महात्मा फुले जन आरोग्य योजनेत सहभागी व्हा, अन्यथा...: कोणी दिला खाजगी रुग्णालयांना इशारा?

जनार्दन दांडग
रविवार, 2 ऑगस्ट 2020

कोरोनाबाधित रुग्णांना मोफत उपचार मिळावेत यासाठी जिल्हा परीषदेच्या आरोग्य विभागाने हवेली तालुक्यातील विविध भागातील चौदा खाजगी रुग्णालये ताब्यात घेतली आहेत मात्र, या चौदा पैकी नवले (नऱ्हे), विश्वराज (लोणी काळभोर) व केअर (वाघोली) अशी तीनच तीन रुग्णालये महात्मा फुले जन आरोग्य योजनेत सहभागी असल्याने, वरील तीन रुग्णांलयातच कोरोनावरील उपचार मोफत मिळत आहेत. उर्वरीत अकरा रुग्णालयात कोरोना बाधित रुग्णांना चार हजारापासून सात हजार रुपये दिवसाला मोजावे लागत आहेत. या पार्श्वभूमीवर आमदार अशोक पवार यांनी वरील इशारा दिला आहे.

लोणी काळभोर (पुणे) : कोरोनाबाधित रुग्णांना मोफत उपचार मिळावेत यासाठी आरोग्य विभागाने अधिगृहीत केलेल्या हवेली तालुक्यातील चौदा पैकी तब्बल अकरा खाजगी रुग्णालयात कोरोना बाधित रुग्णांना मोफत मिळत नाहीत ही बाब अतिशय गंभीर आहे. आरोग्य विभागाने अधिगृहीत केलेल्या सर्वच खाजगी रुग्णालयांनी शासनाच्या महात्मा फुले जन आरोग्य योजनेत त्वरीत सहभागी व्हावे असे कळकळीचे आवाहन आमदार अशोक पवार यांनी केले आहे. 

बदल्यांचा मुहूर्त काही लागेना; कारागृह अधिकारी-कर्मचारी झाले हवालदिल!​
दरम्यान, आरोग्य विभागाने अधिगृहीत केलेल्या हवेली तालुक्यातील खाजगी रुग्णालयांना महात्मा फुले जन आरोग्य योजनेत सहभागी होण्यास काही अडचणी येत असतील तर, आमदार या नात्याने खाजगी रुग्णालयांना सर्वतोपरी मदत करण्याची तयारीही आहे. एखाद्या रुग्णालयाने जाणीवपुर्वक वरील योजनेत सहभागी होण्यास टाळाटाळ करण्याचा प्रयत्न केल्यास, संबधित रुग्णालयांवर कायदेशीर कारवाई करण्यास मागे-पुढे पाहणार नाही, असा इशाराही आमदार अशोक पवार यांनी खाजगी रुग्णालयांना दिला आहे. 

कोरोना बाधित रुग्णांना मोफत उपचार मिळावेत यासाठी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने हवेली तालुक्यातील विश्वराज (लोणी काळभोर), नवले (नऱ्हे), प्रयागधाम (कोरेगाव मुळ), महेशस्मृती (शेवाळेवाडी), लाईफलाईन (वाघोली), आयमॅक्स (वाघोली), केअर (वाघोली), श्लोक (शिवापुर), शिवम (कदमवाकवस्ती), पल्स (नऱ्हे), भारत संस्कृती (वाघोली), चिंतामणी (कोरोगाव मुळ), योग (मांजरी बुद्रुक) व लोटस (शेवाळेवाडी) अशी हवेली तालुक्याच्या विविध भागातील चौदा खाजगी रुग्णालये ताब्यात घेतली आहेत. मात्र या चौदा पैकी नवले (नऱ्हे), विश्वराज (लोणी काळभोर) व केअर (वाघोली) अशी तीनच तीन रुग्णालये महात्मा फुले जन आरोग्य योजनेत सहभागी असल्याने, वरील तीन रुग्णांलयातच कोरोनावरील उपचार मोफत मिळत आहेत. उर्वरीत अकरा रुग्णालयात कोरोनाबाधित रुग्णांना चार हजारापासून सात हजार रुपये दिवसाला मोजावे लागत आहेत. या पार्श्वभूमीवर आमदार अशोक पवार यांनी वरील इशारा दिला आहे.

पुणेकरांनो, शहरातील दूध पुरवठ्याबाबत आलंय महत्त्वाचं अपडेट; वाचा सविस्तर बातमी​

याबाबत अधिक माहिती देतांना आमदार अशोक पवार म्हणाले, कोरोनावरील उपचार मिळणे ही बाब नागरीकांचा हक्क आहे. यामुळेच शासनाने खाजगी रुग्णालये अधिगहीत केलेली आहेत. खाजगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांचे बिल शासन महात्मा फुले जन आरोग्य योजनेतून देत आहे. मात्र आरोग्य विभागाने अधिगृहीत केलेली रुग्णालयेवरील योजनेत नसल्याने, रुग्णांना उपचाराचा भुर्दंड सहन करावा लागत आहे ही बाब अतिशय गंभीर आहे. या संदर्भात येत्या दोन दिवसातच जिल्हाधिकारी नवल किशोर राम व जिल्हा परीषदेचे कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांची भेट घेऊन, आरोग्य विभागाने अधिगृहीत केलेल्या मात्र वरील योजनेत सहभागी नसलेल्या अकरा खाजगी रुग्णालयांना सहभागी करुन घेण्याबाबतची विनंती करणार आहे. 

याबाबत बोलतांना हवेली पंचायत समितीचे आरोग्य अधिकारी डॉ. सचिन खरात म्हणाले, आरोग्य विभागाने अधिगृहीत केलेल्या सर्व खाजगी रुग्णालयांना महात्मा फुले जन आरोग्य योजनेत सहभागी होण्याबाबतच्या सुचना यापुर्वीच केलेल्या आहेत. तर दुसरीकडे यापुर्वी खाजगी रुग्णालयात उपचार घेतलेल्या रुग्णांना जिल्हा परीषदेच्या माध्यमातून पंचविस हजारापासून एक लाख रुपयापर्यंत अर्थसहाय्य मिळावे यासाठी, डॉ. रखमाबाई राऊत अर्थसहाय्य योजना चालू करण्याबाबत जिल्हा परिषदेकडे पाठपुरावा चालू आहे.

कोरोनाचे उपचार घेणाऱ्या महिलेचा वॉर्डबॉयने केला विनयभंग; पुण्यात घडला धक्कादायक प्रकार!​


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MLA Ashok Pawar warns private hospitals Participate in Mahatma Phule Jan Arogya Yojana