esakal | आमदार चेतन तुपे यांचा राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षपदाचा राजीनामा

बोलून बातमी शोधा

Chetan Tupe
आमदार चेतन तुपे यांचा राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षपदाचा राजीनामा
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे ः आमदार चेतन तुपे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पुणे शहराध्यक्षपदाचा राजीनामा शुक्रवारी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे दिला. एक व्यक्ती एक पद, धोरणानुसार राजीनामा देत असल्याचे तुपे यांनी म्हटले आहे. सुमारे तीन वर्षे तुपे शहराध्यक्षपदावर होते. पक्षाच्या नव्या शहराध्यक्षांची निवड १ मे रोजी जाहीर होईल, अशी शक्यता पक्ष वर्तुळातून व्यक्त होत आहे.

शहराध्यक्ष पदावर असतानाच तुपे हे २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या उमेदवारीवर हडपसर विधानसभा मतदारसंघातून निवडून आले होते. विधानसभा निवडणुकीत तुपे आणि वडगाव शेरी मतदारसंघातून सुनील टिंगरे असे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे दोन आमदार निवडून आले आहेत. तर, खडकवासला विधानसभा मतदारसंघातील पक्षाचे उमेदवार सचिन दोडके यांचा सुमारे दोन हजार मतांनी पराभव झाला होता. तत्पूर्वी ऑगस्ट २०१८ पासून पक्षाने त्यांच्याकडे पुणे शहराच्या अध्यक्षपदाची जबाबदारी पक्षाने सोपविली होती. अध्यक्षपदाच्या कार्यकाळात तुपे यांनी आठही विधानसभा मतदारसंघ पिंजून काढले होते. विधानसभनिहाय कार्यकारीणीही तयार झाली होती. तसेच विविध फ्रंटलचे अध्यक्ष निवडण्यात आणि त्यांना सक्रिय करण्यात तुपे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. तुपे आमदार झाल्यापासून शहराध्यक्षपदावर नवा चेहरा येईल, अशी पक्ष वर्तुळात चर्चा होती.

हेही वाचा: सोशल मीडियातून तक्रार करणाऱ्यांवर कारवाई नको; सुप्रीम कोर्टाने केंद्राला सुनावले

पक्षाचे नेते आणि पालकमंत्री अजित पवार यांनीही जाहीर सभांत त्या बाबत सुतोवाच केले होते. तसेच पक्षातील काही घटकांनी शहराध्यपक्षपदावर संधी मिळावी, यासाठी प्रदेशाध्यक्ष पाटील यांच्याकडेही पाठपुरावा केला होता. या पार्श्वभूमीवर तुपे यांनी पदाची राजीनामा प्रदेशाध्यक्षांकडे पाठविला आहे. राजीनामापत्रात तुपे यांनी म्हटले आहे की, हडपसर विधानसभा मतदारसंघात सुमारे पाच लोकसंख्या आहे. या मतदारसंघाचा विस्तार मोठा आहे. त्यात अनेक विकास कामे सुरू झाली आहेत. मतदारांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी मतदारसंघाला पुरेसा वेळ द्यायचा आहे. त्यासाठी शहराध्यक्षपदाच्या जबाबदारीतून मुक्त करावे, असे त्यात म्हटले आहे. शहराध्यक्ष होण्यापूर्वी तुपे यांनी महापालिकेत शहर सुधारणा समितीचे अध्यक्षपद भूषविले आहे. २०१७ च्या महापालिका निवडणुकीत ते निवडून आले होते. त्यानंतर महापालिकेत विरोधी पक्षनेते या पदावरही त्यांची निवड झाली होती. त्यानंतर ऑगस्ट १८ मध्ये त्यांची शहराध्यक्षपदावर निवड झाली आहे. महापालिकेतील सत्ताधारी भाजपच्या विरोधात अनेक आंदोलने आयोजित केली होती. तसेच शहराच्या प्रश्नांबाबत पूर्वीचे भाजप- शिवसेना युतीचे सरकार आणि त्यानंतरचे महाविकास आघाडीचे सरकार यांच्याकडेही त्यांनी पाठपुरावा केला. पक्षाच्या शहराध्यक्षपदाची निवड १ मे रोजी जाहीर होईल, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.

हेही वाचा: पुण्यात लसीच्या पुरवठ्याअभावी आज काही केंद्रे बंद राहणार