कोरेगाव भीमा येथे सभांना बंदी नाही - संदीप पाटील (व्हिडिओ)

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 29 डिसेंबर 2018

पुणे - कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी लाखो अनुयायी येतात. कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने विजयस्तंभापासून दोनशे ते पाचशे मीटर अंतरावरील मैदानावर राजकीय पक्ष, संघटनांना सभेसाठी परवानगी देण्यात आलेली आहे. कोणत्याही सभांना बंदी घालण्यात आलेली नाही, अशी माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी शुक्रवारी दिली.

ज्या राजकीय पक्ष आणि संघटनांनी सभेसाठी अर्ज केले होते, त्यांना विजयस्तंभाच्या परिसरात सभांना परवानगी देण्यात आली आहे. त्यात रिपब्लिकन पक्षाचा आठवले गट, आनंदराज आंबेडकर, कवाडे गट, भारत मुक्‍ती मोर्चा आणि भाई विवेक चव्हाण यांच्या सभांचा समावेश आहे.

सोशल मीडियावर अफवा पसरविण्यात येऊ नये, यासाठी गेल्या दोन महिन्यांपासून महाराष्ट्र पोलिस, पुणे ग्रामीण सायबर सेल आणि गुप्तचर विभाग सोशल मीडियावरील पोस्टवर लक्ष ठेवून आहे. आक्षेपार्ह पोस्ट आढळल्यास संबंधित पोलिस ठाण्यांमार्फत त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. या परिसरात शनिवारपासून (ता. २९) पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. कोरेगाव भीमा विजयस्तंभ परिसरासह लोणीकंद, पेरणे फाटा, वढू बुद्रुक, सणसवाडी आणि शिक्रापूर परिसरात १ जानेवारीला इंटरनेटवर प्रतिबंध राहील.  

गतवर्षी एक जानेवारी रोजी झालेल्या दंगलीतील आरोपी आणि ज्यांच्याकडून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होऊ शकतो, अशा सर्वांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. त्यांना जिल्हा पोलिसांच्या हद्दीत प्रवेशबंदी केली आहे. संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांनाही ही बंदी लागू आहे का, या प्रश्‍नावर पाटील यांनी दंगलीचे आरोप असलेल्या सर्वांना ही बंदी लागू असल्याचे स्पष्ट केले.

Web Title: Meeting at Koregaon Bhima is not a ban Sandip Patil