Pune : सिंहगडाच्या पायथ्याशी वन विभागाच्या तपासणी नाक्यावर कर्मचाऱ्यांकडून गैरप्रकार

उपद्रवशुल्क घेतले मात्र पावती नाही; सीसीटीव्ही तपासण्याची पर्यटकांची मागणी
misconduct by forest department staff check post of Sinhagad Nuisance charges
misconduct by forest department staff check post of Sinhagad Nuisance chargesSakal

सिंहगड: सिंहगडाच्या पायथ्याशी गोळेवाडी येथील वन विभागाच्या तपासणी नाक्यावर उपद्रव शुल्क गोळा करणारे कर्मचारी पैसे तर सक्तीने वसूल करत होते मात्र गर्दी असल्याने अनेकांना पावती न देताच जाऊ देत होते असा आरोप पर्यटकांनी केला आहे. तपासणी नाक्यावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी करण्यात यावी त्यातून वन विभागाच्या कर्मचाऱ्यांचे 'कारनामे' उघड होतील अशी मागणीही पर्यटकांनी केली आहे. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी मात्र चौकशी करण्याच्या अगोदरच पर्यटकांनी केलेले आरोप फेटाळले आहेत.

सिंहगडावर जाण्यासाठी दुचाकी वाहणास पन्नास व चारचाकी वाहनास शंभर रुपये 'उपद्रव शुल्क' आकारण्यात येते. वन विभागाने उपद्रव शुल्क गोळा करण्यासाठी घाट रस्त्यावरील गोळेवाडी व कोंढणपूर फाटा येथे तपासणी नाके उभारलेले आहेत. कर्मचारी येणाऱ्या वाहनांना थांबवून त्यांच्याकडून वाहनाच्या प्रकारानुसार उपद्रव शुल्क घेतात.

उपद्रव शुल्क घेतल्यानंतर संबंधित पर्यटकाला मशीमधून पावती दिली जाते. जाणीवपूर्वक पावती न देणे किंवा मशिनमध्ये फेरफार करणे असे आरोप यापूर्वी स्थानिक नागरिक सातत्याने करत होते मात्र आता थेट पर्यटकांनी वन विभागाच्या कर्मचाऱ्यांवर गैरप्रकाराचे आरोप केले असून सत्यता पडताळून पाहण्यासाठी तपासणी नाक्यावरील सीसीटीव्ही कॅमेरे तपासण्याची मागणी केली आहे.

याबाबत सिंहगडचे वनरक्षक बळीराम वायकर यांच्याकडे विचारणा केली असता चौकशी करण्याची तसदी न घेता 'असं होतच नाही' असे म्हणत त्यांनी हात वर करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे वन विभागाचे वरिष्ठ अधिकारी याबाबत चौकशी करुन दोषींवर कारवाई करुन सुरू असलेले गैरप्रकार थांबविणार का? हे पाहणे महत्त्वाचे आहे.

ऑनलाईन साठीही कर्मचारी उदासीन.......... 'सकाळ'ने पर्यटकांची गैरसोय निदर्शनास आणून देऊन सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर वन विभागाने काही दिवसांपूर्वी ऑनलाईन पद्धतीने उपद्रव शुल्क जमा करण्याची सुविधा उपलब्ध केली आहे मात्र कर्मचारी स्कॅनर बाहेर न ठेवता खोलीत ठेवतात. 'पावसामुळे स्कॅनर भिजतो' असे कारण कर्मचारी सांगताना दिसतात. उपद्रव शुल्क 'रोख' मिळावे यासाठी आग्रही असलेले कर्मचारी ऑनलाईन पद्धतीने उपद्रव शुल्क घेण्याबाबत उदासीन असल्याचे दिसतात.

"आम्ही सकाळी बाईक रॅली घेऊन सिंहगडावर गेलो होतो. आमचा 19 जणांचा ग्रुप होता. आम्ही नऊ वाजता वन विभागाच्या नाक्यावर पोचलो तेव्हा दोन कर्मचारी शुल्क घेत होते. आमच्याकडून त्यांनी नऊशे पन्नास रुपये घेतले पण पावती दिली नाही. संबंधीत कर्मचारी पैसे घेऊन बाजूला गेले. पण त्यांनी आम्हाला पावतीच दिली नाही. आमची रॅली असल्यामुळे जास्त वेळ न घालवता आम्ही तसेच पुढे गेलो."

प्रकाश कदम, खडकवासला

"वन विभागाच्या नाक्यावर आज पर्यटकांची खूप गर्दी होती आणि पैसे घेण्यासाठी दोनच कर्मचारी होते. ते पावतीसाठी मशीन घेऊन उभे होते पण दहा पैकी पाच जणांनाच ते पावती देत होते. आमच्या ग्रुपकडून त्यांनी कॅश घेतली पण शेवटपर्यंत पावती दिली नाही. हा सगळा प्रकार तेथील सीसीटीव्हीमध्ये आला आहे. कृपया वन विभागाने त्याची तपासणी करावी."

अक्षय खरात, कर्वेनगर

"तपासणी नाक्यावर पैसे घेऊन पावती न देणे असा प्रकार होत नाही. प्रत्येक पर्यटकाला उपद्रव शुल्क घेतल्यानंतर पावती देण्यात यावी असे कर्मचाऱ्यांना सांगण्यात आलेले आहे."

बळीराम वायकर, वनरक्षक सिंहगड.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com