हरवलेल्या मुलाची पोलिस व पत्रकारांच्या तत्परतेने झाली नातेवाईकांशी भेट

डॉ. संदेश शहा
Friday, 30 October 2020

दोन दिवसांपासून इंदापूर बसस्थानक आवारात फिरत असलेल्या अनोळखी, अल्पवयीन १४ वर्षीय मुलाची इंदापूर पोलीस व पत्रकारांच्या तत्परतेने नातेवाईकांशी भेट झाली.

इंदापूर : दोन दिवसांपासून इंदापूर बसस्थानक आवारात फिरत असलेल्या अनोळखी, अल्पवयीन १४ वर्षीय मुलाची इंदापूर पोलीस व पत्रकारांच्या तत्परतेने नातेवाईकांशी भेट झाली.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

इंदापूर बसस्थानक परिसरात (ता. ३० ऑक्टोबर) रोजी पत्रकार जितेंद्र जाधव यांना सदर मुलगा संशयीतरित्या फिरत असल्याचे दिसून आल्याने त्यांनी मुलाशी संवाद साधला असता मुलगा गावाकडची वाट चुकल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी तातडीने त्या मुलाला इंदापूर पोलिस ठाण्यात आणले.

इंदापूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक नारायण सारंगकर व त्यांच्या सहकारी पोलीस कर्मचाऱ्यांनी त्या मुलाशी चर्चा केल्यानंतर तो जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर इंदापूर पोलिसांनी तपास सुरू केला असता त्यांना माळशिरस (जि. सोलापूर ) पोलीस ठाण्याकडून या मुलाच्या बाबत सकारात्मक माहिती मिळाली. मुलाच्या नातेवाईकांनी दाखल केलेल्या तक्रारीवरुन मोटेवाडी (ता. माळशिरस) येथील ऊस तोडणीसाठी आलेल्या ऊसतोड कामगाराचा मुलगा दोन दिवसांपासून बेपत्ता असल्याचे समजले.

त्याआधारे इंदापूर पोलिस ठाण्याने इंदापूर येथे मुलगा सापडल्याची माहिती नातेवाईकांना देताच मुलाचे चुलते या मुलाला नेण्याकरिता आले. मुलाची व नातेवाईकाची खातरजमा झाल्यानंतर मुलगा त्यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. इंदापूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक नारायण सारंगकर, पत्रकार जितेंद्र जाधव, हवालदार अरुण रासकर, पोलिस कॉन्स्टेबल विजय झारगड, पोलिस काॅन्सटेबल गायकवाड यांचे विशेष कौतुक होत आहे.

हे वाचा - इंटरनेटच्या मायाजालात गुरफटले जग

 

पत्रकार व पोलिसांचा सत्कार- हरवलेल्या मुलाची नातेवाईकांशी गाठ घालून दिल्यानंतर नातेवाईकांनी गाठ घालून देणाऱ्या सर्वांचा सत्कार केला. मात्र पोलीस निरीक्षक नारायण सारंगकर यांनी त्यांच्याऐवजी मुलाचा सत्कार करून हे आमचे कर्तव्य असल्याचे दाखवून दिले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The missing boy was met by relatives due to police and journalists