मेट्रोला हवी रिक्षा, मिनी बसची साथ

Metro
Metro

पुणे - मेट्रो स्थानकापर्यंत पोचण्यासाठी प्रवाशांना रिक्षा, मिनी बस यांसारख्या पूरक वाहतूक सेवेची (फिडर सर्व्हिस) गरज आहे. अन्यथा, मेट्रोच्या प्रवासी संख्येला ग्रहण लागू शकते, असे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील (सीओईपी) संशोधनातून सिद्ध झाले आहे.

‘सीओईपी’च्या नगर नियोजन विभागातील धनश्री जाधव या विद्यार्थिनीने नळस्टॉप स्थानकाजवळील सुमारे सव्वादोन चौरस किलोमीटरच्या परिघात संशोधन करून प्रबंध सादर केला आहे. 

वनाज-रामवाडी मार्गावर मेट्रोची चाचणी नऊ महिन्यांनी होणार आहे. या मार्गावर दररोज सुमारे दोन लाख प्रवासी प्रवास करतील, असे महामेट्रोने प्रकल्प आराखड्यात गृहित धरले आहे. त्यात नळस्टॉप स्थानकावरून प्रवाशांची मोठी वाहतूक अपेक्षित धरण्यात आली आहे. नळस्टॉपजवळील कर्वेनगर प्रभागात सुमारे नऊ हजार घरे आहेत. सुमारे ३५ हजार लोक त्या भागात राहतात. तेथून मेट्रो स्थानकापर्यंत पोचण्यासाठी दीड-दोन किलोमीटर अंतर पार करावे लागेल. मेट्रो सुरू झाल्यावर पूरक वाहतूक सेवा निर्माण झाली नाही, तर प्रवासी खासगी वाहनांचा वापर करतील, असे या भागातील रहिवाशांशी झालेल्या संवादातून पुढे आले असल्याचे संशोधनाच्या प्रबंधात म्हटले आहे.

प्रवासी वाढण्यासाठी...
कर्वेनगर भागात प्रवाशांना मेट्रो स्थानकापर्यंत पोचता यावे, यासाठी संशोधनात पूरक वाहतूक सेवेसाठी सात मार्ग करण्यात आले आहेत. त्या ठिकाणी पीएमपीच्या मिनी बस किंवा रिक्षांबरोबर महामेट्रोने ‘टायअप’ केले, तर प्रवासी स्वतःच्या वाहनांचा वापर न करता स्थानकापर्यंत पोचतील. त्यासाठी परिसरात ३३ ठिकाणे निश्‍चित करण्यात आली आहेत. या ठिकाणांवरून प्रवाशांची मेट्रो मार्गापर्यंत वाहतूक सुलभ होऊ शकते, असेही संशोधनात म्हटले आहे.

सार्वजनिक वाहतूक सेवा लोकप्रिय करायची असेल, तर प्रवाशांचा विचार त्यांच्या घरापासून कामाच्या ठिकाणापर्यंत करावा लागणार आहे. दीड-दोन किलोमीटर अंतर चालून प्रवासी मेट्रो गाठू शकत नाही. त्यामुळे त्यांच्यासाठी पूरक वाहतूक सेवेचे नियोजन महामेट्रोला आतापासूनच करावे लागेल. मेट्रो स्थानकाजवळील वाहनतळ खासगी वाहनांच्या संख्येला पुरेसा ठरणार नाही.
- प्रा. प्रताप रावळ, टाऊन प्लॅनिंग डिपार्टमेंट, सीओईपी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com