Criminal
Criminal

अल्पवयीन मुले गुन्हेगारीकडे वळतात

शहरात सराईतांनी गाठला वर्षाअखेर ३३२ चा आकडा 
पिंपरी - वय कमी असल्याने गुन्हा केला तरी फारशी शिक्षा होत नाही, हे माहीत असल्याने अल्पवयीन मुले गुन्हेगारीकडे वळत आहेत. कमी वयातच गुन्हे करण्यात तरबेज झाल्यामुळे ते वयाच्या अठरा वर्षांनंतर गुन्हेगारी कारवाया सुरूच ठेवतात. त्यानंतर त्यांच्यावर सराईत गुन्हेगाराचे ‘लेबल’ लागते.

अशाच सराईत गुन्हेगारांचे प्रमाण वाढत आहे. सध्या आयुक्तालयातील १५ पोलिस ठाण्यात एकूण १८४ अल्पवयीन गुन्हेगारांची नोंद आहे, तर कमी वयातून पुढे सराईत गुन्हेगार बनलेल्यांचा या वर्षातील आकडा तब्बल ३३२ एवढा आहे.

दोनपेक्षा अधिक गुन्हे दाखल असलेल्या गुन्हेगाराला सराईत गुन्हेगार बोलले जाते. त्यात पूर्वी २० ते २२ वर्षांपुढील गुन्हेगारांचा समावेश असल्याचे दिसून येत होते; परंतु सध्या अठरा वर्षे पूर्ण झालेला युवक काही दिवसांतच सराईत गुन्हेगार म्हणून पोलिसांच्या रेकॉर्डवर येत आहे. त्यांना तडीपार, स्थानबद्ध, मोका अशा कारवायांना सामोरे जावे लागत आहे. वाहन तोडफोड, लूटमार यांसह खून, बलात्कारसारख्या गंभीर गुन्ह्यांमध्येही अल्पवयीन मुलांचा समावेश दिसून येतो. विविध ठाण्यांमध्ये दाखल होणाऱ्या गुन्ह्यांमध्ये त्यांचा सहभाग वाढत असून, छोट्या गुन्ह्यांसह गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांतही त्यांचा सक्रिय सहभाग असतो. मुलांच्या चुकीच्या वागणुकीकडे काणाडोळा केला जातो. मुलाची संगत कोणाबरोबर आहे, दिवसभर तो काय करतो, रात्री उशिरापर्यंत बाहेर थांबतो का, याकडे गांभीर्याने पाहिले जात नाही. एखादी घटना घडल्यानंतरच पालकांना जाग येते.

सध्याच्या अल्पवयीन मुलांमध्ये आक्रमकता वाढली असून, यासाठी मुले व पालकांमध्ये संवाद व्हायला हवा. एखाद्या गोष्टीबाबत मुलाला शिक्षा करताना त्यातून मुलांमध्ये चीड, राग निर्माण होऊ नये, त्यासाठी त्याचे मतपरिवर्तन करण्याची गरज आहे. यामुळे मुले गुन्हेगारी क्षेत्राकडे जाण्यास आळा बसू शकेल. 
- वंदना मांढरे, समुपदेशक

ती वेळच येऊ नये
अतिरिक्त पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे म्हणाले, ‘‘काही मुलांना युवा अवस्थेतच गुन्हेगारी क्षेत्राचे आकर्षण निर्माण झालेले असते. यासाठी पालकांनी मुलांकडे बारकाईने लक्ष देणे गरजेचे आहे. गुन्हा केल्यानंतर कोणीही असो त्याच्यावर कायदेशीर कारवाई केलीच जाते. मात्र, ती वेळच येऊ नये, यासाठी खबरदारी घेणे आवश्‍यक आहे. कमी वयातच एखादा गुन्हा केल्यास गुन्हेगारीचा शिक्का पडतो. यामुळे संपूर्ण आयुष्याचे नुकसान होते.’’ 

दत्तक योजना
अल्पवयीन गुन्हेगारांचे पुनर्वसन करण्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाकडून दत्तक योजना राबविली जात आहे. पोलिस कर्मचाऱ्याने गुन्हेगाराला दत्तक घेतल्यानंतर त्याच्यावर बारकाईने लक्ष ठेवणे. गुन्हेगारी कारवायांपासून परावृत्त करण्यासाठी मार्गदर्शन करण्यासह सामाजिक संस्थांच्या मदतीने त्याला रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी सहकार्य केले जाते. 

‘क्राइम माइंडेड’मुळे धोका
अल्पवयीन गुन्हेगारांची बालसुधार गृहात रवानगी करण्यात येते. मात्र, ही प्रभावात्मक कारवाई नसल्याने त्यांच्यात बदल होत नाही. कायद्याची भीती राहिलेली नसते. त्यामुळे ‘क्राइम माइंडेड’ झालेली ही मुले गंभीर गुन्हे करतानाही धजावत आहेत. मात्र, अठरा वर्षांनंतर केलेल्या गुन्ह्यात कारागृहात रवानगी झाल्यानंतर जामीन होत नाही. महिनोन्‌महिने कारागृहात काढावे लागतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com