सुरळीत वाहतुकीसाठी मेट्रोचे प्रयत्न

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 30 जुलै 2019

मेट्रो प्रकल्पाचे काम सुरू असताना वाहतुकीची कोंडी होऊ नये आणि नागरिकांना सुरक्षितता मिळावी, यासाठी महामेट्रोने १३ माजी पोलिस अधिकारी आणि २६० ट्रॅफिक वॉर्डन नियुक्त केले आहेत. तसेच, ३ क्‍यूआरटी (क्विक रिस्पॉन्स टिम) स्थापन केल्या असून, शहर आणि पिंपरी-चिंचवडमध्ये १२ ठिकाणी इलेक्‍ट्रिक डिस्प्ले बोर्ड लावले आहेत. 

पुणे - मेट्रो प्रकल्पाचे काम सुरू असताना वाहतुकीची कोंडी होऊ नये आणि नागरिकांना सुरक्षितता मिळावी, यासाठी महामेट्रोने १३ माजी पोलिस अधिकारी आणि २६० ट्रॅफिक वॉर्डन नियुक्त केले आहेत. तसेच, ३ क्‍यूआरटी (क्विक रिस्पॉन्स टिम) स्थापन केल्या असून, शहर आणि पिंपरी-चिंचवडमध्ये १२ ठिकाणी इलेक्‍ट्रिक डिस्प्ले बोर्ड लावले आहेत. 

पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये वनाज-रामवाडी, पिंपरी-स्वारगेटदरम्यान मेट्रो मार्गाचे काम सुरू आहे. त्यामुळे सध्या वाहतुकीची कोंडी होत आहे. पावसाळ्यामुळे त्यात भर पडली आहे. वाहतूक नियंत्रणात राहावी, यासाठी सहायक आयुक्त दर्जाचे ४ आणि निरीक्षक दर्जाचे ९ माजी अधिकारी महामेट्रोने नियुक्त केले आहेत. त्यांच्याअंतर्गत २६० वॉर्डन नियुक्त केले आहेत. 

वाहतूक पोलिसांच्या मदतीने ते कार्यरत आहेत. सी. एम. ई. चौक, फुगेवाडी चौक, परमहंस चौक, गुजरात कॉलनी चौक, शिवतीर्थ चौक, आठवले चौक, नळस्टॉप चौक आदी ठिकाणी ते कार्यरत आहेत. तसेच, मेट्रो मार्गावर कोणत्याही प्रकारचा अपघात किंवा दुर्घटना घडल्यास तातडीने मदत पोचविण्यासाठी ‘क्‍यूआरटी’ नियुक्त करण्यात आल्या  आहेत.

क्विक रिस्पॉन्स टिमची स्थापना
‘क्‍यूआरटी’कडे प्रथमोपचार पेटी, स्ट्रेचर, फायर व्हिशर, सर्च लाइट, काठी, लाइट बॅटन, लाल व हिरवे रंगाचे झेंडे, नॉयलॉन दोर, सायरन, ॲम्प्लिफायर आदी साधने उपलब्ध राहणार आहेत. शहर आणि परिसरात मोक्‍याच्या १२ ठिकाणी महामेट्रोने इलेक्‍ट्रॉनिक डिस्प्ले बोर्ड लावले असून, त्यावर वाहतूकविषयक संदेश दाखवण्यात येतात. तसेच वाहतूकविषयी सूचनादेखील या डिस्प्लेद्वारे देण्यात येत आहे, असे महामेट्रोने स्पष्ट केले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Metro efforts for transportation