महावितरणच्या कार्यालयात मनसेचे खळ्ळ खट्याक 

नितीन बारवकर
Tuesday, 11 August 2020

'महावितरण'कडून वाढीव लाईट बिले आली आहेत. याबाबत अधिकाऱ्यांना विचारूनही त्यांच्याकडून उडवाउडवीची उत्तरे आली. त्यामुळे संतप्त झालेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी आज येथील महावितरणच्या कार्यालयात तोडफोड केली. 

शिरूर (पुणे) : कोरोनाच्या संकटात आधीच हातची कामे गेली असताना सामान्यांकडे पैशांची चणचण आहे. अशात 'महावितरण'कडून वाढीव लाईट बिले आली आहेत. याबाबत अधिकाऱ्यांना विचारूनही त्यांच्याकडून उडवाउडवीची उत्तरे आली. त्यामुळे संतप्त झालेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी आज येथील महावितरणच्या कार्यालयात तोडफोड केली. 
    
वाढीव वीद बिलांसंदर्भात महावितरणचे उपकार्यकारी अभियंता हितेंद्र भिरूड यांच्याशी चर्चा करण्यासाठी मनसेचे शहर अध्यक्ष अविनाश घोगरे, मनसे जनहित आघाडीचे जिल्हाध्यक्ष सुशांत कुटे व मनसे कामगार आघाडीचे तालुकाध्यक्ष रवींद्र गुळादे हे सकाळी त्यांच्या कार्यालयात आले होते. मात्र, भिरूड हे तेथे उपस्थित नसल्याने संतप्त कार्यकर्त्यांनी त्यांच्या टेबल व खुर्चीची मोडतोड केली. खुर्ची व टेबलवरील काचेवर आपटून काच फोडली. ग्राहकांना बसण्यासाठी समोर ठेवलेल्या बाकड्याचीही मोडतोड केली. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

वाढीव वीज बिलाबाबत आम्ही दोन- तीन वेळा भिरूड यांच्याशी चर्चा केली होती. परंतु, बिले कमी करण्याबाबत त्यांच्याकडून कुठलीही समाधानकारक माहिती मिळाली नाही. शिवाय सामान्य ग्राहकांच्या प्रश्नांवर त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे महावितरण व शासनाचे लक्ष वेधण्यासाठी मनसे स्टाईलने खळ्ळखट्याक केले असल्याचे अविनाश घोगरे यांनी सांगितले. या कार्यकर्त्यांनी जाताना मनसेचा ध्वज फडकावत 'महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विजय असो' अशा घोषणाही दिल्या. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 
    
कोरोनाच्या काळात वीजबील माफी करावी किंवा काही सवलत मिळावी, अशी मागणी महावितरणकडे वेळोवेळी केली असूनही जाणीवपूर्वक दूर्लक्ष केल्याने आज हे पाऊल उचलावे लागले, असे अविनाश घोगरे यांनी सांगितले. ते म्हणाले की, गेल्या अनेक दिवसांपासून विजेचा लपंडाव चालू असून, शहरात विजेचा खेळखंडोबा नित्याचा झाला आहे. त्यातच सध्या जवळपास सर्वच ग्राहकांना विजेची वाढीव बिले आली आहेत. ती कमी करण्यासाठी ग्राहकांना महावितरणच्या कार्यालयाबाहेर तासनतास तिष्ठत उभे राहावे लागते. तालुक्याच्या विविध भागातून ग्राहकांना हेलपाटे मारावे लागतात. अनेकदा अधिकारी किंवा वाढीव वीज बिलाबाबतच्या ग्राहकांच्या शंका निरसनासाठी कुणीही कर्मचारी कार्यालयात नसतात. त्यामुळे वीजग्राहकांना हेलपाटे मारावे लागतात. याबाबत उप कार्यकारी अभियंता भिरूड यांच्याशी चर्चा केली. मात्र, त्यांनी आमचे म्हणणे उडवून लावले. त्यामुळे हे पाऊल उचलावे लागले.

देशाचा जलखजिना आता एकाच क्लिक वर

दरम्यान, याबाबत उपकार्यकारी अभियंत्यांच्या कार्यालयात बेकायदा घुसखोरी करून कार्यालयातील साहित्याची मोडतोड केल्याप्रकरणी महावितरणचे वरिष्ठ लिपिक शिवाजी शिंदे यांनी पोलिसांकडे तक्रार दिली.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MNS workers vandalize MSEDCL office in Shirur