‘म्हाडा’ची लॉटरी पुढील महिन्यात; पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये ४,७२३ घरे

अनिल सावळे
Wednesday, 25 November 2020

गेल्या वर्षभरापासून म्हाडाच्या सदनिकांसाठी सोडतीची वाट पाहणाऱ्या गरीब, मध्यमवर्गीयांसाठी खूषखबर आहे. पुणे, पिंपरी-चिंचवड परिसरासह जिल्ह्यात ‘म्हाडा’च्या सुमारे पावणेपाच हजार सदनिका उपलब्ध असून, त्यासाठी डिसेंबरमध्ये सोडत काढण्यात येणार आहे. शिक्षक-पदवीधर विधानपरिषदेच्या निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर ही सोडत निघण्याची शक्‍यता आहे. गरीब, मध्यमवर्गीयांसह उच्च उत्पन्न गटातील नागरिकांना याचा लाभ होणार आहे.

पुणे - गेल्या वर्षभरापासून म्हाडाच्या सदनिकांसाठी सोडतीची वाट पाहणाऱ्या गरीब, मध्यमवर्गीयांसाठी खूषखबर आहे. पुणे, पिंपरी-चिंचवड परिसरासह जिल्ह्यात ‘म्हाडा’च्या सुमारे पावणेपाच हजार सदनिका उपलब्ध असून, त्यासाठी डिसेंबरमध्ये सोडत काढण्यात येणार आहे. शिक्षक-पदवीधर विधानपरिषदेच्या निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर ही सोडत निघण्याची शक्‍यता आहे. गरीब, मध्यमवर्गीयांसह उच्च उत्पन्न गटातील नागरिकांना याचा लाभ होणार आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

‘म्हाडा’च्या पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाकडून गतवर्षी सप्टेंबरमध्ये सोडत काढण्यात आली होती. परंतु, त्यानंतर एक वर्षाहून अधिक काळ उलटूनही सोडत निघालेली नाही. मार्च-एप्रिलमध्ये सोडत काढण्याची तयारी ‘म्हाडा’ने सुरू केली होती. परंतु, लॉकडाउन जाहीर झाल्यानंतर सोडतीची प्रक्रिया मागे पडली. लॉकडाउन संपल्यानंतर दिवाळीमध्ये सोडत निघेल, अशी अपेक्षा होती. परंतु शिक्षक-पदवीधर विधान परिषदेच्या निवडणुकीची आचारसंहिता लागली. त्यामुळे स्वप्नातील घराची वाट पाहणाऱ्या नागरिकांना आणखी काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे. 

व्यावसायिक गौतम पाषाणकर का निघून गेले? वाचा सविस्तर

चाकण परिसरातील म्हाळुंगे-इंगळे येथे अत्यल्प, अल्प आणि मध्यम उत्पन्न गटातील सदनिकांसाठी गृहनिर्माण प्रकल्प उभारण्यात आला आहे. या प्रकल्पामध्ये दोन हजारांहून अधिक सदनिका उपलब्ध आहेत. विशेष म्हणजे पूर्वी ‘म्हाडा’ने जाहीर केलेल्या किमतीपेक्षा २० टक्‍क्‍यांहून कमी किमतीत या सदनिका उपलब्ध होणार आहेत. पिंपरी-वाघिरे येथे नऊशे सदनिकांचा गृहप्रकल्प उभारण्यात आला आहे. तसेच, ४५ बिल्डरांकडून उभारण्यात आलेल्या गृह प्रकल्पांमधील २० टक्‍के सदनिका म्हणजे सुमारे दीड हजार सदनिका ‘म्हाडा’साठी उपलब्ध झाल्या आहेत. अशा एकूण चार हजार ७२३ सदनिकांसाठी सोडत निघणार आहे.

अमेरिकेच्या मुंबई दुतावासातील उच्चायुक्तांची पुणे विद्यापीठाला भेट 

मी पुण्यात पत्नी आणि मुलांसमवेत गेल्या दहा वर्षांपासून भाडेतत्त्वावर राहतो. स्वतःचे घर व्हावे, अशी इच्छा आहे. त्यासाठी गतवर्षी ‘म्हाडा’च्या वन बीचके घरासाठी निघालेल्या लॉटरीमध्ये अर्ज भरला होता. परंतु नंबर लागला नाही. पुन्हा लॉटरी जाहीर झाल्यानंतर अर्ज करणार आहे. 
- शिरीष कटके, भाजी विक्रेता, फुरसुंगी

गरीब, मध्यमवर्गीय नागरिकांना परवडणाऱ्या दरातील सुमारे पावणेपाच हजार सदनिका ‘म्हाडा’कडे उपलब्ध आहेत. म्हाळुंगे, पिंपरी-वाघिरेसह पुणे-पिंपरी चिंचवड परिसरात या सदनिका आहेत. सध्या आचारसंहिता सुरू आहे. लवकरच याबाबत निर्णय घेतला जाईल. 
- नितीन माने, मुख्याधिकारी म्हाडा, पुणे

राष्ट्रीय हरित लवादातील नवीन पदाधिकाऱ्यांची नावे अखेर निश्चित

परिसर आणि उपलब्ध सदनिका

  • २१०० - म्हाळुंगे-इंगळे (चाकण)
  • ९०० - पिंपरी वाघिरे
  • १७२३  पुणे, पिंपरी-चिंचवडसह जिल्हा

येथे साधा संपर्क
गृहनिर्माण भवन, आगरकरनगर, अलंकार थिएटरमागे, पुणे ४११ ००१
म्हाडा कार्यालय - दूरध्वनी क्रमांक - ०२०-२६१२८८५६, ०२०-२६१२१८३०
संकेतस्थळ - http://lottery.mhada.gov.in

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MHADA lottery next month 4723 houses in Pune Pimpri Chinchwad