बदल्यांचा मुहूर्त काही लागेना; कारागृह अधिकारी-कर्मचारी झाले हवालदिल!

Yerwada_Jail
Yerwada_Jail

पुणे : राज्य सरकारने विविध विभागातील १५ टक्के अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची बदली करण्याचे आदेश दिले आहेत. तर दुसरीकडे राज्य कारागृह विभागाने उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार कोरोनामुळे बदल्या करता येत नसल्याचे स्पष्ट केले आहे. विविध कारणामुळे अगोदरच त्रस्त असणारे कारागृह अधिकारी आणि कर्मचारी बदल्याच होत नसल्यामुळे आणखीनच त्रस्त झाल्याची सद्यस्थिती आहे.

राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असताना राज्य सरकारने विविध खात्यातील बदल्या थांबविल्या होत्या. मात्र ७ जुलै रोजी राज्य सरकारने विविध खात्यामध्ये १५ टक्के बदल्या करण्यात येणार असल्याचा आदेश काढला. बदल्यासाठी १० ऑगस्टपर्यंत मुदतवाढही दिली. त्यानुसार, विविध खात्यांनी आपापल्या अधिकारी आणि कर्मचारी यांच्या बदल्या करण्याच्या सूचना दिल्या. मात्र, राज्य कारागृह विभागाकडून अद्याप बदल्या करण्यात आलेल्या नाहीत.

राज्य कारागृह विभागाने २० जुलै रोजी सार्वत्रिक आणि विनंती बदल्या करण्यासाठी २१ जुलै रोजी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे अर्ज मागविले, तसेच कारागृह अधीक्षक त्यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरंन्सिगद्वारे संवाद साधतील असेही सांगितले. मात्र कारागृह प्रशासनाने उच्च न्यायालयाचा दाखला देत २७ जुलै रोजी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या बदल्या करता येणार नसल्याचे परिपत्रक काढले. त्यामुळे बदलीच्या प्रतिक्षेत असणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्या पुन्हा एकदा हिरमोड झाल्याची सद्यस्थिती आहे.

सध्याच्या नियुक्तीच्या ठिकाणी कामाची तीन वर्ष पूर्ण होणे, मुलांचे शिक्षण, वृद्ध आई-वडीलांचे आजारपण यासह विविध प्रकारच्या कौटुंबिक अडचणींना सामोरे जावे लागत असल्याची अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या बदलीची कारणे आहेत.

"कोरोनामुळे कारागृह विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या जात नाहीत. तसेच त्याविषयी उच्च न्यायालयानेही आपल्या आदेशात नमूद केले आहे."
- सुनील रामानंद, अपर पोलिस महासंचालक, राज्य कारागृह विभाग

"कारागृह विभागातील अधिकारी आणि कर्मचारी यांच्या बदल्याच करू नयेत, असे न्यायालयाने म्हटलेले नाही. तर जिथपर्यंत होईल, तिथपर्यंत बदल्या करता येतील, असे न्यायालयाने नमूद केले आहे."
- अॅड. मिहिर देसाई

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com