एकत्रित बैठकीचे मेट्रोचे आश्‍वासन 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 30 ऑगस्ट 2018

पुणे - मेट्रोचे काम करण्यापूर्वी जमिनीखाली असलेल्या विविध सेवा वाहिन्यांची माहिती घेण्यात आली आहे. मात्र, प्रत्यक्षात काम करताना काही ठिकाणी वेगळीच स्थिती असल्याचे आढळून आले आहे. या कामाचा नागरिकांना त्रास होणार नाही यासाठी नगरसेवक व वाहतूक विभागाची एकत्रित बैठक घेण्याचे आश्‍वासन "महामेट्रो'कडून सर्वसाधारण सभेला देण्यात आले. 

शिवसेनेचे नगरसेवक पृथ्वीराज सुतार यांनी महापालिका आणि मेट्रो यांच्यात समन्वय नाही, त्यामुळे कर्वे रस्ता आणि कोथरूड भागातील नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. जमिनीखाली असलेल्या वाहिन्या फुटत असल्याचे सर्वसाधारण सभेत सांगितले. नगरसेवकांना विश्‍वासात घेऊन काम करावे, अशी मागणी त्यांनी केली होती. मेट्रोच्या कामामुळे मलवाहिन्या व जलवाहिन्या फुटत असून, त्याचा त्रास नगरसेवकांना होत आहे. मेट्रोकडून काम करण्यास विलंब होत असून, आम्ही तक्रार कोणाकडे करायची? महापालिका प्रशासन आणि मेट्रोकडून समाधानकारक उत्तरे मिळत नाहीत, अशी तक्रार त्यांनी केली. नगरसेवक दिलीप बराटे, नगरसेविका माधुरी सहस्रबुद्धे यांनीही तक्रारी मांडल्या. मेट्रोचे कार्यकारी संचालक अतुल गाडगीळ हे सर्वसाधारण सभेत उपस्थित होते. ""काम सुरू असलेल्या ठिकाणी बॅरिकेड्‌स लावले असून, जमिनीखालील सेवा वाहिन्यांची माहिती महापालिकेकडून घेतली आहे. पण, काही ठिकाणी खोदकामात जमिनीखाली वाहिन्या आल्या. नागरिकांना त्रास होऊ नये याची काळजी घेण्यात येत आहे,'' असे त्यांनी सांगितले. कामाच्या ठिकाणी फलक लावावेत, स्थानिक लोकप्रतिनिधींना त्याची माहिती द्यावी, संबंधित अधिकारी आणि त्यांचे संपर्क क्रमांक उपलब्ध करून द्यावेत, असे आदेश महापौर मुक्ता टिळक यांनी दिले. 

Web Title: Metro joint meeting assurance