चॉकलेट दिलीप शिंदे टोळीवर होणार मोक्काअंतर्गत कारवाई

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 25 जुलै 2019

येथील धनेश ऊर्फ चॉकलेट दिलीप शिंदे व त्याच्यासह नऊ जणांच्या टोळीवर मोक्काअंतर्गत कारवाई करणार असल्याची माहिती पुणे जिल्हा पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी दिली.

कामशेत - येथील धनेश ऊर्फ चॉकलेट दिलीप शिंदे व त्याच्यासह नऊ जणांच्या टोळीवर मोक्काअंतर्गत कारवाई करणार असल्याची माहिती पुणे जिल्हा पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी दिली.

कामशेत येथील व्यापारी अनुराग सुरेश गदिया (वय 29) यांना 8 जुलै 2019 रोजी रात्री दहा वाजता पुण्याला जाण्यासाठी निघाले असता धनेश ऊर्फ चॉकलेट दिलीप शिंदे (वय 30) याने त्याचे जोडीदार डीग्या ऊर्फ रोशन बाळू शिंदे (वय 20), सोन्या ऊर्फ प्रसाद तुकाराम शिंदे (वय 19), श्रीधर श्रीकांत हुले, अक्षय प्रकाश वाघ (वय 23), दिनेश दीपक शिंदे (वय 21), शुभम हिराचंद गायकवाड (वय 21), मनोज गणेश देशमुख (वय 22), राजू ज्ञानेश्‍वर पठारे (सर्व राहणार कामशेत, ता. मावळ) व इतर अल्पवयीन सहकाऱ्यांच्या मदतीने कट रचून अपहरण केले होते. तसेच, खंडणी न दिल्यास पुन्हा अपहरण करून त्यास व त्याच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी दिली. त्यावरून पोलिसांनी पथक स्थापन केले होते. त्याचदरम्यान, दिनेश शिंदे याने दहिवली गावात मंथन सातकर याला मारण्याच्या उद्देशाने गोळीबार केला होता. त्यालाही लोणावळा ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे. शिंदे व त्याच्या टोळीतील सदस्य दहशत पसरवीत असल्याने त्यांच्यावर मोक्काअंतर्गत कारवाई करण्याचा प्रस्ताव संदीप पाटील यांनी कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. सुहास वारके यांच्याकडे पाठविला होता. त्यांनी या आरोपींवर मोक्काअंतर्गत कारवाई करण्याची परवानगी दिली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mokka Crime on Dilip Shinde Gang