दूधभुकटी निर्यातीचा बट्ट्याबोळ

Sakal-Exclusive
Sakal-Exclusive

पुणे - दूध दराच्या अनुदानापाठोपाठ दूध भुकटी निर्यात प्रोत्साहन अनुदानाचीही सुमारे ५० कोटी रुपयांची थकबाकी राज्य सरकारकडे आहे. यामुळे राज्यातून अन्य देशांमध्ये होणाऱ्या भुकटी निर्यातीचा बट्ट्याबोळ झाला आहे. शिवाय निर्यात थांबल्याने भुकटीच्या उत्पादनावर मर्यादा आल्या असून, राज्यात दूध भुकटीच्या दरात प्रति किलोमागे सरासरी पन्नास रुपयांनी वाढ झाली आहे. 

गुजरातच्या धर्तीवर महाराष्ट्रातील दूध भुकटी निर्यातीस प्रोत्साहन देण्याची घोषणा राज्य सरकारने केली. त्यानुसार जानेवारी ते जून २०१८ या कालावधीत उत्पादित करण्यात आलेल्या भुकटीची निर्यात केल्यास, त्यासाठी प्रतिकिलो ५० रुपयांचे प्रोत्साहन अनुदानाची घोषणा विधिमंडळाच्या गतवर्षीच्या नागपूर अधिवेशनात सरकारने केली होती. या निर्णयानुसार गतवर्षी जानेवारी ते जून या कालावधीत उत्पादित झालेली सुमारे दहा हजार मेट्रिक टन (एक कोटी किलो) इतकी दूध भुकटी निर्यात झालेली आहे. 

‘अमूल’ची दूध भुकटी निर्यात वाढावी, या उद्देशाने गुजरात सरकारने या भुकटीच्या निर्यातीसाठी प्रतिकिलो ५० रुपयांचे प्रोत्साहन अनुदान देण्याचा निर्णय घेतला होता. आजही गुजरातमध्ये या निर्णयाची यशस्वी अंमलबजावणी केली जात आहे. महाराष्ट्राने गुजरातच्या याच निर्णयाची नक्कल करत, राज्यातील भुकटीलाही गुजरातइतकेच प्रोत्साहन अनुदान देण्याची घोषणा केली होती. राज्यात भुकटीचे उत्पादन अधिक आणि विक्री मात्र कमी होत होती. त्यामुळे भुकटीचे दर खूपच खाली आले होते. त्या पार्श्‍वभूमीवर हा निर्यातवाढीचा निर्णय घेण्यात आला होता. 

महाराष्ट्रात दूध भुकटीचे उत्पादन करणारे सुमारे ३२ दूध प्रकल्प आहेत. त्यात पुणे जिल्ह्यातील सोनाई दूध परिवार (ता. इंदापूर), डायनामिक्‍स (ता. बारामती) आणि गोवर्धन (ता. आंबेगाव) आदी प्रमुख दूध प्रकल्पांचा समावेश आहे. 

राज्य सरकारने दुधाच्या अनुदानापाठोपाठ भुकटीच्या निर्यातवाढीसाठी सुरू केलेले निर्यात प्रोत्साहन अनुदानही थकवले आहे. यामुळे राज्यातील दूध संस्था आणि दूध उत्पादक शेतकरी आर्थिकदृष्ट्या अडचणीत आले आहेत. त्यामुळे सरकारने या भुकटी व दूध अनुदानाची थकबाकी त्वरित अदा केली पाहिजे. 
- दशरथ माने अध्यक्ष, सोनाई दूध, इंदापूर 

व्यवहार तोट्यातच
दुधाचा प्रतिलिटर दर २० रुपये (अनुदान वगळता) आहे. दहा हजार लिटर दुधापासून ८५० किलो भुकटी होते. दुधाच्या विक्रीतून दोन लाख रुपये मिळू शकतात. त्याच दुधाच्या भुकटीच्या विक्रीतून (प्रतिकिलो १९० रुपयांप्रमाणे) १ लाख ६१ हजार ५०० रुपयेच मिळतात. भुकटीच्या दरात ५० रुपयांची वाढ करूनही दूध संस्थांना ३८, ५०० रुपयांचा तोटाच सहन करावा लागतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com