म्हाडाच्या सदनिकांचा ताबाही ऑनलाइननेच

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 24 मे 2018

पुणे - म्हाडाच्यावतीने घरांसाठी ऑनलाइन सोडत काढल्यानंतर प्रत्यक्ष ताबा देईपर्यंत सर्व व्यवहार ऑनलाइन आणि पारदर्शीपणे पूर्ण करण्यात येतील. तसेच, यावेळेस गरीब व मध्यमवर्गीय नागरिकांना परवडणारी घरे मिळावीत, यासाठी तीनशे ते सहाशे चौरस फुटांच्या सदनिका उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती म्हाडाचे सभापती समरजीतसिंह घाटगे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.

"म्हाडा'च्यावतीने तीन हजार 139 सदनिकांची येत्या 30 जून रोजी सोडत काढण्यात येणार आहे. ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी 19 जूनपर्यंत मुदत असून, दहा हजारांहून अधिक नागरिकांनी घरासाठी ऑनलाइन अर्ज दाखल केले आहेत. म्हाडाच्या घरांच्या किमती नऊ लाखांपासून पुढे आहेत. आर्थिक उत्पन्न गटानुसार नागरिक ऑनलाइन अर्ज भरू शकतात. पॅन कार्ड, बॅंक खाते क्रमांक, आयएफसी कोड, अनामत रक्‍कम डीमांड ड्राफ्ट यांसह अन्य बाबी आवश्‍यक आहेत. ऑनलाइन सोडतीमध्ये नंबर न लागल्यास अनामत रक्‍कम संबंधित व्यक्‍तीच्या बॅंक खात्यात आठ दिवसांत परत करण्यात येईल. म्हाडाच्या घरांना 50 वर्षांची हमी असून, भूकंपरोधक घरे बांधण्यात आली आहेत. म्हाडाच्या संकेतस्थळावर अर्ज कसा भरावा आणि घरांची उपलब्धता याबाबत माहिती देण्यात आल्याचे त्यांनी या वेळी सांगितले.

ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी संकेतस्थळ - http://lottery.mhada.gov.in
हेल्पलाइन क्रमांक - 9869988000
सोडत तारीख आणि स्थळ - 30 जून 2018, सकाळी 10 वाजता
आयटी इनक्‍यूबेशन सेंटर, नांदेडसिटी, सिंहगड रस्ता

सदनिकांची एकूण उपलब्धता (3139)
अत्यल्प उत्पन्न गटांसाठी - 449
अल्प उत्पन्न गट - 2404
मध्यम उत्पन्न गट- 282
उच्च उत्पन्न गट - 4

घरांच्या किमती जीएसटी वगळून
घरांच्या किमती नोंदणी शुल्क, तसेच वस्तू व सेवा कर (जीएसटी) वगळून दिल्या आहेत. केंद्र सरकारच्या नियमानुसार जीएसटी भरावा लागणार आहे. तसेच, ऑनलाइन सोडतीमध्ये नंबर लागल्यास संबंधितांना बॅंकांकडून साडेआठ टक्‍क्‍याने कर्ज उपलब्ध होईल, असे या वेळी सांगण्यात आले.

घरांची उपलब्धता
पुणे शहर आणि जिल्हा : नांदेड सिटी सिंहगड रस्ता, महाळुंगे चाकण- तळेगाव रस्ता, तळेगाव दाभाडे, लोणावळा, सासवड आणि दिवे (ता. पुरंदर), हडपसर, रावेत, चिखली मोशी, मोरवाडी पिंपरी.
तसेच, कोल्हापूर, सातारा आणि सोलापूर जिल्हा.

वर्गवारीनुसार सदनिकांची संख्या-
अनुसूचित जाती - 341
अनुसूचित जमाती 182
भटक्‍या जमाती 40
विमुक्‍त जाती 40
पत्रकार 74
स्वातंत्र्यसैनिक 74
दिव्यांग 94
संरक्षण दल 58
माजी सैनिक 151
म्हाडा कर्मचारी 58
राज्य सरकार कर्मचारी 151
केंद्र सरकार कर्मचारी 58
कलाकार 58
सर्वसाधारण 1702 आणि इतर.

Web Title: mhada home online