खेळाडूंच्या आठवणी जपणारं संग्रहालय (व्हिडिओ)

खेळाडूंच्या आठवणी जपणारं संग्रहालय (व्हिडिओ)

पुणे - क्रिकेटमध्ये सहभाग नोंदविणाऱ्या कुठल्याही देशाचं नाव घ्या. तिथल्या खेळाडूंनी वापरलेली बॅट, बॉल, बूट, ग्लोव्हज्‌, कॅप किंवा टी-गणवेश यांपैकी काही ना काही आपल्याला रोहन पाटे लगेच काढून देतील. पुण्यातील ‘ब्लेड्‌स ऑफ ग्लोरी’ हे त्यांनी उभारलेलं वैशिष्ट्यपूर्ण संग्रहालय म्हणजे जागतिक पातळीवरील क्रिकेटमधील अविस्मरणीय सामन्यांच्या आठवणींचा खजिनाच.

पाटे यांच्या क्रिकेटवेडातून हे आगळंवेगळं संग्रहालय २०१२ मध्ये साकार झालं. एकोणीस वर्षांखालील राज्यस्तरीय क्रिकेट ते खेळत असत. ते म्हणाले, ‘‘सुरवातीला निरनिराळ्या क्रिकेट खेळाडूंच्या स्वाक्षऱ्या जमवायचा मला छंद होता. पण, नंतर यासंदर्भात काही तरी अनोखं करावंसं वाटलं. मग मी क्रिकेटमधले ऐतिहासिक व संस्मरणीय क्षण वस्तूंच्या माध्यमातून साठवू लागलो. आजोबा आणि आई-बाबांच्या पाठिंब्यामुळं हे संग्रहालय साकारलं.’’

सहकारनगर क्रमांक दोनच्या स्वानंद सोसायटीतील गोविंद गौरव या इमारतीमध्ये हे संग्रहालय आहे. चार हजार चौरस फूट जागेतील निरनिराळ्या दालनांमध्ये आपल्या प्रिय खेळाडूंनी मोलाची कामगिरी बजाविताना वापरलेली बॅट, कॅप, टी-शर्ट किंवा बॉल इथं पाहणाऱ्यांच्या अंगावर रोमांच उभे राहतात. सचिन तेंडुलकर यांच्या हस्ते उद्‌घाटन झालेल्या या संग्रहालयात खास एक दालन सचिनसाठी व दुसरे विराट कोहलीसाठी आहे. त्यात छायाचित्रांसह संस्मरणीय वस्तू आहेत.

सर डॉन ब्रॅडमन यांची स्वाक्षरी असलेली बॅट, मुथय्या मुरलीधरन यांनी आठशेवा बळी घेताना परिधान केलेलं स्वेटर, सचिननं विश्वचषक स्पर्धेतील अंतिम सामन्यात घातलेला गणवेश; तसेच बॅट, चेस्ट गार्ड, एल्बो गार्ड, हेल्मेट आदी वस्तू बघायला मिळतात. त्याच्या शंभर शतकांची स्मृती जपण्यासाठी बॅटींच्या शंभर प्रतिकृती विशेष आहेत. जगात क्रिकेट खेळाची सुरवात झाली तेव्हा वापरल्या जाणाऱ्या बॅटपासून आतापर्यंत तिच्या स्वरूपात झालेले बदल छोट्या आकारातील बॅटींच्या माध्यमातून पाहताना गंमत वाटते. जागतिक पातळीवरील अनेक खेळाडूंनी इथं भेट दिली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com