झोपण्याच्या जागेसाठी पैसे!

दिलीप कुऱ्हाडे 
शुक्रवार, 9 ऑगस्ट 2019

येरवडा मध्यवर्ती कारागृहामधील तीस बराकींची क्षमता २ हजार ३२३ कैद्यांची आहे. मात्र या ठिकाणी तब्बल पाच हजार कैदी दाटीवाटीने ठेवण्यात आले आहे. त्यामुळे कैद्यांची झोपण्याच्या जागेसाठी मारामार होत आहे.

येरवडा - येरवडा मध्यवर्ती कारागृहामधील तीस बराकींची क्षमता २ हजार ३२३ कैद्यांची आहे. मात्र या ठिकाणी तब्बल पाच हजार कैदी दाटीवाटीने ठेवण्यात आले आहे. त्यामुळे कैद्यांची झोपण्याच्या जागेसाठी मारामार होत आहे. दुर्गंधीमुक्त आणि स्वच्छ जागेसाठी जास्त पैसे मोजणाऱ्या कैद्यांना प्राधान्य देण्यात येत असल्याचे वास्तव नुकतेच कारागृहातून सुटून आलेल्या कैद्यांनी ‘सकाळ’कडे मांडले.   

कारागृहातील सर्कल एक, तीन आणि टिळक यार्डात प्रत्येकी आठ बराक, सर्कल दोनमध्ये सहा बराक, तर किशोर विभागात तीन बराक आहेत. प्रत्येक बराकीमध्ये दीडशे ते दोनशे कैद्यांना दाटीवाटीने ठेवले आहे. यामुळे कैद्यांना झोपण्यासाठीसुद्धा पुरेशी जागा मिळत नाही. अनेक वेळा कैद्यांची झोपण्याच्या जागेसाठी मारामारी होत आहे. कारागृहातील अधिकारी झोपेच्या जागेसाठी दरमहा ठरावीक पैसे घेत आहेत. तसेच श्रीमंत व गुन्हेगारी क्षेत्रातील कैद्यांना बराकीमध्ये झोपण्यासाठी चांगली जागा मिळते. पैसे न देणाऱ्यांना शौचालयाच्याजवळ दुर्गंधीमध्ये झोपावे लागते. याबाबत तक्रारही करता येत नसल्याचे नुकत्याच सुटून आलेल्या कैद्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.

मनीऑर्डरचे पैसे बेकरीत जमा
येरवडा कारागृहातील कैद्यांच्या नावाने आलेली मनिऑर्डर प्रवेशद्वारात जमा होते. यातील पूर्ण रक्‍कम कैद्यांपर्यंत जात नाही. सुरवातीला ही रक्कम कारागृहात असलेल्या बेकरीत जमा होते. बेकरीतील कर्मचारी मनिऑर्डरमधील काही रकम कमिशन म्हणून घेतात. कारागृहातील बेकरी नावाला असून या बेकरीत चमचमीत मटण, चिकन हंडी व बिर्याणी मिळते. बेकरीमधील खाद्य पदार्थ बाजारभावापेक्षा अधिक महाग असून, श्रीमंत किंवा गुन्हेगारी क्षेत्रातील मंडळींना ते विकत घेणे शक्‍य असल्याचे या आरोपींनी सांगितले.

कारागृहातील अधिकारी बराकीतील कैद्यांकडून झोपण्याच्या जागेसाठी पैसे घेत असतील, तर कैद्यांनी थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला कळवावे. अशा प्रकरणात कारागृह प्रशासन कोणालाही पाठीशी घालणार नाही. 
 - यू. टी. पवार, अधीक्षक, येरवडा मध्यवर्ती कारागृह.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Money for sleeping place in Yerwada Central jail