मेट्रोच्या कामाला नाशिक फाट्यापासून होणार सुरवात

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 9 मे 2017

पिंपरी ते स्वारगेट मार्गाला मुहूर्त; बाधित होणाऱ्या वृक्षांना जीवदान मिळणार

पिंपरी - पिंपरी ते स्वारगेट दरम्यान प्रस्तावित असणाऱ्या मेट्रोच्या कामाला नाशिक फाटा येथून सुरवात होणार आहे. येत्या आठवडाभरात हे काम सुरू होणार असल्याचे महामेट्रोच्या सूत्रांनी ‘सकाळ’ला सांगितले. नाशिक फाटा चौकामधील ग्रेडसेपरेटरच्या परिसरातून हे काम सुरू होणार असल्याने या रस्त्यावर असणाऱ्या वृक्षांना जीवदान मिळणार आहे. 

सुरवातीच्या टप्प्यात महामेट्रोने पिंपरी ते रेंजहिल्स हे १०.७५ किलोमीटर अंतराचे काम पूर्ण करण्याचे निश्‍चित केले असून, या दरम्यान मेट्रोची नऊ स्टेशन्स प्रस्तावित करण्यात आली आहेत. नाशिक फाटा परिसरातून काम करत असताना पिंपरी आणि रेंजहिल्स या दोन्ही बाजूने काम सुरू करण्यात येणार आहे. 

मेट्रोचे काम सुरू असताना मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी नको, म्हणून महामेट्रोने २५० मीटरच्या टप्प्यात काम करण्याचे नियोजन केले आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होणार नाही. मेट्रोचे काम सुरू करण्याअगोदर त्याठिकाणची वाहतूक वळवण्यासंदर्भात मेट्रोने वाहतूक पोलिसांकडे परवानगी मागितली आहे. येत्या काही दिवसांमध्ये ही परवानगी मिळेल, असे या सूत्रांनी स्पष्ट केले. 

मेट्रोसाठी बीआरटी मार्गाचा वापर करण्यात येणार नाही. पिंपरी ते रेंजहिल्स या मार्गाच्या कामाचे कंत्राट हैदराबादमधील एनसीसी या कंपनीला देण्यात आले आहे. येत्या दीड ते दोन वर्षांमध्ये हे काम पूर्ण होणे अपेक्षित आहे. 

कोंडी वाढणार
सध्या नाशिक फाटा चौकामध्ये जे.आर.डी. टाटा पुलाला जोडण्यासाठी दोन पुलांचे काम सुरू आहे. त्यापैकी एक पूल पुणे- मुंबई रस्त्याकडून येणारा आहे, तर दुसरा पूल पिंपरीकडे जाणार आहे. या दोन्ही पुलांचे काम पूर्ण होण्यास आणखी चार महिन्यांचा अवधी लागण्याची शक्‍यता आहे. दरम्यान, लगेचच त्याठिकाणी मेट्रोच्या कामाला सुरवात होणार आहे. त्यामुळे नाशिक फाटा चौकामध्ये हॅरिस पुलासारखीच वाहतूक कोंडी होण्याची शक्‍यता आहे.

Web Title: metro work start from nashik phata