धुमशान ग्रामपंचायतीचं : निवडणुका बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न करा : आमदार बेनके

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 19 December 2020

शिवसेनेचे अस्तित्व टिकवण्यासाठी आणि आगामी बाजार समिती, जिल्हा परिषद निवडणुकांची पायाभरणी करण्यासाठी ग्रामपंचायत निवडणुक स्वबळावर लढवण्याची मागणी शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी बैठकीत केली.

नारायणगाव (पुणे) : ग्रामपंचायत ही गावच्या विकासाचा केंद्रबिंदू आहे. ग्रामस्थांमध्ये एकजुट राहिल्यास गावच्या विकासाला चालना मिळते. स्थानिक कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन जुन्नर तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुका बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न करावा, असे आवाहन आमदार अतुल बेनके यांनी केले आहे.

'आयटीयन्स'च्या हृदयाचे वाढले ठोके;बैठ्या कामामुळे वाढल्या आरोग्याच्या तक्रारी

जुन्नर तालुक्यातील १४२ पैकी ६७ ग्रामपंचायतीच्या निवडणूका १५ जानेवारी रोजी होत आहेत. निवडणुका होणाऱ्या बहुतेक ग्रामपंचायती बागायती भागातील आहेत. २३ डिसेंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात होणार आहे. यामुळे इच्छुकांनी सध्या मोर्चे बांधणी सुरू केली आहे. पॅनेल प्रमुखाची निवड, पॅनेलचे नाव, संभाव्य उमेदवार या बाबतच्या गुप्त बैठका सुरू आहेत. तरुण कार्यकर्ते आणि त्यांचे समर्थक यांच्यामध्ये सध्या उत्सहाचे वातावरण आहे. शिवसेना उपनेते, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, माजी आमदार शरद सोनवणे यांच्या उपस्थितीत १७ डिसेंबर रोजी नारायणगाव येथे  झालेल्या बैठकीत स्वबळावर निवडणूक लढवण्याची भूमिका जाहीर केली.

हेही वाचा - केंद्राच्या नवीन निर्यात धोरणांमुळे शेतकऱ्यांचा फायदा ; जास्तीतजास्त साखर निर्यात आणि अधिक भाव

शिवसेनेचे अस्तित्व टिकवण्यासाठी आणि आगामी बाजार समिती, जिल्हा परिषद निवडणुकांची पायाभरणी करण्यासाठी ग्रामपंचायत निवडणुक स्वबळावर लढवण्याची मागणी शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी बैठकीत केली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून शिवसेना कार्यकर्त्यांचे खच्चीकरण केले जात आहे. राज्यात महाआघाडीची सत्ता असून देखील स्थानिक पातळीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आचारसंहितेचे पालन केले जात नाही. अमिष दाखवून शिवसेना कार्यकर्ते फोडले जात असल्याचा आरोप यावेळी तालुका प्रमुख माऊली खंडागळे यांनी केला.  

भारतीय जनता पक्ष  ग्रामपंचायत निवडणूका स्वबळावर लढविणार असल्याची भूमिका तालुका अध्यक्ष संतोष तांबे यांनी जाहीर केली आहे. निवडणूक लढवण्याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपाध्यक्ष मकरंद पाटे यांची तयारी सुरू आहे. तालुक्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांची ताकद तुल्यबळ आहे. गेली अनेक वर्षे  दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते एकमेकांच्या विरोधात लढत आहेत. ग्रामपंचायत निवडणूक स्वबळावर लढवण्याचा नारा आढळराव पाटील यांनी दिल्याने शिवसेना कार्यकर्ते निवडणूक तयारीला लागले आहेत.

Sakal Impact: अखेर शिंदे कुटुंबाला मिळाला न्याय; मंत्रालयापासून तलाठी कार्यालयापर्यंत उडाली होती खळबळ​

या पार्श्वभूमीवर आमदार बेनके यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, ग्रामपंचायत निवडणूक पक्ष चिन्हावर लढवली जात नसून स्थानिक पातळीवर होत असते. ग्रामपंचायत निवडणुकीमुळे गावा-गावात भांडणे निर्माण होतात. याचा परिणाम गावच्या विकासावर होत असतो.सध्या कोरोना संकट आहे. शेतकरी अडचणीत सापडला आहे. या परिस्थितीत ग्रामस्थांनी मतभेद बाजूला ठेवून निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न करावा.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited By: Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MLA Atul Benke has appealed that to hold Gram Panchayat elections unopposed in Junnar taluka