साडेपाचशे किलो भेसळयुक्त बर्फी जप्त

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 12 ऑक्टोबर 2019

दिवाळीनिमित्त बाजारात विक्रीसाठी येणारी साडेपाचशे किलो भेसळयुक्त बर्फी अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) शुक्रवारी निमगाव केतकी (ता. इंदापूर) येथून जप्त केली. या बर्फीचे नमुने तपासण्यासाठी राज्य आरोग्य प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले आहेत.

पुणे - दिवाळीनिमित्त बाजारात विक्रीसाठी येणारी साडेपाचशे किलो भेसळयुक्त बर्फी अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) शुक्रवारी निमगाव केतकी (ता. इंदापूर) येथून जप्त केली. या बर्फीचे नमुने तपासण्यासाठी राज्य आरोग्य प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले आहेत. 

निमगाव केतकी येथे महेश भरत फुटाणे यांच्या मालकीच्या शुभम मिल्क प्रॉडक्‍ट्‌समध्ये भेसळयुक्त बर्फीचे उत्पादन करण्यात येत होते. याची माहिती ‘एफडीए’ला मिळाली. त्या आधारावर प्रशासनाने या कंपनीवर शुक्रवारी छापा टाकला. या कंपनीत दूध किंवा खव्यापासून बर्फी तयार न करता रिफाइंड सूर्यफूल, वनस्पती तेल व स्कीम्ड मिल्क पावडरमध्ये साखर टाकून भेसळयुक्त बर्फी तयार केल्याचे आढळले, अशी माहिती ‘एफडीए’चे सहआयुक्त बा. म. ठाकूर यांनी दिली. 

या कंपनीतून ५४५ किलो बर्फी जप्त करण्यात आली आहे. तिची बाजारातील किंमत ८१ हजार ७५० रुपये आहे. या बर्फीचे नमुने तपासण्यासाठी राज्य आरोग्य प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले आहेत. पुढील सूचना मिळेपर्यंत बर्फीचे उत्पादन बंद ठेवण्याची सूचना कंपनीला केली आहे, असे ठाकूर त्यांनी नमूद केले. ही कारवाई सहआयुक्त संपत देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक आयुक्त अर्जुन भुजबळ आणि अन्न सुरक्षा अधिकारी शुभांगी अंकुश यांनी केली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mixing Barfi seized crime