दूध उत्पादकांना गाईच्या दुधासाठी मिळनार प्रतिलिटर ३० रुपयेचा दर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Cow-Milk

दूध उत्पादकांना गाईच्या दुधासाठी मिळनार प्रतिलिटर ३० रुपयेचा दर

पुणे: राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना गाईच्या दुधाला सरसकट प्रतिलिटर ३० रुपये दर देण्याचा निर्णय राज्यातील सर्व सहकारी आणि खासगी दूध उत्पादक संघांनी घेतला आहे. या निर्णयामुळे यापुढे गाईच्या दुधाचा खरेदी दर यापुढे राज्यभर सारखाच राहणार आहे. या निर्णयाची येत्या मंगळवारपासून (१ मार्च) प्रत्यक्ष अंमलबजावणी केली जाणार आहे. राज्यातील शेतकऱ्यांना आता गाईच्या दुधासाठी किमान १ रुपया तर, कमाल तीन रुपयांची दरवाढ मिळणार आहे. खरेदी दरात वाढ झाली असली तरी विक्री दर कायम राहणार आहे. त्यामुळे पिशवीबंद दूध खरेदी करणाऱ्या ग्राहकाला एक रुपयाचाही भुर्दंड सोसावा लागणार नसल्याचे राज्यस्तरीय दूध समन्वय समितीचे सदस्य प्रकाश कुतवळ यांनी सांगितले.

हेही वाचा: Pune-Nashik Railway: सेमी हायस्पीड रेल्वे ४ वर्षांत धावणार

राज्य दूध उत्पादक व प्रक्रिया व्यावसायिक कल्याणकारी संघाची बैठक रविवारी (ता.२७) पुण्यात झाली. या बैठकीला राज्यभरातील सहकारी व खासगी दूध संघाचे मिळून २७ प्रतिनिधी उपस्थित होते. या बैठकीत एकमताने हा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे सध्या ३० रुपयांपेक्षा कमी दूध दर असलेल्या दूध संघाचे खरेदी दर वाढणार आहेत. कोरोनामुळे राज्यातील दूध उत्पादक शेतकरी आणि दूध संघही अडचणीत आले आहेत. शिवाय दुधाच्या उत्पादनात मोठी घट झाली आहे. परंतु सध्या दूध पावडर आणि लोणी (बटर) दरात वाढ झाली आहे. यामुळे दूध खरेदी दरात वाढ करण्यात आली

हेही वाचा: Pune-Mumbai Express: आरक्षित गाड्यांसाठी सीझन पास नाहीच

असल्याचेही कुतवळ यांनी स्पष्ट केले.

सद्यःस्थितीत गाईच्या दुधाला प्रतिलिटर किमान २७ रुपये तर, कमाल २९ रुपये इतका खरेदी दर मिळत आहे. त्यामुळे सध्या कमाल प्रतिलिटर २९ रुपये दर असलेल्या दूध संघाचा खरेदी दर आता ३० रुपये इतका होईल. पर्यायाने या दूध संघांकडून शेतकऱ्यांना प्रति लिटर १ रुपया दरवाढ मिळेल. याउलट किमान २७ रुपये दर असलेल्या दूध संघाचा खरेदी दर आता ३० रुपये होणार आहे. त्यामुळे अशा दूध संघांचा खरेदी दर प्रतिलिटर ३ रुपयांनी वाढणार आहे.

राज्य दूध उत्पादक व प्रक्रिया व्यावसायिक कल्याणकारी संघाचे राज्य अध्यक्ष गोपाळ म्हस्के यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला राज्य दूध समन्वय समितीचे सदस्य व ऊर्जा दूधचे प्रकाश कुतवळ यांच्यासह पुणे जिल्हा दूध संघ (कात्रज डेअरी), सोनई, महानंद, वारणा, गोकूळ, राजहंस, नंदन, एस. आर. थोरात दूध आदी प्रमुख दूध संघासह विविध २७ दूध संघांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

कात्रज डेअरीकडून ३ रुपयांची वाढ

पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाकडून शेतकऱ्यांना सध्या गाईच्या दुधाला प्रतिलिटर २७ रुपयांचा दर दिला जात आहे. या नव्या निर्णयामुळे कात्रज डेअरीला आता त्यांचा दूध दर ३० रुपये करावा लागणार आहे. यामुळे पुणे जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना आता १ मार्चपासून प्रतिलिटर ३ रुपयांची दरवाढ मिळू शकणार आहे.

विक्री दर कायम

दरम्यान, शेतकऱ्यांना दूध दर वाढ देताना, ग्राहकांना याची झळ बसू नये, याची खबरदारी घेण्यात आली आहे. त्यामुळे खरेदी दरात वाढ झाली असली तरी विक्री दर हा पूर्वीप्रमाणे कायम ठेवण्यात आला आहे. खरेदी दरात वाढ करण्यासाठी विक्रेता (डीलर) ते किमान किरकोळ किंमत (एम.आर.पी.) यातील तफावत दूर करण्यात आली आहे. यामुळे विक्रेत्यांचा नफा पूर्वीच्या तुलनेत कमी होणार आहे.

सद्यःस्थितीत राज्यातील दूध उत्पादन कमी झाले आहे. त्यातच बटर (लोणी) आणि दूध पावडरच्या दरात वाढ झाली आहे. शिवाय राज्याबाहेरील दूध संस्था येथील दूध परराज्यात घेऊन चालल्या आहेत. या पार्श्‍वभूमीवर राज्यात दूध कमी पडू लागले आहे. दुधाची ही तूट भरून काढण्यासाठी दर वाढ केली आहे.

प्रकाश कुतवळ सदस्य, राज्य दूध समन्वय समिती.

Web Title: Milk Producers Get Rs 30 Per Liter Cow Milk

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..