बारामतीत अल्पवयीन मुलासह पाच जणांवर मोकांतर्गत कारवाई

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 18 जानेवारी 2019

बारामती शहर : खून, खुनाचा प्रयत्न, दिवसा व रात्री घरफोडी, जबरी चोरी यांसारख्या अनेक गंभीर गुन्ह्यात सहभागी असलेल्या एका अल्पवयीन मुलासह पाच जणांवर पोलिसांनी मोकाची कारवाई केली, अशी माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर व पोलिस निरिक्षक अशोक धुमाळ यांनी आज दिली. 

बारामती शहर : खून, खुनाचा प्रयत्न, दिवसा व रात्री घरफोडी, जबरी चोरी यांसारख्या अनेक गंभीर गुन्ह्यात सहभागी असलेल्या एका अल्पवयीन मुलासह पाच जणांवर पोलिसांनी मोकाची कारवाई केली, अशी माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर व पोलिस निरिक्षक अशोक धुमाळ यांनी आज दिली. 

राहुल बाबुराव ढावरे, डाबर उर्फ किशोर संजय ढोरे, अभिजीत उर्फ छोटा डाबर अनिल ढावरे, बल्ली उर्फ अजय सुभाष देशमुख (सर्व रा. बारामती, जि. पुणे) तसेच एक अल्पवयीन मुलगा अशा पाच जणांविरुध्द बारामती शहर पोलिसांनी पोलिस महानिरीक्षकांकडे मोकाचा प्रस्ताव सादर केला होता. त्याला मंजुरी मिळाल्यानंतर आता या पाचही जणांवर मोकाअंतर्गत कारवाई सुरु झाली आहे. 
या पाचही जणांवर बारामती शहर पोलिस ठाण्यात विविध प्रकारचे अठरा गुन्हे दाखल असल्याचे अशोक धुमाळ यांनी सांगितले.

या पाच जणांवर कारवाई करण्यासाठी सहायक पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव, अरविंद काटे, अश्विनी शेंडगे, सतीश अस्वर, नीलेश अपसुंदे, सुभाष मुंढे, यांच्यासह अनेक पोलिस कर्मचाऱ्यांनी भूमिका बजावली. 

शहर पोलिसांकडून ऐतिहासिक कामगिरी

बारामती शहर पोलिसांकडून गेल्या काही महिन्यांत तब्बल 31 गुन्हेगारांवर तर उपविभागात 39 जणांवर मोकाअंतर्गत कारवाई करण्यात आली.

शहर पोलिस ठाण्याच्या स्थापनेपासून कधीही इतक्या मोठ्या संख्येने गुन्हेगारांवर मोकाअंतर्गत प्रस्तावही पाठविण्यात आले नव्हते. मात्र, शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नारायण शिरगावकर व अशोक धुमाळ या जोडीने वेगाने कारवाई केली. मोकाच्या कारवाईनंतर शहरातील गुन्हेगारीचे कंबरडेच मोडले असून, शहरातील गुन्हेगारी वेगाने घटली आहे. आणखीही काही जणांवर मोकाअंतर्गत कारवाई करणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
 

Web Title: Mocca action against five peoples including minor children