Corona Updates: 'मिशन १०० डेज'; पुणे जिल्ह्यात लसीकरण मोहिमेचा वेग वाढणार

corona_vaccination
corona_vaccination

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यातील वाढता कोरोना संसर्ग रोखण्यासाठी लसीकरण हाच मुख्‍य पर्याय असल्याचा निष्कर्ष आरोग्य विभागाने काढला आहे. त्यामुळे जिल्ह्यात लसीकरणासाठी अधिक गती देण्याचा निर्णय पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी घेतला आहे. यासाठी जिल्ह्यात शुक्रवार (ता.२)पासून ‘मिशन १०० डेज’ ही खास मोहीम सुरु करण्यात आली आहे. या मोहिमेअंतर्गत रोज किमान १ लाख डोस दिले जाणार आहेत. याशिवाय येत्या सोमवारी (ता. ५) १ लाख १० हजार डोस देण्याचे उद्दिष्ट निश्‍चित ठेवण्यात आले आहे.

येत्या सोमवारी दिल्या जाणाऱ्या एकूण डोसपैकी सर्वाधिक ४५ हजार डोस हे
जिल्ह्याच्या ग्रामीण भागात, त्यापाठोपाठ ३५ हजार डोस पुणे शहरात आणि
पिंपरी चिंचवडमध्ये ३० हजार डोस पूर्ण करण्याचा आदेश विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिला आहे.

शहर आणि जिल्ह्यात दिवसेंदिवस नवीन कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या
प्रमाणात वाढू लागली आहे. येत्या आठवडाभरात रोजच्या नवीन रुग्णांचा आकडा हा किमान दहा हजार किंवा त्याहून अधिक होण्याची शक्यता आरोग्य विभागाकडून वर्तविण्यात आली आहे. याला आळा घालण्यासाठी अधिकाधिक नागरिकांना कोरोना लस देणे, हाच एकमेव प्रभावी पर्याय उपलब्ध असल्याचे आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांनी सौरभ राव यांना सांगितले आहे.

केंद्र शासनाच्या धोरणानुसार १ एप्रिलपासून लसीकरणाचा तिसरा टप्पा चालू
झाला आहे. या टप्प्यात किमान ४५ वर्ष व त्यापुढील सर्व नागरिकांना सरसकट कोरोना लस देण्यात येत आहे. या लसीकरणासाठी पुणे जिल्ह्यात सुमारे ३० लाख नागरिक पात्र आहेत. या सर्वांचे लसीकरण येत्या महिनाभरात पूर्ण केले जाणार आहे. यामुळे लसीकरणाचा वेग रोज ५० हजारांवरून १ लाखावर नेणे आवश्‍यक आहे. त्यामुळे ही नवी मोहीम सुरू करण्यात आली आहे.

पुणे जिल्ह्यातील कोरोना लसीकरणाचा वेग वाढविण्यासाठी काय उपाययोजना करता येतील, याचा आढावा घेऊन त्यावर निर्णय घेण्यासाठी आयुक्त राव यांनी शनिवारी ऑनलाइन बैठक घेतली. या बैठकीत सरकारी यंत्रणांबरोबरच
लोकप्रतिनिधी, सामाजिक संघटना, औद्योगिक संघटना आदींना लसीकरण मोहिमेत सहभागी करून घेण्याचे ठरले. भारतीय जैन संघटना, मराठा चेंबर आॅफ कॅामर्स, इंडस्ट्रीज आणि अॅग्रीकल्चर यांनी सक्रिय योगदान देण्याचे प्रस्तावित केले आहे.

या बैठकीला पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार, पिंपरी चिंचवड मनपा
आयुक्त राजेश पाटील, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, जिल्हा परिषदेचे
मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, शांतिलाल मुथा, सुधीर मेहता आदी
उपस्थित होते. भारतीय जैन संघटना व मराठा चेंबरकडून नागरिकांमध्ये
लसिकरणाबाबत जाणीव जागृती करणे, केंद्रावर स्वयंसेवक उपलब्ध आदी कामे केली जाणार आहेत.

- जिल्ह्यातील ४५ वर्षांपुढील व्यक्तींची संख्या - सुमारे ३० लाख
- यापैकी पुणे शहरातील पात्र व्यक्ती - सुमारे ११ लाख
- पिंपरी चिंचवडमधील लाभार्थी - सुमारे ७ लाख
- जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील पात्र व्यक्ती - १२ लाख.
- जिल्ह्यात आतापर्यंत पूर्ण झालेले एकूण लसीकरण - ८ लाख ७७ हजार ६१२
- पुणे शहरात पूर्ण झालेले लसीकरण - ३ लाख ८४ हजार २२७
- पिंपरी चिंचवडमधील पूर्ण झालेले लसीकरण - १ लाख ५८ हजार ६०५
- ग्रामीण भागातील लसीकरण - ३ लाख ३४ हजार ७८०.

- पुणे शहर आणि जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com