मेट्रोबरोबरच बीआरटीचे जाळे विस्तारावे 

ज्ञानेश्‍वर बिजले
गुरुवार, 29 डिसेंबर 2016

पुण्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यासाठी दोन मोठे निर्णय गेल्या चार दिवसांत झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मेट्रो प्रकल्पाचे भूमिपूजन आणि महापालिकेच्या स्थायी समितीने तीन बीआरटी मार्गांसाठी मंजूर केलेले 220 कोटी रुपये. पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकांतील सार्वजनिक वाहतूक सक्षम करण्यासाठी या प्रकल्पांचा निश्‍चित उपयोग होणार आहे. 

पुण्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यासाठी दोन मोठे निर्णय गेल्या चार दिवसांत झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मेट्रो प्रकल्पाचे भूमिपूजन आणि महापालिकेच्या स्थायी समितीने तीन बीआरटी मार्गांसाठी मंजूर केलेले 220 कोटी रुपये. पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकांतील सार्वजनिक वाहतूक सक्षम करण्यासाठी या प्रकल्पांचा निश्‍चित उपयोग होणार आहे. 

देशातील पहिल्या दहा शहरांच्या यादीत पुणे असले, तरी येथील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अत्यंत दुबळी आहे. त्यामुळे खासगी वाहनांशिवाय पर्याय राहिला नाही. सार्वजनिक वाहतूक सक्षम करण्यासाठी दहा वर्षांपूर्वी बीआरटी योजना राबविण्यास प्रारंभ झाला आणि त्याच काळात मेट्रो प्रकल्पाच्या आखणीस सुरवात झाली. बीआरटी प्रकल्पासाठी केंद्र सरकारने महापालिकेला एक हजार कोटी रुपये दिले. मात्र, हा प्रकल्प फारसा मार्गी लागला नाही. गेल्या वर्षी नगर रस्ता आणि विश्रांतवाडी रस्त्यावर बीआरटी सुरू झाली. त्याला प्रतिसादही चांगला मिळत आहे. 

यापुढे केंद्र सरकारकडून बीआरटी प्रकल्पासाठी निधी मिळणार नाही. त्यामुळे महापालिकेला त्यांच्या निधीतूनच जादा खर्च करावा लागणार आहे. अशा वेळी शहराच्या सर्व भागात सार्वजनिक वाहतूक सक्षमपणे कार्यान्वित करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. महापालिकेने दहा वर्षांपूर्वी सर्वंकष वाहतूक आराखडा तयार करून घेतला होता. तो कार्यान्वित केला पाहिजे, असे वाटते. 

मेट्रो प्रकल्प पिंपरीहून जुन्या पुणे-मुंबईमार्गे शिवाजीनगरहून स्वारगेटला येणार आहे; तर दुसरा मार्ग पौड रस्त्यावरून कर्वे रस्ता, जंगली महाराज रस्ता, महापालिका, रेल्वे स्थानकमार्गे नगर रस्त्याकडे जाणार आहे. शिवाजीनगर ते हिंजवडी या मार्गावरही मेट्रो प्रकल्प राबविण्यात येणार आहे. गणेशखिंड रस्ता, जुना पुणे-मुंबई मार्ग, स्वारगेट ते कात्रज या मार्गांवर बीआरटी करण्यात येणार आहे. स्वारगेट ते कात्रज बीआरटी सक्षमपणे चालविली नाही, हा मुद्दा वेगळा. मात्र, अन्य दोन मार्ग विचारात घेतल्यास, येत्या तीन- चार वर्षांत या दोन्ही मार्गांवर मेट्रो आणि बीआरटी या दोन्ही सार्वजनिक वाहतूक सेवा उपलब्ध होतील. त्यांच्यात अंतर्गत स्पर्धाही वाढेल. त्याचवेळी शहराच्या अन्य भागात बीआरटीचे जाळे निर्माण करण्याची योजनाही राबविली पाहिजे; अन्यथा प्रवाशांचा गोंधळ उडण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. दोन्ही महापालिकांनी पीएमपीला नव्या गाड्या खरेदी करून दिल्या पाहिजेत, अन्यथा बीआरटी मार्गांसाठी रक्कम खर्च होईल आणि गाड्या अपुऱ्या पडतील. त्यामुळे नवीन गाड्यांच्या खरेदीसाठी अर्थसाह्य करण्याबरोबरच शहराच्या सर्व भागात बीआरटीचे जाळे विस्तारले पाहिजे. 

Web Title: Metro network extension with BRT