अभयारण्यातून मेट्रो जाणार नाही 

 Salim_Ali_Bird_Sanctuary-(4.jpg Alt Text
Salim_Ali_Bird_Sanctuary-(4.jpg Alt Text

पुणे : पुरातत्त्व विभाग प्राधिकरणाने नगर रस्त्यावरील मेट्रोच्या अलाईनमेंटला आगाखान पॅलेसमुळे आक्षेप घेतला आहे. त्यामुळे महामेट्रोने कल्याणीनगरमार्गे सुधारित मार्ग तयार केला आहे. परंतु, यामुळे डॉ. सलीमअली अभयारण्याला धोका निर्माण होत असल्याचे काही पर्यावरण प्रेमींचे म्हणणे आहे. या पार्श्‍वभूमीवर ''नगर रस्त्यावरील मेट्राच्या सुधारित अलाईनमेंटचा (आराखडा) आणि डॉ. सलीम अली अभयारण्याचा काहीही संबंध नाही. मेट्रोचा मार्ग अभयारण्याबाहेर असलेल्या रस्त्यावरून जाणार आहे'', असे महामेट्रोकडून शुक्रवारी पत्रकार परिषदेत सांगण्यात आले. सुधारित मार्गाला महापालिकेने मंजुरी दिली असून राज्य आणि केंद्र सरकारकडून लवकरच मंजुरी अपेक्षित असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 

वनाज- रामवाडी मार्गाचे प्रकल्प संचालक अतुल गाडगीळ आणि शिवाजीनगर- रामवाडी मार्गाचे संचालक प्रकाश वाघमारे यांनी मेट्रोच्या मार्गाचा आढावा पत्रकार परिषदेत घेतला. वाघमारे म्हणाले, "नगर रस्त्यावरून कल्याणीनगर येथून नदीपात्राजवळून जाणाऱ्या शिवणे- खराडी रस्त्यावरून मेट्रो मार्ग जाणार आहे. रामवाडीजवळ तो पुन्हा नगर रस्त्यावर येणार आहे. अभयारण्यातून मेट्रो मार्ग जाणार नाही. त्यामुळे मेट्रोचा आणि अभयारण्याचा काहीही संबंध नाही.'' कल्याणीनगरमध्ये मेट्रोसाठी आरक्षित असलेल्या जागेतूनच मेट्रो मार्ग शिवणे- खराडी रस्त्यावर जाणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

मार्ग बदलण्याची 'आयटी'ची मागणी 
कल्याणीनगरमधून रामवाडीला मेट्रो मार्ग नेण्याऐवजी हा मार्ग कल्याणीनगरवरून सरळ खराडीपर्यंत नेण्यात यावा, अशी मागणी कल्याणीनगर आणि परिसरातील माहिती तंत्रज्ञान कंपन्यांच्या प्रतिनिधींनी महामेट्रोकडे शुक्रवारी केली. त्यासाठी त्यांच्या शिष्टमंडळाने महामेट्रोच्या अधिकाऱ्यांचीही भेट घेतली. "आयटी' कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी मेट्रोच्या अलाईनमेंटमध्ये बदल करण्यात यावा. त्यामुळे खासगी वाहनांचा वापर कमी होऊ शकेल, असे त्यांचे म्हणणे आहे. 

डेक्कन स्थानकाचा पुनर्विकास 
वनाज- रामवाडी मेट्रो मार्गातील एक स्थानक डेक्कन जिमखाना आहे. तेथील बस स्थानकाच्या मागे हे स्थानक असेल. स्थानकातून प्रवाशांना मेट्रोमध्ये जा-ये करता यावी, यासाठी स्वारगेट एसटी आणि शिवाजीनगर एसटी स्थानकांच्या धर्तीवर डेक्कन स्थानकाचाही पुनर्विकास करण्याबाबत पीएमपी आणि महापालिकेबरोबर महामेट्रोची सध्या चर्चा सुरू आहे. सार्वजनिक- खासगी भागीदारी तत्त्वातून (पीपीपी) या स्थानकाचा विकास करता येईल, असाही पर्याय महामेट्रोने ठेवला आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com