पालिकेसमोर आता मेट्रोचे काम 

ज्ञानेश्‍वर बिजले 
बुधवार, 29 ऑगस्ट 2018

पिंपरी - महापालिका भवनासमोरील सेवा रस्त्यावर महामेट्रोने या आठवड्यात कामाला सुरवात केल्यानंतर शहरवासीयांना खऱ्या अर्थाने वाहतुकीच्या कोंडीचा सामना करावा लागला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते अहिल्यादेवी होळकर चौकादरम्यान मेट्रोचे वीस खांब उभारण्यात येणार आहेत. त्यांच्या पायासाठी पाच ठिकाणी खोदकाम करण्यात येत आहे. या कामाला किमान सहा-सात महिने लागणार असल्याने शिल्लक राहिलेल्या अरुंद रस्त्यावरूनच पीएमपी गाड्यांसह सर्व वाहनांना जावे लागणार आहे. 

खराळवाडीपासून दापोडीपर्यंत मेट्रोचे काम गेले वर्षभर सुरू आहे. मात्र, द्रुतगती रस्त्याच्या दुभाजकावर ते काम सुरू असल्यामुळे सेवा रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या वाहनचालकांना त्याचा त्रास झाला नाही. खराळवाडीपासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकाकडे जाताना मुख्य मार्गावर ग्रेडसेपरेटर असल्यामुळे मेट्रोचे खांब सेवा रस्त्यावर बांधण्यास सुरवात झाली. तेथे सात खांब उभारण्यात येतील. बीआरटीसाठी जागा ठेवून त्याच्या संरक्षक कठड्यापासून खांब उभे करावेत, असे महापालिकेने सांगितल्यामुळे सेवा रस्त्यावरच मेट्रोचे काम सुरू झाले. सध्या तेथे फारशी अडचण आलेली नसली, तरी सुमारे दोनशे मीटर अंतरात वाहनचालकांना अरुंद रस्त्यावरून प्रवास करावा लागत आहे. खांबाचे काम येत्या तीन महिन्यांत पूर्ण करण्यासाठी मेट्रोचे कर्मचारी प्रयत्नशील आहेत. 

गणेशोत्सव होईपर्यंत महापालिका भवनासमोर मेट्रोचे काम सुरू करू नये, अशी सूचना महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी केली होती. मात्र, वेळेत काम पूर्ण करावयाचे असल्यामुळे महामेट्रोने तातडीने काम हाती घेतले. होळकर चौकात मेट्रोचे स्थानक होणार असून, ते कामही सुरू केले आहे. 

स्थानकासाठी दहा मोठे खांब बांधण्यात येणार आहेत. त्यापैकी तीन खांब चौकाच्या मध्यभागापर्यंत येणार आहेत. त्यापूर्वी चौकापासून महापालिका भवनाच्या दिशेने सात खांब बांधण्यासाठी खड्डे खणण्यास सुरवात झाली आहे. येत्या दहा दिवसांत त्यापैकी काही ठिकाणी फाउंडेशनचे काम पूर्ण केले जाईल. व्हायाडक्‍टच्या खांबांसाठी पाच ठिकाणी खड्डे खणले असून, दोन ठिकाणी पायाचे सिमेंट कॉंक्रीट करण्याचे काम सुरू झाले आहे. मेट्रो स्थानकासाठी चार ठिकाणी पाया खणण्याचे काम सुरू झाले आहे. होळकर चौकापासून महापालिका भवनापर्यंत महामेट्रोने लोखंडी संरक्षक कठडे उभारले आहेत. 

होळकर चौकातील काम उशिरा सुरू करण्यात येईल. खराळवाडी ते दापोडीदरम्यान खांबांची कामे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. खराळवाडी ते संत मदर तेरेसा पूल यादरम्यान खांबांसाठी पाया घेण्याचे व खांबांचे काम आता वेगाने सुरू केले आहे. महापालिका भवनासमोरील खांब लवकर बांधण्याचे नियोजन केले आहे. 
- गौतम बिऱ्हाडे, मुख्य कार्यकारी अधिकारी, महामेट्रो 

Web Title: Metro work is in front of the PCMC