'या' घटकामुळे बदलला असावा लोणारचा रंग; ज्येष्ठ सूक्ष्मजीव शास्त्रज्ञांचे स्पष्टीकरण!

सकाळ वृत्तसेवा
Friday, 19 June 2020

जगातील विविध भागांमध्ये असलेल्या समुद्र, सरोवर, नदी सारख्या पाण्याच्या स्रोतांमध्ये होणारे बदल याला प्रामुख्याने सूक्ष्मजीव (मायक्रोब) आणि खनिज कारणीभूत असतात

पुणे : जगप्रसिद्ध लोणार सरोवराच्या पाण्याचा रंग लाल होण्यामागे सूक्ष्मजीवांमार्फत सोडण्यात आलेले रंगद्रव्य असू शकते असा अंदाज लावण्यात येत आहे. परंतु प्रत्यक्षात यासाठी पाण्याचे नमुने घेऊन अभ्यास करण्याची गरज आहे, असे मत राष्ट्रीय पेशीविज्ञान केंद्राचे (एनसीसीएस) ज्येष्ठ सूक्ष्मजीव शास्त्रज्ञ डॉ. योगेश शौचे यांनी व्यक्त केले.

- २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेशाला अखेर मुहूर्त मिळाला; वाचा सविस्तर!

ज्योतिर्विद्या परिसंस्था या संस्थेच्या वतीने "लोणार सरोवरच्या पाण्यातील सुक्ष्मजीवांचे पैलू" या विषयावर आधारित सत्राचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी माहिती देताना ते बोलत होते. जगातील विविध भागांमध्ये असलेल्या समुद्र, सरोवर, नदी सारख्या पाण्याच्या स्रोतांमध्ये होणारे बदल याला प्रामुख्याने सूक्ष्मजीव (मायक्रोब) आणि खनिज कारणीभूत असतात, असे सांगताना डॉ. शौचे म्हणाले, "लोणार सरोवर पाण्याचे वैशिष्ट्य म्हणजे हे पाणी खार आणि अल्कधर्मी (अल्कली युक्त) असून यात भरपूर क्षार आहे.

जगात अश्या बऱ्याच खऱ्या पाण्याच्या सरोवर आहेत. तर काही विशिष्ट काळानंतर यांच्या पाण्याचे रंग बदलते. 'ड्युनेलिला सॅलीना' शेवाळ आणि हॅलोबॅक्टेरिया वर्गातील जिवाणू प्रामुख्याने रंगद्रव्य सोडतात. पाण्यातील क्षारांचे प्रमाण किंवा तापमान वाढले तर या प्रतिकूल परिस्थितीमध्ये हे सुक्ष्मजीवाणू रंगद्रव्य तयार करतात. त्यामुळे पाण्याचे रंग लाल किंवा गुलाबी दिसतो."

- 'राजकीय व्यवस्थेचे दुर्लक्ष होत असेल तर...'; काय म्हणाले राज्य सरकारचे निवृत्त प्रधान सचिव?

बऱ्याच वेळेला सुक्ष्मजीवाणू अश्या प्रकारचे रंगद्रव्य पाण्यात तयार करतात परंतु त्याचे प्रमाण कमी असल्याने पाण्याच्या रंगात फारसा फरक दिसून येत नाही. मात्र काही विशिष्ट परिस्थितीमध्ये जेव्हा रंगद्रव्य जास्त प्रमाणात तयार होतात तेव्हा पाण्याचा बदललेला रंग डोळ्याला सहजपणे दिसून येतो. एनसीसीएस मार्फत पूर्वी करण्यात आलेल्या लोणारच्या संशोधनातून पाण्यात हॅलोबॅक्टरीआ सूक्ष्मजीव असल्याचे निदर्शनास आले होते." 

"लोणारच्या पाण्याचा रंग बदलला असून याचा अभ्यास अजून पर्यंत झाला नाही. सुक्ष्मजीवांनी तयार केलेल्या रंगद्रव्याचा पाण्यावर काही हानिकारक परिणाम होत नाही. एनसीसीएस मार्फ़त या पाण्याचे नमुने मिळविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. नमुने मिळाल्यास आम्ही याचा अभ्यास करू. मात्र तेव्हाच या बाबतचे प्रश्न सुटतील."
- डॉ. योगेश शौचे, ज्येष्ठ सूक्ष्मजीव शास्त्रज्ञ, एनसीसीएस

- पीककर्ज वाटपाबाबत विभागीय आयुक्तांनी जिल्हाधिकाऱ्यांना काय केल्या सूचना?

पाण्याचे रंग बदलल्यामागे असा लावला जात आहे अंदाज
- यंदा उन्हाचे प्रमाण वाढल्याने सरोवराचे पाणी आटले
- पाणी असल्यामुळे क्षारांचे प्रमाणात वाढ
- क्षरांच्या प्रमाणात वाढ झाल्याने सुक्ष्मजीवांवर ताण निर्माण झाला व त्यामुळे रंगद्रव्य तयार झाले

पाण्यातील वातावरणात बदल दर्शविण्यासाठी सूक्ष्मजीव महत्वाचे
- पाण्यातील परिस्तिथीनुसार (तापमान, क्षार, अल्कधर्म, आम्लता) सूक्ष्मजीव वाढ करतात
- सुक्ष्मजीवांच्या प्रत्येक कार्यप्रणालीत होणारे बदल पाण्यात देखील बदल घडवून आणण्यास कारणीभूत असतात.
- त्यामुळे पाण्याचे वातावरण आणि स्वरूप बदललेले आहे याची पुष्टी करण्यात सूक्ष्मजीव महत्वाचे घटक ठरतात.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Micro organisms may have changed water colour of world famous Lonar Lake says Dr Yogesh Shauche