र आवडू लागल्याने न मागता पैसे मिळू लागले. नोकरी गेल्यामुळे पैसे कोठून आणायचे हा प्रश्न मिटला. ही कहाणी कोणत्या चित्रपटाची नाही, तर एका तरुणाची आहे.

कलेमुळे पोटाची व्यवस्था होऊ शकते. याची ज्या तरुणाला प्रचिती आली. तो म्हणजे दीपक लोंढे. त्याची ही गोष्ट असून चित्रकलेमुळे त्याला नवी ओळख मिळाली आहे, असे तो सांगतो. दीपक खराडीत राहात असून तो मेकॅनिकल इंजिनिअर आहे. त्याला लहानपणापासून चित्र काढण्याची आवड आहे. शालेय जीवनानंतर त्याने कधी पेन्सिल अथवा ब्रश हातात घेऊन चित्र रेखाटले नव्हते. मात्र, इंजिनिअरिंगला प्रवेश घेतल्याने विशिष्ट आकारात आरेखन करावे लागत होते. त्याने त्याच गोष्टींचा उपयोग चित्र काढण्यासाठी केला.

हेही वाचा: पुणे जिल्ह्यात गुरुवारी २४९ नवे कोरोना रुग्ण

दीपक सांगतो, ‘‘पहिले चित्र माझ्या मुलाचे काढले. त्याचे डोळे, कान आणि चेहऱ्याची आकृती रेखीव आल्याने ते हुबेहूब दिसून आले. त्यामुळे आपणही छान चित्र काढू शकतो, असा आत्मविश्‍वास वाटू लागला. सराव म्हणून दिवंगत माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे अब्दुल कलाम, पोलिस अधिकारी विश्‍वास नांगरे पाटील, छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदी दिग्गजांची चित्रे रेखाटली. सोशल मीडियामुळे अधिक प्रसिद्धी मिळाली.’’

लॉकडाउनमुळे सर्वच बंद होते, त्यामुळे लग्नाच्या वाढदिवसानिमित्ताने बायकोला काय भेटवस्तू द्यावी, असा प्रश्न माझ्या मित्राला पडला होता. त्यावर उपाय म्हणून त्याने त्यांच्या लग्नातला एक फोटो मला पाठवला. त्याने हुबेहूब चित्र काढण्यासाठी सांगितले. त्या दोघांचे उत्तम चित्र रेखाटले. ते बघून दोघेही आनंदी झाले. कष्टाचे चीज म्हणून त्यांनी न मागता माझा खात्यावर पैसे पाठवले. तीच माझी पहिली कमाई होती.’’

आता उत्तम चित्र रेखाटता येते. यासाठी ना कोणी मार्गदर्शन केले, ना कोणते प्रशिक्षण घेतले. आता अनेकजण मला चित्र काढून देण्याची मागणी करतात. त्यातून कलेचे रूपांतर व्यावसायात केले आहे.

- दीपक लोंढे

loading image
go to top