मांजरी - शेती प्रदर्शनाला भेटी दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि  शरद पवार यांच्यात  गप्पा रंगल्या होत्या.
मांजरी - शेती प्रदर्शनाला भेटी दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवार यांच्यात गप्पा रंगल्या होत्या.

पवार-मोदींचा रंगला कौतुक सोहळा

पुणे - राजकारणात संघर्ष करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी एकमेकांवर स्तुतिसुमने उधळत, एकमेकांबद्दलच्या आदरयुक्त भावना व्यक्त केल्या. ‘‘सार्वजनिक जीवनातील सुवर्णमहोत्सवाच्या उंबरठ्यावर असलेल्या पवारांबद्दल प्रचंड आदर आहे,’’ असे मोदी यांनी आवर्जून नमूद केले; तर ‘‘जपानहून येताच गोवा, कर्नाटक आणि महाराष्ट्र असा दिवसभराचा दौरा करून मोदी पुढे कुठे जाणार, हे माहिती नाही,’’ असे मिस्कीलपणे सांगत पवार यांनी पंतप्रधानांच्या कार्यक्षमतेची तारीफ केली. निमित्त होते वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमधील कार्यक्रमाचे. 

‘व्हीएसआय’मधील आंतरराष्ट्रीय ऊस परिषदेच्या निमित्ताने मोदी आणि पवार रविवारी एका व्यासपीठावर आले होते. मोदी यांचे स्वागत करून पवार यांनी प्रस्ताविकात मोदींचे कौतुक केले. तेव्हा उपस्थितांच्या भुवया उंचावल्या.

‘‘मोदी हे शनिवारी जपानमध्ये होते. त्यानंतर सकाळी ते गोव्यात पोचले. हा दौरा आटोपून कर्नाटकातील एका कार्यक्रमाला हजेरी लावली. दुपारी पुण्यात पोचले. त्यांचा पुढचा दौऱ्यानिमित्त कुठे आहे, याची मला कल्पना नाही. हे सगळे आश्‍चर्यकारक आहे,’’ अशा शब्दांत मोदींची पाठ थोपटताच उपस्थितांनी प्रचंड टाळ्या वाजवून पवार यांना दाद दिली. मोदी यांनीही आपल्या भाषणात, अनेक बाबतीत पवार यांचे कायमच मार्गदर्शन घेत असतो, असे आवर्जून सांगितले. 

ते म्हणाले, ‘‘राजकीय क्षेत्रात वावरताना पवार यांना वेगवेगळ्या भूमिका घ्याव्या लागतात. मात्र शेतकऱ्यांचा विषय, त्यांच्या समस्या म्हणजे, पवार यांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. त्याबाबत ते सातत्याने पुढाकार घेतात, हे मी गुजरातचा मुख्यमंत्री होतो तेव्हाही अनुभवले आहे. त्यामुळे पवार यांच्याबद्दल आदर बाळगणाऱ्या व्यक्तींपैकी मी एक आहे. मुख्यमंत्री अथवा पंतप्रधानपदावर असो, पवार यांचे मार्गदर्शन मिळते. वेगवेगळ्या विषयांमध्ये त्यांनी नेमकी दिशा दाखविली. त्यांनी नेहमीच सहकार्याची भूमिका घेतली आहे.’’ 

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे प्रचंड ऊर्जा असणारे व्यक्ती असून, त्यांच्या जीवनातील प्रत्येक क्षण देशासाठी देत आहेत, असे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे कौतुक केले. काळ्या पैशांसंदर्भात केंद्र सरकारने घेतलेल्या भूमिकेला सर्वांचा पाठिंबा आहे, असेही ते म्हणाले.

पवार यांच्या कामाचा सुवर्णमहोत्सव कौतुकास्पद 
पवार यांच्या सार्वजनिक जीवनाचा पुढील वर्षी फेब्रुवारीत सुवर्णमहोत्सव आहे. आमदार ते केंद्रीय मंत्रिपदापर्यंतचा त्यांचा ५० वर्षांमधील प्रवास कौतुकास्पद आहे. त्यासाठी त्यांना आत्ताच शुभेच्छा देतो, अशा शब्दांत मोदी यांनी आपल्या भाषणात पवार यांचा गौरव करीत पुढील राजकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या. पवारांपाठोपाठ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नगरसेवक ते मुख्यमंत्री या अल्पावधीतील राजकीय कारकिर्दीचा रौप्यमहोत्सवही कौतुकास्पद असल्याचा उल्लेख मोदी यांनी करून त्यांनाही शुभेच्छा दिल्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com