पुणे : वारजे येथील सर्व्हिस रोडवरील वाहतुकीत प्रयोग नको : तापकीर

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 1 नोव्हेंबर 2019

वारजे-माळवाडी येथील महामार्गालगतच्या सर्व्हिस रस्त्यावर एकेरी वाहतूक केल्यामुळे नागरिकांना त्रास होत असून, वळसा घालून यावे लागत आहे.

वारजे माळवाडी : वारजे-माळवाडी येथील महामार्गालगतच्या सर्व्हिस रस्त्यावर एकेरी वाहतूक केल्यामुळे नागरिकांना त्रास होत असून, वळसा घालून यावे लागत आहे. याबाबत आमदार भीमराव तापकीर यांनी आज शुक्रवारी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व वाहतूक पोलिस यांची बैठक घेतली. या परिसरातील नागरिकांच्या सूचना लक्षात घेऊन वाहतुकीत बदल करावा, अशा विविध सूचना दिल्या आहेत. 

वारजे येथील राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या कार्यालयात आमदार तापकीर यांनी ही बैठक घेतली. प्राधिकरणाचे प्रकल्प समन्वयक सुहास चिटणीस, वारजे वाहतूक विभागाचे सहायक पोलिस निरीक्षक चंदनशिवे, उपस्थित होते. 

यावेळी माजी नगरसेवक किरण बारटके, वासुदेव भोसले, संजय वाल्हेकर, स्वीकृत सदस्य सचिन दांगट, दत्तात्रय चौधरी, माऊली ठाकर, प्रवीण पाटील, बाळासाहेब हिंगणे, जगन्नाथ चौधरी, चंद्रशेखर देशमुख, विजय हाडके, योगेश लिमये, काका वाघमारे, राजाभाऊ पासलकर यावेळी उपस्थित होते. 

महामार्गाच्या पूर्वेच्या सर्व्हिस रस्त्यावर 

दोन दिवसांपासून एकेरी वाहतूक करण्यात आली आहे. यामध्ये, वारजे भरेकर पेट्रोल पंप किंवा चर्चपासून डुक्कर खिंडीकडे जाणारी बाजू बंद केली. सर्व्हिस रस्त्यावरील शेल पंप, हिल व्हीव्ह, साई सयाजी नगर, सोबा पुरम या सोसायटीच्या बाजूला जाणाऱ्या नागरिकांना जाता येत नाही. या भागातील सोसायटीच्या लोकांना लांबचा वळसा घालून यावे लागत आहे. हा बदल करताना या परिसरातील नागरिक, लोकप्रतिनिधी, पालक यांना विश्वासात घेतले का याबाबत वाहतूक पोलिस व प्राधिकरणास आमदार तापकीर यांनी विचारले. या सर्व सोसायटीतील नागरिकांच्या समवेत बैठक करून पुढील निर्णय घेतला जाईल, असे संबंधित पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. 

महामार्गवरील खड्डे बुजवा

महामार्गाच्या सर्व्हिस रस्त्याची दुरावस्था झाली आहे. तसेच देहूरोड ते सातारादरम्यान अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. यामुळे वाहतूक कोंडी होत आहे. चांदनी चौक, वारजे वडगाव, नऱ्हे, शिंदेवाडी, खेड शिवापूर, भोर तालुक्याच्या हद्दीत अनेक ठिकाणी महामार्ग व सर्व्हिस रस्त्यावरील खड्डे तातडीने भरावेत. पाऊस संपल्यावर सर्व्हिस रस्ते डांबरीकरण करावे, अशी मागणी केली आहे. 

ओढे नाल्याची पाहणी करा

मोठा पाऊस पडल्यावर ओढे- नाले चुकीच्या पद्धतीने वळविल्याने ओढ्याचे पाणी रस्त्यावर येते. महामार्गाच्या सर्व्हिस रस्त्यावर येते आणि ते पाणी एनडीए रस्त्यावरील मुख्य चौकात येते.

स्पंदन इमारतीच्या समोर ओढा काटकोनात वळला आहे. याबाबत आमदार तापकीर यांनी जिल्हाधिकारी नवल किशोर राम व महापालिका आयुक्त सौरभ राव यांना फोन करून
येथील पाहणी करण्यास सांगितले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MLA Bhimrao Tapkir statement on Service Road Issue