पुणे : रस्त्यावरुन ये-जा करणाऱ्या नागरिकांशी बोलून त्यांचे लक्ष विचलीत करुन त्यांच्या खिशातील मोबाईल चोरुन नेणाऱ्या चोरट्यांना बिबवेवाडी पोलिस ठाण्याच्या पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून दोन लाख रुपये किंमतीचे महागडे 21 मोबाईल पोलिसांनी जप्त केले. अटक केलेल्या चोरटयाने पुण्यासह कर्नाटकमध्येही मोबाईल चोरी केल्याचे उघड झाले आहे.
मनोज यल्लापा मुदगल (वय 39) व धर्मा तिम्मा भद्रावती (वय 26, दोघेही रा. डोबरवाडी, घोरपडी) अशी अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी रामेश्वर गायकवाड (रा. सुखसागर नगर, बिबवेवाडी) यांनी बिबवेवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. गायकवाड हे रविवारी सकाळी सव्वा अकरा वाजता सुखसागर येथे अंडी खरेदी करत होते. त्यावेळी दुचाकीवर पाठीमागे बसलेल्या एका तरुणाने फिर्यादी यांच्या पाठीला हात लावून "तुम्हाला तिकडे कोणी तरी बोलावत आहे" अशी बतावणी केली.
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
फिर्यादी यांनी पाठीमागे बघितले, त्यावेळी दुचाकीवरील तरुणाने त्यांच्या खिशातील मोबाईल जबरदस्तीने हिसकावून ते पसार झाले. त्यावेळी फिर्यादी यांनी गणेश राजापुरकर यांच्या दुचाकीवरुन चोरटयाचा पाठलाग करुन दुचाकीस्वार व चोरटयास पकडले. त्याचवेळी बीट मार्शल पोलिस कर्मचारी डाके व कोठावले यांच्याकडे सुपर्द केले. आरोपीच्या गाडीच्या डिक्कीमध्ये 21 महागडे मोबाईल जप्त केले. आरोपीने बिबवेवाडी, वानवडीसह कर्नाटकमध्येही चोरी केल्याचे सहायक पोलिस आयुक्त सुनील कलगुटकर यांनी माहिती दिली.