अडीच हजार नागरिकांना म्हाडाची "लॉटरी'

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 17 डिसेंबर 2016

पुणे - स्वत:च्या मालकीचे घर असावे, असे प्रत्येकाला वाटते. सुमारे अडीच हजाराहून अधिक नागरिकांचे हे स्वप्न शुक्रवारी पूर्ण झाले. घर मिळाल्याचा आनंद लॉटरी लागलेल्या व्यक्तींच्या चेहऱ्यावर दिसत होता. पुण्यात घर होईल की नाही, अशी शंका होती. मात्र, म्हाडाने घराचे स्वप्न पूर्ण केले, अशी प्रतिक्रियाही घर मिळालेल्या नागरिकांनी व्यक्त केली.

पुणे - स्वत:च्या मालकीचे घर असावे, असे प्रत्येकाला वाटते. सुमारे अडीच हजाराहून अधिक नागरिकांचे हे स्वप्न शुक्रवारी पूर्ण झाले. घर मिळाल्याचा आनंद लॉटरी लागलेल्या व्यक्तींच्या चेहऱ्यावर दिसत होता. पुण्यात घर होईल की नाही, अशी शंका होती. मात्र, म्हाडाने घराचे स्वप्न पूर्ण केले, अशी प्रतिक्रियाही घर मिळालेल्या नागरिकांनी व्यक्त केली.

म्हाडाच्या सदनिका वाटपाची संगणकीय सोडत शुक्रवारी बालेवाडी श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात आयोजित करण्यात आली होती. या वेळी म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी झेंडे, माजी उपलोकायुक्त सुरेशकुमार, राष्ट्रीय सूचना केंद्राचे अधिकारी तथा संगणकीय सोडत प्रणालीचे समन्वयक मोईझ हुसेन, कोकण परिमंडळाचे मुख्याधिकारी विजय लहाने, मुख्याधिकारी तथा अपर जिल्हाधिकारी अशोक काकडे उपस्थित होते.

"म्हाडा'तर्फे राबविण्यात येणाऱ्या गृहयोजना सोडतीमध्ये पारदर्शकता असल्यामुळे या गृहनिर्माण योजनांना नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. त्याचबरोबर मुंबईव्यतिरिक्त प्रथमच राज्यामध्ये पुणे येथे सदनिकांसाठी संगणकीय सोडत आयोजित करण्यात आली असल्याचे झेंडे यांनी सांगितले.

पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे एकूण 2 हजार 503 सदनिकांसाठी अर्ज मागविण्यात आले होते. सुमारे 45 हजार नागरिकांनी या योजनेला अर्ज केले होते. त्यापैकी सुमारे 31 हजार अर्जदार सोडतीसाठी पात्र ठरले. त्यापैकी 2 हजार 506 सदनिकांपैकी सुमारे 2 हजार 300 सदनिकांची सोडत काढण्यात आली. त्यामध्ये मध्यम उत्पन्न गटातील 200 सदनिकांना प्रतिसाद मिळाला नाही. या सोडतीचे थेट प्रक्षेपण म्हाडाच्या संकेतस्थळावर करण्यात आले होते. 17 देशांतील सुमारे दीड हजार नागरिकांनी या सोडतीचे प्रक्षेपण पाहिले, तर संगणकीय सोडतीमध्ये भाग्यवान ठरलेल्यांची नावे एलईडी स्क्रीनवर या वेळी प्रदर्शित करण्यात आली. सोडतीमध्ये सहभागी झालेल्या विजेत्यांचा या वेळी म्हाडाच्या वतीने सत्कार करण्यात आला. सोडतीला म्हाडाचे अधिकारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

राजू शेट्टी यांना घरासाठी प्रतीक्षाच
उच्च उत्पन्न गटातून आणि लोकप्रतिनिधींच्या कोट्यातून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक आणि खासदार राजू शेट्टी यांनी पिंपरी येथील मोरवाडी घरासाठी अर्ज केला होता. या घरांच्या सोडतीत राजू शेट्टी यांचा क्रमांक लागला नाही. खासदार राजू शेट्टी यांचा क्रमांक प्रतीक्षा यादीमध्ये आहे.

Web Title: mhada home lottery