कॅशलेससाठी जाणल्या मोबाईल ऍप्सच्या सुविधा

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 8 जानेवारी 2017

पुणे - घरबसल्या इंटरनेट बॅंकिंगद्वारे विजेचे, टेलिफोनचे बिल भरायचे, आपल्या खात्यातील शिल्लक पाहून मिनी स्टेटमेंटही घ्यायचे, एका बॅंकेतल्या खात्यातून दुसऱ्या बॅंकेच्या खात्यात पैसे ट्रान्स्फर करायचे, बॅंकांच्या मोबाईल ऍप्सची सुविधाही घ्यायची; मात्र बॅंक खात्यासहित आर्थिक व्यवहारांच्या देवाण-घेवाणीसंबंधीची सुरक्षितता, गुप्तताही पाळायची. तर मग मोबाईल बॅंकिंग ऍप्स डाउनलोड करून कॅशलेस इकॉनॉमीचे सदस्य व्हा. हाच कानमंत्र अनेकांनी "डिजिधन मेळाव्या'ला शनिवारी भेट दिल्यानंतर घेतला.

केंद्र, राज्य सरकार आणि बॅंकांनी कॅशलेस व्यवहारांबाबत जागरूकता आणि डिजिटल पद्धतीने आर्थिक व्यवहार करण्यास प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने मेळाव्याचे आयोजन केले होते. डिजिटल अर्थप्रणालीला चालना देण्याच्या उद्देशाने सर परशुरामभाऊ महाविद्यालयात शनिवारी मेळावा भरला होता. पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते उद्‌घाटन झाले.

विभागीय आयुक्त एस. चोक्कलिंगम, जिल्हाधिकारी सौरभ राव, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र मुठे, उपविभागीय अधिकारी ज्योती कदम, विविध बॅंकांचे व्यवस्थापक, शिक्षण प्रसारक मंडळींच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष ऍड. एस. के. जैन, उपाध्यक्ष श्रीकृष्ण चितळे, सदस्य जया किराड, वसंत देसाई, प्राचार्य डॉ. दिलीप शेठ, क्रीडा समितीचे अध्यक्ष अशोक वझे, सतीश पवार उपस्थित होते.

राष्ट्रीयीकृत, खासगी, सहकारी बॅंकांपैकी तीस बॅंकांचे स्टॉल्स्‌ होते. तसेच प्रादेशिक परिवहन विभाग, पुणे महापालिका, कृषी विभाग, बीएसएनएलसोबत इलेक्‍ट्रॉनिक, हस्तकला, कपडे, खाद्यपदार्थ असे एकूण 66 स्टॉल्स्‌ होते. मेळाव्याला भेट देणारे महाविद्यालयीन विद्यार्थी, नागरिकही उत्साहाने डिजिटल पद्धतीने आर्थिक व्यवहार करण्यासंबंधीची माहिती जाणून घेत होते. बॅंक ऑफ महाराष्ट्र, स्टेट बॅंक ऑफ इंडिया, ऍक्‍सिस बॅंक, तसेच बचत गटांसोबतच विविध स्टॉल्स्‌ला पालकमंत्र्यांनी भेट दिली. रोखरहित सेवांची अर्थातच मोबाईल ऍप्स विषयीची माहिती जाणून घेतली.

पालकमंत्री बापट म्हणाले, 'विविध बॅंकांच्या योजनांची माहिती नागरिकांनी समजून घ्यावी. त्यामुळे कॅशलेस प्रणाली विकसित होण्यास मदत होईल. कॅशलेस अर्थव्यवस्था काळाची गरज आहे. ही अर्थव्यवस्था उद्याच्या अर्थक्रांतीची नांदी आहे.''

Web Title: Mobile apps for the cashless facility