Ajit Pawar : डिंभे धरण उजव्या कालव्यात पाणी सोडण्याचा निर्णय ; आंबेगाव, शिरूर व जुन्नर तालुक्यातील पिकांना होणार फायदा.

कुकडी प्रकल्पा अंतर्गत हुतात्मा बाबू गेनू सागरातून (डिंभे धरण) उजव्या कालव्यात शनिवारी (ता.२४), घोड व मीना शाखा कालव्यात मंगळवार (ता.२७) पासून उन्हाळी हंगामातील पिकांच्या सिंचनासाठी पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला.
Ajit Pawar
Ajit Pawarsakal

मंचर : कुकडी प्रकल्पा अंतर्गत हुतात्मा बाबू गेनू सागरातून (डिंभे धरण) उजव्या कालव्यात शनिवारी (ता.२४), घोड व मीना शाखा कालव्यात मंगळवार (ता.२७) पासून उन्हाळी हंगामातील पिकांच्या सिंचनासाठी पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला. पुणे येथे उपमुख्यमंत्री तथा कुकडी प्रकल्प कालवा, सल्लागार समितीचे अध्यक्ष अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली व सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक झाली.

यावेळी खासदार सुप्रिया सुळे, आमदार अतुल बेनके, आमदार रोहित पवार, आमदार निलेश लंके, माजी मंत्री बबनराव पाचपुते, राम शिंदे,भीमाशंकर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे, विभागीय आयुक्त डॉ.चंद्रकांत पूलकुंडवार, जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे, पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक अतुल कपोले, मुख्य अभियंता हेमंत धुमाळ, अधीक्षक अभियंता संतोष सांगळे, कार्यकारी अभियंता प्रशांत कडुसकर उपस्थित होते.

आंबेगाव, शिरूर व जुन्नर तालुक्यातील अनेक गावांत पिण्याच्या पाण्याचा व शेतीच्या पाण्याचा प्रश्न भेडसाऊ लागला आहे. या पार्श्वभूमीवर कुकडी प्रकल्पातून कालव्यांमध्ये पाण्याचे आवर्तन सोडावे. तसेच घोड, मीना, कुकडी या तीन नद्यांवरील ६५ कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यातही पाणी सोडण्याची मागणी करणारे पत्र अजित पवार यांना वळसे पाटील व अतुल बेनके यांनी दिले होते. त्यानुसार शनिवारी झालेल्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत या मागण्यांबरोबर पिंपळगाव जोगा धरणातून (ता.जुन्नर) डाव्या कालव्यात सोमवारी (ता.२६) पाणी सोडण्यात येणार आहे. त्यानुसार ताबडतोब कार्यवाही करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना अजित पवार यांनी दिले.

या पाण्याचा फायदा आंबेगाव, जुन्नर व शिरूर तालुक्यातील १०० हून अधिक गावातील ५५ हजार हेक्टर क्षेत्रातील पिकांना होणार आहे. त्यामुळे शेतकरी वर्गात उत्साहाचे वातावरण आहे. आज अखेर धरण निहाय शिल्लक उपयुक्त पाणीसाठा टीएमसी,(कंसात टक्के): डिंभे : ८.८० (६४.६४ टक्के), येडगाव :१.१८२ (६०.८२ टक्के),माणिकडोह: ३.९४५ (३८.७६ टक्के), वडज: ०.७५४ (६४.२६ टक्के), पिंपळगाव जोगे: १.९०३ (४८.९१ टक्के)

- डी.के वळसे पाटील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com