व्यावसायिक गौतम पाषाणकर का निघून गेले? वाचा सविस्तर

Gautam_Pashankar
Gautam_Pashankar

पुणे : तब्बल एक महिन्यापासून बेपत्ता असलेले नामांकित व्यावसायिक गौतम पाषाणकर यांचा अखेर पुणे पोलिसांनी शोध घेतला. पाषाणकर सुखरुप असून त्यांना जयपुरच्या एका हॉटेलमधून पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने शोधून काढले. पथकाकडून त्यांना पुण्याला त्यांच्या घरी आणले जात आहे. 

नेमके घडले काय?
ऑटोमोबाईल आणि बांधकाम क्षेत्रात गौतम पाषाणकर यांचे चांगले नाव आहे. मात्र 21 ऑक्‍टोबरला पाषाणकर हे त्यांच्या लोणी काळभोर येथील त्यांच्या गॅस एजन्सीच्या कार्यालयात गेले होते. तेथून ते त्यांच्या जंगली महाराज रस्त्यावरील कार्यालयात आले. त्यानंतर त्यांनी त्यांच्या कार चालकाकडे बंद लिफाफा देऊन तो लिफाफा घरी देण्यास सांगितले. त्यानंतर ते तेथून बाहेर पडून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या दिशेने निघून गेले.

सायंकाळी चालकाने तो लिफाफा घरी दिला. त्यांच्या कुटुंबीयांनी लिफाफा उघडला. त्यावेळी त्यांनी आपण आत्महत्या करण्यास जात असल्याचे नमूद केल्याचे त्यांना दिसले. त्यानंतर त्यांचा मुलगा कपिल पाषाणकर यांनी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात ते हरवल्याची तक्रार दाखल केली. तसेच व्हॉटसअप, फेसबुक सारख्या सोशल माध्यमाद्वारे माहिती देऊन त्यांचा शोध घेण्यास सुरूवात केली. 

पुणे विद्यापीठापर्यंतच सीसीटीव्ही चित्रीकरण 
शिवाजीनगर पोलिसांसह अन्य पोलिस ठाण्यांच्या पथकाने शहरात सर्वत्र त्यांचा शोध घेतला. मात्र ते सापडले नाहीत. पुणे विद्यापीठापर्यंत ते चालत गेल्याचे एका सीसीटीव्ही चित्रीकरणाद्वारे स्पष्ट झाले. मात्र त्यापुढे त्यांचा शोध लागला नाही. त्यामुळे पोलिसांनी अन्य तांत्रिक माहितीद्वारे त्यांच्यापर्यंत पोचण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यामध्येही अडचणी येत होत्या. 

म्हणून त्यांनी सोडले घर!
कोरोनामुळे व्यवसायात झालेल्या नुकसानीचा फटका इतर उद्योजक, व्यावसायिकांप्रमाणेच पाषाणकर यांनाही फटका बसला. त्याचा पाषाणकर यांच्या मनावर परिणाम झाला. त्यांनी कर्जाच्या कारणावरुनच घर सोडल्याची प्राथमिक माहिती पुढे आली आहे. त्यांची मानसिक स्थिती व्यवस्थित असून तब्येतही चांगली असल्याची माहिती पोलिसांनी दिली. 

या पथकाने यशस्वीपणे पार पाडली जबाबदारी
पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या आदेशानंतर अतिरीक्त पोलिस आयुक्त (गुन्हे) अशोक मोराळे व पोलिस उपायुक्त बच्चन सिंह यांच्या मार्गदर्शनानुसार, युनीट एकचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील ताकवले यांच्या पथकाने पाषाणकर यांचा शोध घेतला. त्यांच्या पथकामध्ये पोलिस उपनिरीक्षक संजय गायकवाड, सुनील कुलकर्णी, पोलिस कर्मचारी योगेश जगताप, अय्याज दड्डीकर, बानगुडे यांचा समावेश होता. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com