औषधे खल्लास ; सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांच्या अधिष्ठात्यांचाही आक्रोश

योगीराज प्रभुणे
रविवार, 29 जुलै 2018

औषध खरेदीची प्रक्रिया सुरू आहे. काही औषधांच्या पुरवठ्याचे आदेश कंपन्यांना दिले आहेत; तर पुढील महिनाभरात आणखी शंभर औषधांचा पुरवठा करण्याचा आदेश दिला जाणार आहे. वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन विभागानेही औषध खरेदीसाठी निधी उपलब्ध करून दिला आहे. 
-डॉ. आर. एम. कुंभार, महाव्यवस्थापक, हापकीन संस्था 

पुणे : रुग्णाच्या जखमेवर लावायला पट्ट्या नाहीत की, इंजेक्‍शन टोचायला सिरिंग्ज नाहीत... अँटिबायोटिक्‍स, पेनकिलर तर फार दूरची गोष्ट... हा आक्रोश कोणत्याही सरकारी रुग्णालयातील रुग्णाचा नाही की, त्याच्या नातेवाइकांचा; तर तो आहे राज्यातील वेगवेगळ्या सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांच्या अधिष्ठात्यांचा! 

राज्यातील सार्वजनिक आरोग्य उपकेंद्रे, प्राथमिक आरोग्य केंद्रांपासून जिल्हा रुग्णालयांपर्यंत प्रत्येक स्तरावर औषधांचा खडखडाट झाला आहे. या पार्श्‍वभूमीवर राज्यातील चौदा सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांशी संलग्न रुग्णालयांमधील औषधसाठ्याच्या स्थितीची माहिती "सकाळ'ने घेतली. त्यासाठी वैद्यकीय महाविद्यालयांच्या अधिष्ठात्यांशी संपर्क साधला. त्या वेळी अधिष्ठात्यांचा हा आक्रोश कानावर आला. 

आम्ही पत्करतो रुग्णांचा रोष 

रुग्णालयात येणाऱ्या गरीब रुग्णांना औषधे लिहून द्यावी लागत आहेत. सुरवातीला रुग्णाचे नातेवाईक औषधे आणतातही; पण खर्च वाढेल, तसा त्यांचा संयम सुटतो. त्यातूनच जखमेला लावायला पट्ट्या आणि इंजेक्‍शन सिरिंग्जदेखील नाहीत. त्यामुळे रुग्णांचा रोष आता उपचार करणाऱ्या डॉक्‍टरांवर येत आहे, असे वेगवेगळ्या अधिष्ठात्यांनी सांगितले. 

सरकारने औषधे पुरविली नाहीत 

"सरकारने औषधे पुरविली नाहीत, तर देणार कुठून', असा संतप्त सवाल काही अधिष्ठात्यांनी केला. सरकारने पुरविलेले प्रत्येक औषध रुग्णांना दिले. आता औषधांचा तुटवडा झाला. रुग्ण जास्त आणि औषधे कमी. त्यामुळे रुग्णांना औषधे लिहून द्यावी लागतात. 

का नाहीत औषधे? 

सरकारने राज्यातील औषध खरेदीचे नवे धोरण स्वीकारले आहे. त्याअंतर्गत औषधांसह वैद्यकीय उपकरणे खरेदीचे सर्वाधिकार हापकिन संस्थेला दिले आहेत. सार्वजनिक आरोग्य विभाग आणि वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन विभागासाठी या संस्थेतर्फे औषध खरेदी केली जात आहे. औषध खरेदी प्रक्रिया पूर्ण झाली नसल्याने सरकारी रुग्णालयांमध्ये औषधे नसल्याचे चित्र असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण खात्यातील अधिकाऱ्यांनी दिली. 

ससूनचा स्थानिक खरेदीवर भर 

स्थानिक पातळीवर औषधे खरेदी करण्यावर ससून रुग्णालय प्रशासनाचा भर असल्याची माहिती ससून रुग्णालय प्रशासनातर्फे देण्यात आली. गेल्या काही महिन्यांपासून सरकारकडून पुरवठा होणाऱ्या औषधांचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे पर्यायी व्यवस्था म्हणून स्थानिक पातळीवर औषधे खरेदी करण्यात येत आहेत. अत्यावश्‍यक औषधांचा तीन महिने पुरेल इतका साठा रुग्णालयात आहे, असेही प्रशासनातर्फे सांगण्यात आले. 
 

Web Title: Medicines Shortage Government Medical Colleges dean aggressive