krushi
krushi

आधुनिक तंत्राने होईल शेतीचे नंदनवन

युरोपातील शेतमालाच्या बाजारपेठेवर इस्राईलचा दबदबा आहे. तेथे ग्राहकाच्या गरजा लक्षात घेऊनच पीकउत्पादन घेतले जाते. जिल्ह्यातून मुंबई-पुणे महानगरांसह देशभरातील बाजारपेठा आणि परदेशात शेतमाल निर्यातीची संधी आहे. पुण्याचे ७५ टक्के क्षेत्र जिरायती आहे, तेथे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर शक्‍य आहे. 

‘जिरायती’त हवे आधुनिक तंत्रज्ञान
दौंड, इंदापूर, बारामती, शिरूर आणि पुरंदर तालुक्‍यातील पावसाचे प्रमाण ३६० ते ४९० मिलिमीटर. तालुक्‍यांना अधूनमधून दुष्काळाशी सामना करावा लागतो. हवेली तालुक्‍यातील काही भाग दुष्काळी पट्ट्यात येतो. जुन्नर, खेड आणि आंबेगाव तालुक्‍यांच्या पूर्व भागात अपुरा पाऊस, त्यामुळे जिरायती क्षेत्रात पिकांची हेक्‍टरी उत्पादकता फार कमी. भोर आणि आंबेगाव या तालुक्‍यांच्या पश्‍चिम भागात चांगला पाऊस. मात्र पूर्व भागात दुष्काळी परिस्थिती. 

जिल्ह्याचे सरासरी पाऊसमान ८८० मिलिमीटर आहे. मात्र पश्‍चिमेस अधिक, तर पूर्वेस कमी असे आहे. ज्या भागात १२०० मि.मी.पेक्षा अधिक पाऊस होतो तेथे भात आणि नागली लागवड. मात्र, या दोन्ही पिकांच्या सुधारित जाती आणि लागवड तंत्राचा अवलंब केल्याशिवाय उत्पादकता वाढणार नाही. त्याकरिता गट शेतीपद्धती आणि अधिक उत्पादन देणाऱ्या जातींची सुधारित तंत्राने लागवड, कृषी निविष्ठांची वेळेत उपलब्धता याचे काटेकोर नियोजन आवश्‍यक आहे. 

पश्‍चिम भागामध्ये हवामान, पाऊसमानानुसार काटेकोर तंत्रज्ञानाचा पीक पद्धतीसाठी अवलंब करावा. परसातील कुक्कुटपालन, फळबागा लागवडीवर भर द्यावा. विशेषतः काजू लागवडीवर भर हवा. पॉलिहाउसमधील फुले आणि भाजीपाला लागवडीला चांगली संधी. आंबा लागवडीचे नियोजन करताना ‘एग ऑफ दि सन’ या पेटेंटेंड जातीची लागवड केल्यास कमी क्षेत्रावर अधिक आर्थिक फायदा मिळविणे शक्‍य. याच भागात जांभूळ लागवडीस विशेष वाव आहे. 

पडीक जमिनीवर मोहगनी आणि बर्मा साग लागवडीवर भर द्यावा. त्यामुळे शेतकऱ्यांना टप्प्याटप्प्याने उत्पादन मिळून आर्थिक फायदा वाढेल. कार्बन क्रेडिट योजना राबवल्यास शेती बांधावर किंवा पडीक जमिनीवर साग आणि मोहगनीच्या लागवडीला संधी. जलयुक्त शिवार योजना प्रभावीपणे राबवण्याची गरज आहे.

‘ठिबक’ने बागायती होईल दुप्पट
जिल्ह्यात सरासरी ४३६ ते ६४५ मिलिमीटर पाऊसमान असलेल्या भागात कालवा, पाटपाणी आणि विहीर बागायतीत ऊस, केळीची मोठ्या प्रमाणात लागवड आहे. ज्वारी, सोयाबीन, तूर लागवड वाढत आहे. डाळिंब, सीताफळ आणि अंजीर लागवड मोठ्या प्रमाणात आहे. त्यांना ठिबकद्वारे पाणी दिल्यास मोठी बचत होईल. तूर आणि रब्बी ज्वारी या पिकांना ठिबकने पाणी दिल्यास रब्बी ज्वारीचे उत्पादन हेक्‍टरी ४० क्विंटल, तर तुरीचे २५ ते ३० क्विंटलपर्यंत मिळविणे शक्‍य आहे. ऊस पिकाची उत्पादकता वाढविण्यासाठी विशेष कार्यक्रम राबवावा. ठिबक पद्धत १०० टक्के वापरल्यास बागायतीचे क्षेत्र दुप्पट होईल. 

दुग्धोत्पादन, कुक्कुटपालन, रेशीम उद्योग, शेळीपालनाला चांगली आहे. द्राक्ष लागवड क्षेत्रात युरोपातील ‘रुबी रोमेन’ या पेटंटेंड द्राक्षाच्या लागवडीने आर्थिक स्थिती सुधारेल. पॉलिहाउसमध्ये ॲन्थुरिअम आणि ऑर्किड लागवडीवर भर द्यावा. परदेशी भाजीपाला आणि फळांच्या प्रयोगावर भर देता येईल. हवामानावर आधारित पीकपद्धती निश्‍चित करून दर्जेदार उत्पादनासाठी शेतकरी उत्पादक कंपन्यांचे जाळे उभारावे. गटशेतीची संकल्पना उपयुक्त ठरेल. सेंद्रिय शेतमालास परदेशी बाजारपेठा सरकारने उपलब्ध केल्यास शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारेल. 

काढणीपश्‍चात सेवा प्रभावी हव्यात 
जिल्ह्यात पीक काढणीपश्‍चात तंत्रज्ञानावर आधारित सेवा-सुविधा दिल्यास मुंबई, पुण्यासह देशातील शहरे आणि परदेशातही शेतमाल उत्पादनांना बाजारपेठ मिळेल. या सर्वांचा एकात्मिक आराखडा तयार करून पीकपद्धतीने आवश्‍यक ते बदलही करणे शक्‍य आहे. याशिवाय प्रक्रिया उद्योगांचे एईझेड (ॲग्रिकल्चर इकॉनॉमिक झोन) केल्यास पुण्यासह नजीकच्या जिल्ह्यांनाही फायदा होईल. बाजारपेठीय सुधारणांना आणि आधुनिकीकरण केल्यास शेतकरी ते ग्राहक योजना शक्‍य होईल. 

अनुकरणीय इस्रायली मॉडेल
इस्राईलचे जिरायती क्षेत्रातील पीकउत्पादनात मोठे प्रभुत्व आहे. या तंत्रज्ञानाच्या वापराने पीकबदल आणि उत्पादकता वाढीस वाव आहे. शिवाय संरक्षित आणि काटेकोर शेतीला प्रोत्साहन मिळून पाण्यासह विविध संसाधनांचा यथायोग्य वापर शक्‍य होईल. 

मान्यवर वक्ते
परिवर्तन घडवण्याची क्षमता
इटन स्टिब,  संस्थापक भागीदार, व्हायटल कॅपिटल

यशस्वी उद्योजक असलेल्या स्टिब यांनी गेल्या ३० वर्षांत आफ्रिकेतील उद्योग, व्यवसाय आणि सेवाभावी कार्यावर आपली छाप उमटवली आहे. त्यांची दूरदृष्टी, उद्यमशीलता आणि नेतृत्वकौशल्यातून आफ्रिकेत अनेक मोठे प्रकल्प साकार झाले आहेत. त्यातील मानवतावादी दृष्टिकोनातून आर्थिक आणि व्यावसायिक प्रगतीही साधली आहे. ग्रामीण आणि शहरी भागातील विकासकामांसह शेती, शेतीपूरक उद्योग; तसेच शिक्षण, तंत्रज्ञान, क्‍लिन एनर्जी आणि पाण्याशी संबंधित प्रकल्प अशा अनेकविध क्षेत्रांत त्यांचे योगदान आहे. त्यांच्या विविधांगी व्यक्तिमत्त्वाला अनुभवाचे कोंदण लाभले आहे. त्यातून मोठ्या लोकसंख्येचे जीवनमान उंचावायला मदत झाली आहे. स्टिब यांनी १९८५ मध्ये इस्रायली स्टार्ट अप फर्म सुरू केली. आज तिचे बहुराष्ट्रीय कंपनीत रूपांतर झाले असून, नव्याने उदयाला येणाऱ्या मार्केटवर लक्ष ठेवणाऱ्या या कंपनीत हजारो लोक नोकरी करताहेत. २०११ मध्ये ते या कंपनीच्या व्यापातून बाहेर पडले. त्यानंतर त्यांनी गुंतवणूकदारांना अत्यंत चांगला परतावा देतानाच परिवर्तन घडवण्याची क्षमता असलेल्या ‘व्हायटल कॅपिटल फंड’ची मुहूर्तमेढ रोवली. ते बेन गुरीन विद्यापीठात सेंटर फॉर आफ्रिकन स्टडीजच्या मंडळावर असून, ‘वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम’चे सदस्य आहेत. क्‍लिंटन ग्लोबल इनिशिएटिव्ह, अस्पन इन्स्टिट्यूटच्या स्ट्रॅटेजिक ग्रुपवर ते कार्यरत आहेत. विविध विद्यापीठे आणि सेवाभावी संस्थांवर सक्रिय असलेले स्टिब आफ्रिकेच्या सहारा भागात उपेक्षित समाजात शैक्षणिक आणि सांस्कृतिक चळवळीतून परिवर्तनाचे कार्य करत आहेत.

धोरणांची यशस्वी अंमलबजावणी
इस्तबान गोमेझ नदाल, सदस्य, ग्लोबल ब्रॅंड डायरेक्‍टर, पॅलाडियम  

इस्तबान यांच्या गाठीला ‘पॅलाडियम’मधील ‘थॉट लीडरशीप ग्रुप’चा वीस वर्षांचा अनुभव आहे. तेथे त्यांनी कॉर्पोरेट नेटवर्क आणि ब्रॅंड व इव्हेंट विभागाचे नेतृत्व केले आहे. विविध प्रकारच्या मार्केटिंग वातावरणात त्यांनी धोरणात्मक बाबींची आखणी करून त्यात यशस्वितता मिळवली आहे. ‘पॅलाडियम’मध्ये दाखल होण्याआधी त्यांनी ‘टेलिफोनिका’, ‘यूएस वेस्ट इनकॉर्पोरेशन आणि ‘एमपीजी’मध्ये वित्त आणि विपणनच्या आघाडीवर काम केले आहे. मद्रिदमधील विद्यापीठातून त्यांनी अर्थशास्त्र आणि बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये पदवी मिळवली आहे.

तज्ज्ञ म्हणतात
शेतीमालाच्या विक्रीसाठी बाजारपेठा असल्या, तरी शेतकऱ्यांना चांगले बाजारभाव मिळत नाहीत. यासाठी शेतीमालाची योग्य वेळेत काढणी, साठवणूक आणि त्यावरील प्रक्रियेवर भर दिला पाहिजे, तरच शेतकऱ्यांना शाश्वत उत्पन्न मिळेल. शासनाने शेतीसंबंधी कृषी उद्योग उभे करून अधिक दर देण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. 
- डॉ. शंकरराव मगर, माजी कुलगुरू

बदलत्या हवामानामुळे पुणे जिल्ह्यात उणिवा भासत असलेल्या भागात पिकांच्या फेरबदलावर लक्ष दिले पाहिजे. तसेच गटशेतीच्या माध्यमातून पॉलिहाउस, सूक्ष्म सिंचन, प्रक्रियेवर भर देण्याची आवश्‍यकता आहे. जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी उसाबरोबर भाजीपाल्यावर प्रक्रिया व ब्रॅंडिग करून मालाची विक्री केली पाहिजे.
- डॉ. राजाराम देशमुख, माजी कुलगुरू
 

शेतीमालाला चांगला दर मिळण्यासाठी मार्केटमध्ये सुधारणा करून विक्रीतील एजंटावर नियंत्रण आणण्याची गरज आहे. शेतकऱ्यानांही थेट विक्रीसाठी मार्केटमध्ये सुविधा उपलब्ध करून दिल्या पाहिजे. कृषी पर्यटन, मत्सोत्पादन, पॉलिहाउस यांचा एकत्रित आढावा घेऊन त्यादृष्टीने जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांनी पुढील पाच वर्षांचा मास्टर प्लॅन तयार केला पाहिजे. 
- डॉ. किसन लवांडे, माजी कुलगुरू

सध्या शेतीवरील खर्च वाढला आहे. पर्यायाने शेतकऱ्यांना नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. शासनाने पतधोरणात बदल केला पाहिजे. सर्व शेतीमालाच्या आधारभूत किमती ठरविल्या पाहिजेत, निर्यातीसाठी सोयीसुविधा उभारल्या पाहिजे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे पीकविम्यापोटी मिळणारी नुकसानभरपाई वेळेत आणि योजना सर्व जिल्ह्यांत राबविली पाहिजे. 
- शहाजी जाचक, अध्यक्ष, डाळिंब उत्पादक संघ

जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर पडीक जमिनी आहेत. या जमिनी बागायती होण्यासाठी शेततळ्याचा शेतकऱ्यांना अधिक लाभ दिला पाहिजे. या व्यतिरिक्त ठिबक सिंचन, शेतीमालाचे मूल्यवर्धन करून शेतीआधारित उद्योगावर भर द्यावा. जेणेकरून शेतीमालाला अधिक दर मिळून शेतकऱ्यांना चांगल्या उत्पन्नाची हमी मिळेल.
- एस.डी. सावंत, शास्त्रज्ञ, द्राक्षे संशोधन केद्र

उत्पादन, वाहतूक, प्रक्रिया, साठवणूक, विक्री यामध्ये रोजगारांची मोठी संधी आहे. परंतु याचे योग्य मार्गदर्शन नसल्याने नुकसान होते. विक्री व्यवस्थेमध्ये शासनाने नियोजन करण्याची आवश्‍यकता आहे. शेतीमालाच्या प्रक्रियेसाठी उद्योग उभे करण्याची गरज आहे. त्यासाठी चांगल्या प्रशिक्षणाच्या संधी उपलब्ध करून दिल्या पाहिजेत. 
- डॉ. विवेक क्षीरसागर, कार्यकारी संचालक, कात्रज डेअरी

शाश्वत एकात्मिक शेती, कृषी यांत्रिकीकरण, माहिती तंत्रज्ञानाचा वापर, बदलत्या हवामानावर आधारित अधिक जनजागृती, सेंद्रिय शेती, थेट विक्री, संरक्षित शेती यावर अधिक भर दिला पाहिजे. यासह शेतीमालावर आधारित प्रक्रिया उद्योग, पूरक उद्योगामध्ये शेतकऱ्यांनी उतरण्याची योग्य मार्गदर्शन उपलब्ध करून दिले पाहिजे. 
- धनेश पडवळ, केव्हीके, नारायणगाव

खारवट पाण्यामुळे अनेक भागांत जमिनी खराब झाल्या आहेत. या जमिनी वापरात आणण्यासाठी शेतकऱ्यांनी जमीन आरोग्य पत्रिकांचा अवलंब केला पाहिजे. त्यासाठी जनजागृतीचे कार्य हाती घेतले पाहिजे. तसेच शेततळे, ठिबक सिंचन आणि सोलर ऊर्जेचा वापर वाढविण्यावर भर दिला पाहिजे. 
- नीलेश भोईटे, केव्हीके, बारामती

शेतीला पायाभूत सुविधा असणे आवश्‍यक आहे. सध्या आपल्याकडे शेतीमालाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होत असले, तरी साठवणुकीची व्यवस्था नाही. ती होणे गरजेचे आहे. याशिवाय माफक दरात अर्थपुरवठा उपलब्ध करून विक्रीपूर्व शेतीमालावर प्रक्रिया असायला हवी. 
- सुभाष काटकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी

शेतीमालाला भाव नसल्याने अनेक शेतकरी अडचणीत आले आहे. तसेच सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देण्याची आवश्‍यकता असून, त्यासाठी योग्य पावले उचलणे गरजेचे आहे. परंतु शासनाकडून तसे होताना दिसत नाही.’’ 
- सारिका इंगळे, सभापती, कृषी व पशुसंवर्धन विभाग

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com