पुण्यावर प्रेम करणारे राज ठाकरे; शहराशी एक वेगळचं नातं!

ब्रिजमोहन पाटील
Sunday, 14 June 2020

आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा वाढदिवस यानिमित्तानं त्याच्या पुणे प्रेमाविषयी.

पुणे महापालिकेच्या २०१२च्या  निवडणुकीत राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) पहिल्याच प्रयत्नात २९ नगरसेवक निवडून आले होते. हे यश अनपेक्षीत होते. निकालानंतर राज ठाकरे यांनी पुण्यात नारायण पेठेतील झेड ब्रिज येथील शहर कार्यालयात पत्रकार परिषद घेतली. पुणेकरांनी त्यांच्या मनात 'मनसे'ला स्थान दिले याचे आभार मानत, आता माझे कायम या शहरावर लक्ष असेल असे सांगितले होते.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

साधारणपणे दीड एक वर्षापूर्वी याचाच प्रत्यय आला. ५० वर्षापेक्षा जास्त जून्या बालगंधर्व रंगमंदिरावर हातोडा पडणार अशी बातमी आली. यामुळे सांस्कृतिक राजधानी हादरून गेली होती. बालगंधर्व पाडून तेथे नवीन काही तरी करण्याचा डाव आहे या चर्चेने वाद पेटला होता. राज ठाकरे यांनी नवे बालगंधर्व कसे असावे याची ब्लू प्रिंट त्या पूर्वीच मांडली होती. मोठ्या नाट्यगृहासह प्रयोगिक नाटकांसाठी स्वतंत्र सभागृह, अँडी थिएटर असावे असा प्रस्ताव मांडला. पुण्यातील राजकारणी वाद घालत बसलेले असताना राज ठाकरे यांच्या ब्लु प्रिंटचा विषय पुन्हा समोर आल्यावर ती अनेकांच्या पसंतीला उतरली होती. हे झाले एक उदाहरण पण मनसेचा पुण्यात पूर्वीसारखा दबदबा नसला तरी राज ठाकरे यांचे आजही पुण्यावर लक्ष आहे हे सांगण्यासाठी पुरेसे आहे.

राजकारणा व्यतिरिक्त राज ठाकरे हे त्यांचे मित्र, साहित्यीक, व्यंग्यचित्रकार यांच्या मध्ये ते पुण्यात रमतात. त्यांचे मित्र प्रसाद पुरंदरे म्हणतात, "राज ठाकरे जेव्हा मित्रांना भेटतात तेव्हा राजकारणावर चर्चा शून्य असते. पण त्यांना पुण्याबद्दल खुप आत्मियता, प्रेम आहे, या शहराची, इथल्या माणसांची मुळ पुणेकर ही ओळख कायम टिकली पाहिजे असे त्यांना कायम वाटते. आम्ही दोघेही लता दीदींचे डाय हार्ट फॅन आहोत, गाणे ऐकणे त्यावर चर्चा करणे, असा मस्त वेळ घालतो. बोलताना त्यातून काही तरी व्यंग शोधू काढणे, मिस्कीलपणे त्यावरून भन्नाट ज्योक करणे यात तर राज तरबेज आहेतच. स्वर्गीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि राज ठाकरे हे दोघे ही व्यंगचित्रकार होते, त्यांचा हा गुण सारखाच आहे याची जाणीव ही होते. तसेच ते पुण्यात सुधीर गाडगीळ, अनिल शिदोरे या मित्रांनाही भेटून गप्पा गोष्टी करत असतात."

आणखी वाचा - पुण्यात मोठ्या घराचं स्वप्न होणार पूर्ण

पुणेकरांना जे  जे काही आवडते ते ते राज ठाकरे यांना पुण्यात आल्यावर करावेसे वाटते. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्याशी राज ठाकरे यांचे खुप जवळचे संबंध आहेत. त्यांचीही भेट घेऊन तब्येतेची चौकशी करणे, ऐतिहासिक गोष्टींवर चर्चा करतात. तसेच विशेषतः हाॅटेल वैशालीमध्ये जाऊन चविष्ट पदार्थ खाणे हे तर ठरलेले आहेच. बर राज ठाकरे वैशाली गेले होते पुणेकरांना कशी कळते ही मजेदार गोष्ट आहे. राज ठाकरे जेव्हा वैशालीत जातात, तेव्हा त्यांचा गाडीचा ड्रायव्हर नो पार्किंगमध्ये गाडी उभी करतो, परिसरात गर्दी झालेली असतेच. तेवढ्यात जागृत पुणेकर पोलिसांना याची तक्रार करतात. मग वाहतूक पोलीस येऊन राज ठाकरे यांच्या गाडीची पावती फाडून दंड ठोठावतात, त्याची बातमी होते. असेही प्रकार घडतात.  पुण्यातील अनेत पत्रकार याचे साक्षीदार आहेत.

आणखी वाचा - पुण्यातल्या नांदेड गावाविषयी महत्त्वाची बातमी 

तसं पुण्यात आल्यावर राज ठाकरे, मनसे आणि पोलिस हा संघर्ष नवा नाही. राज ठाकरे यांची सभा होणार म्हणल्यावर ती कोणत्या सभागृहात किंवा नाट्यगृहात होऊ शकत नाही.  त्यासाठी मोठे मैदान हवे, पार्किंगची व्यवस्था पाहिजे अशी अट पोलिस घालतात. अशा जागा मध्यवस्तीत मिळत नसल्याने वाद सुरू होतो. साधारणपणे २००८-०९ मध्ये परप्रांतीयांविरोधात राज ठाकरे यांनी अांदोलन सुरू केले होते. तेव्हा पुण्यातही सभा घेण्यासाठी मैदान मिळत नव्हते. शेवटी टिळक चौकात सभा घेणार असल्याचे मनसेने जाहीर करून टाकले. परवानगी नसताना तयारी सुरू झाली, लोक जमायला लागले, शेवटच्या पोलिसांना परवानगी द्यावी लागली. ही सभा राज ठाकरे यांची पुण्यातील आतापर्यंतची गर्दीचा उच्चांक करणारी सभा होती. टिळक चौक, लकडी पुल, लक्ष्मी रस्ता, केळकर रस्ता, कुमठेकर रस्ता, टिळक रस्ता सर्व रस्ते पॅक झाले होते. यानंतरही अनेक सभांच्या ठिकाणांवरून वाद होत गेले, पण सभा झाल्या. सहा महिन्यांपूर्वी विधानसभेच्या निवडणुकीत नातूबागच्या मैदानावर राज ठाकरे यांची प्रचार सभा होणार होती, तेथेही वाद झालाच, पण मुसळधार पावसामुळे ही सभा रद्द झाली. विधानसभेपूर्वी लोकसभेच भाजप विरोधी सभांना अन "लाव रे तो व्हिडिओ" या वाक्याने राज ठाकरे यांना लोकांनी डोक्यावर घेतले होते. तसेच बीएमसीसीच्या मैदानावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची जबरदस्त मुलाखत राज ठाकरे यांनी घेतली. अख्ख्या महाराष्ट्राने या मुलाखतीचा शब्द न शब्द लक्ष देऊन ऐकला, कारण राज ठाकरे यांनी ती मुलाखत घेतली होती. यात रॅपिड फायरमध्ये "राज की उद्धव" असा प्रश्न पवार यांना विचारला होता, त्यावेळी पवार यांनी "ठाकरे कुटूंबीय" असे उत्तर दिले होते. या मुलाखतीनंतर पवार यांनी राज ठाकरे यांना सोबत घ्यायचा प्रयत्न केला होता, पण तो शक्य झाला नाही. सत्तेच्या डावपेचात पवार यांच्या भूमिकेमुळे शेवटी उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री झाले. राज ठाकरे यांनी मोठ्या सभा घेतल्या, पण निवडणुकीच्या रिंगणात राज ठाकरे यांना आकड्यांचा खेळ जिंकता आला नाही हे सत्य आहे.

आणखी वाचा - कोथरूड क्वारंटाईन सेंटरमध्ये काय घडते आहे?

पुण्यात विधी महाविद्यालय रस्त्यावरील 'राजमहाल' येथे मुक्कामी असलेले राज ठाकरे कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेतात. पक्षातील गटबाजीचा त्यांच्या गंभीर स्टाईलने समाचार घेऊन नीट काम करण्याची तंबी देतातच. पण दुसऱ्या क्षणाला पुन्हा हसत खेळत चर्चा करतात. त्यामुळे पक्षाचे पदाधिकारी किंवा कार्यकर्ते त्यांच्या पासून जर जपून असतात. "आमच्या राज साहेबांचे काही सांगता येत नाही, कधी उचकतील अन कधी थट्टा करतील याचा नेम नाही." हे वाक्य कायम बोलत असतात. त्यामुळे बाहेर बिनधास्तपणे खळखट्याक करणारे कार्यकर्ते त्यांना भेटायला गेल्यावर जरा दबूनच असतात, हे विशेष आहे.

राज ठाकरे यांचा ५२ वा वाढदिवस साजरा करताना मित्रांमध्ये रमणारा, साहित्य, संस्कृतीला आश्रय देणारा अन कार्यकर्त्यांच्या मानावर राज्य करणारा अशी त्यांची ओळख आहे. राजकारणात सत्ता येते, सत्ता जाते, पण ही नाळ टिकून राहाणे महत्वाचे आहे, तेच राज ठाकरे करत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mns chief raj thackeray relation with pune city