

पान १३ - तातडीने
०००००००००००००००००००००
परतीचा माॅन्सून पाऊस देईल का?
--------
राज्यातील बहुतांशी भागांत पावसात मोठा खंड पडला आहे. पिके हातची जात आहेत. सध्या पावसाची नितांत गरज आहे. त्यामुळे माॅन्सून परतीच्या प्रवासात पाऊस देईल, अशी आशा शेतकरी बाळगून आहेत. पण खरंच माॅन्सूनच्या परतीच्या काळात पाऊस होईल का, पाऊस कसा पडू शकतो, पुढील आठवड्याभरात पावसाचा अंदाज आहे का, याविषयी निवृत्त हवामान शास्त्रज्ञ माणिकराव खुळे यांच्याशी साधलेला संवाद.
----------------------
अनिल जाधव
—--------
शेतीसाठी पावसाची नितांत गरज आहे. राज्यात पुढील आठवड्यात पावसाची शक्यता आहे का?
राज्यातील काही भागांत पुढील आठवड्यात पावसाची शक्यता आहे. परंतु सर्वदूर जोरदार पाऊस नसेल. उत्तर गुजरात भागावर समुद्र सपाटीपासून दीड ते तीन किलोमीटर उंचीवर चक्रीय वाऱ्याची स्थिती निर्माण झाली आहे. तसेच मराठवाडा ते आग्नेय अरबी समुद्रापर्यंत समुद्र सपाटीपासून ५.८ किलोमीटर उंचीपर्यंत पसरलेल्या हवेच्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे महाराष्ट्रातील काही भागांत पावसाची शक्यता निर्माण झाली आहे. विदर्भाविषयी बोलायचे झाले तर गुरुवार (ता. २४)पर्यंत मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज आहे. त्यातही २२ ते २४ सप्टेंबर या ३ दिवसांत पूर्व विदर्भात पावसाची शक्यता अधिक आहे. मराठवाड्यात पाऊस कमीच राहण्याची शक्यता आहे. मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांमध्ये गुरुवारपर्यंत तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे. याच काळात संपूर्ण कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज आहे. त्यातही २२ सप्टेंबरपर्यंत पावसाची शक्यता अधिक आहे.
सप्टेंबरचा शेवटचा आठवडा आणि ऑक्टोबरमधील माॅन्सूनच्या परतीच्या कालावधीत पावसाची शक्यता आहे का?
- होय, शक्यता निर्माण झाली आहे. सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यातही पावसाचा अंदाज आहे. थायलंडमध्ये १७ सप्टेंबरच्या दरम्यान चक्रीवादळाची स्थिती निर्माण झाली आहे. ही स्थिती पश्चिमेकडे सरकत असून बंगालच्या उपसागरात त्याचे रूपांतर कमी किंवा तीव्र कमी दाबाच्या क्षेत्रात होण्याची शक्यता आहे. हे कमी दबाव क्षेत्र नंतर दक्षिण ओडिशा किंवा उत्तर आंध्र प्रदेश या किनारपट्टीवर येण्याची शक्यता आहे. ही प्रणाली २५ सप्टेंबरनंतर कदाचित महाराष्ट्राकडे पश्चिम दिशेने मार्गक्रमण करण्याची शक्यता आहे. त्यामुळे पाऊस पडण्यास पोषक स्थिती होऊ शकते. गडचिरोली, यवतमाळ, नांदेड, परभणी, हिंगोली, लातूर, धाराशिव, बीडचा काही भाग, सोलापूर, सांगली, कोल्हापूर आणि दक्षिण सातारापर्यंत २७ ते ३० सप्टेंबरदरम्यान पाऊस होण्याची शक्यता आहे. या जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम सरी पडू शकतात. जोरदार पावसाची शक्यता कमी आहे, कारण हा कमी दाब क्षेत्राचा पाऊस आहे. त्यानंतर पाच ते सहा ऑक्टोबरच्या दरम्यान पुन्हा बंगालच्या उपसागरात एक प्रणाली तयार होण्याची शक्यता आहे. या प्रणालीचे मार्गक्रमण कोणत्या भागातून होईल आणि त्याची तीव्रता काय असेल यावर पाऊस अवलंबून आहे. त्याला अजून वेळ आहे. पुढे त्याविषयी अधिक स्पष्टपणे बोलता येईल. पण ही प्रणाली अधिक तीव्र होऊन महाराष्ट्रावर राहिली, तर ८ ते १५ ऑक्टोबर दरम्यान राज्यात पुन्हा पावसाची शक्यता आहे. पण त्यासाठी आपल्याला ऑक्टोबरच्या सुरुवातीला घडणाऱ्या वातावरणीय घडामोडींचे बारकाईने निरीक्षण करावे लागेल. तेव्हा काय होईल हे स्पष्टपणे बोलता येईल.
‘एमजेओ’ प्रणालीची सध्या अवस्था काय आहे आणि ही प्रणाली राज्यात पावसासाठी पोषक ठरेल का?
सुरुवातीला आपण ‘एमजेओ’ प्रणाली म्हणजे नेमके काय, हे समजून घेऊ. ‘एमजेओ’ म्हणजे हिंद महासागरापासून ते प्रशांत महासागरापर्यंत फिरणारा ढगांचा पट्टा असतो. नैसर्गिकपणे नियमित आवर्तनानुसार ३० ते ६० दिवसांच्या अंतराने वातावरणीय हवा, आर्द्रता आणि उष्णता ऊर्जेतून ढग तयार होतात आणि पाऊस पडतो. या प्रक्रिया सतत घडत असतात. त्याला एमजेओ म्हटले जाते. एमजेओचा सकारात्मक किंवा नकारात्मक परिणाम भारत, श्रीलंका, मालदीव आणि ऑस्ट्रेलिया या देशांच्या मोसमी पावसावर जास्त होतो. उत्तर अमेरिकेतही येणारे महापूर एमजेओमुळे येतात. चक्रीवादळची निर्मिती आणि त्यांची तीव्रता तसेच आर्टिककडून येणारी थंडी इत्यादी घटनाही एमजेओमुळे घडत असतात. एमजेओच्या प्रणालीच्या हालचालींत नुकताच बदल नोंदविला जात आहे. मागील दोन दिवसांतील निरीक्षणातून एमजेओ प्रणाली साधारण २४ ते ३० सप्टेंबर दरम्यान फेज २ मध्ये येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. म्हणजेच एमजेओ अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात प्रवेश करण्याची शक्यता आहे. सध्या एमजेओच्या दोलनाची कक्षा म्हणजे ‘आम्प्लिट्युड’ एक आहे. त्यामुळे सध्या बंगालच्या उपसागरात आकार घेत असलेल्या बळकट कमी दाब क्षेत्र प्रणालीला मदत मिळू शकते आणि सप्टेंबरच्या शेवटी महाराष्ट्रात आधी सांगितल्याप्रमाणे पावसाची शक्यता निर्माण झालेली आहे. तसेच एमजेओमुळे ऑक्टोबरच्या पहिल्या पंधरवड्यातील पावसालाही मदत होऊ शकते. एमजेओच्या वाटचालीत नेमके माॅन्सूनच्या परतीच्या कालावधीत बदल घडत आहेत, ही जमेची बाजू आहे.
माॅन्सूनचा परतीचा प्रवास उशिराने सुरू होत आहे. मग राज्यातून जाण्यासही उशीर होईल का?
- माॅन्सूनचा परतीचा प्रवास सुरू होण्याची सरासरी तारीख १७ सप्टेंबर आहे. तर राज्यातून सरासरी १० ऑक्टोबरपर्यंत माॅन्सून परतलेला असतो. परंतु यंदा माॅन्सूनचा परतीचा प्रवास दोन दिवस उशिराने सुरू होत आहे. माॅन्सून १९ सप्टेंबरपासून पश्चिम राजस्थानातून परतण्याची शक्यता निर्माण झाली आहे. परतीचा प्रवास उशिराने सुरू झाला म्हणून राज्यातून परतण्यालाही उशीर होईल, असे म्हणता येणार नाही. त्या वेळच्या वातावरणीय घडामोडीनुसार परतीच्या तारखाही बदलत असतात.
‘आयओडी’ची सध्या अवस्था काय आहे?
काही जागतिक हवामान संस्था मागील चार महिन्यांपासून ‘आयओडी’ धन होईल, असे सांगत होत्या. पण हवामान विभागाने सुरुवातीपासूनच आयओडी धन होणार नाही, तटस्थ राहील, असे म्हटले आहे. म्हणजेच अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागराचे तापमान समान राहील. त्यात कोणताही बदल होणार नाही. झालेही तसेच. माॅन्सूनच्या सरुवातीपासूनच आयओडी तटस्थ आहे आणि सप्टेंबर महिन्यातही तटस्थच राहणार आहे. आयओडी तटस्थ असल्यामुळेच तर सप्टेंबरच्या आणि परतीच्या पावसाची ही अवस्था आहे. यंदा पावसाला आयओडीची मदत झाली नाही. माॅन्सून परतल्यानंतर आयओडी धन झाला तरी त्याचा फायदा होणार नाही.
मागील आठवड्यात काही माॅडेल्सच्या आधारावर जोरदार पावसाची चर्चा सुरू होती. पण पाऊस झाला नाही. नेमके काय घडले?
आजकाल अनेक जण विविध मॉडेल्स बघून पावसाचा अंदाज सांगू लागले आहेत. मागील आठवड्यातील पावसाच्या अंदाजाविषयी देखील तेच झाले. पण केवळ माॅडेल्स दर्शवितात म्हणून पाऊस पडेलच असे नाही. माॅडेल्स ज्या प्रणालीच्या आधारे पावसाचा अंदाज देत आहेत, त्या प्रणालीला वातावरणीय घडामोडींची साथही तेवढीच महत्त्वाची आहे. जुलै महिन्याच्या शेवटी कमी दाब क्षेत्र प्रणालीमुळे चांगला पाऊस झाला होता. आताही माॅडेल्स तशीच प्रणाली दाखवत आहेत. त्यामुळे तेव्हा घडले तसेच आताही घडेल आणि जोरदार पाऊस पडेल, असा अंदाज लावून जोरदार पाऊस होईल असा कोलाहल करण्यात आला. केवळ माॅडेल बघून जोरदार पाऊस आणि नदी, नाले भरून वाहतील, पूर येईल असे चर्चा सुरू केली. पण त्यामुळे शेतकऱ्यांच्या अशा पल्लवीत झाल्या होत्या. कारण पावसाची नितांत गरज होती. पण सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे एखादे माॅडेल पाऊस सांगत असले तरी पाऊस पडण्यापूर्वीच्या पाच किंवा आठ दिवस आधी काय वातावरण आहे? घडणाऱ्या घडामोडी त्या प्रणालीतून पाऊस देण्यासाठी पोषक आहेत का, हे देखील पाहावे लागते. उदा. जुलैमध्ये तयार झालेल्या प्रणालीची उंची ९.४ किलोमीटर होती. त्याचा हवेचा दाब हा सर्वांत कमी होता आणि त्याच्या भोवताली जे गोलाकार हवेच्या दाबावाच्या रेषा होत्या त्याला ‘आयसोबार’ म्हणतात. त्यातील अंतर फार कमी होते. म्हणजेच हवेच्या दबावातील फरकाचे प्रमाण जास्त होते. विशेष म्हणजे ही प्रणाली हळूहळू पुढे सरकत गेली. पुढे सरकण्याला अडथळा होता. म्हणून वेग कमी होता. त्यामुळे महाराष्ट्रात आणि मध्य प्रदेशात या प्रणालीमुळे चांगला पाऊस झाला. पण मागील आठवड्यात तयार झालेल्या प्रणालीची उंची फक्त ७.६ किलोमीटर होती. हवेचा दाब तुलनेत अधिक होता. तसेच या प्रणालीला पुढे सरकण्यासाठी कुठलाही अडथळा नव्हता. त्यामुळे ही प्रणाली वेगाने पुढे निघून गेली. महाराष्ट्रात या प्रणालीमुळे चांगला पाऊस मिळाला नाही. त्याचे कारण म्हणजे माॅडेल्सप्रमाणे प्रणाली तयार झाल्या, पण वातावरणीय घडामोडी तशाच घडल्या नाहीत. मागील आठवड्यात वातावरणीय घडामोडी प्रणालीमधून पाऊस पडण्यास पोषक नव्हत्या. पण केवळ माॅडेल्स बघून अंदाज देणाऱ्यांना हे लक्षात आले नाही, कारण त्याचा अभ्यास असावा लागतो. शेतकऱ्यांना विनंती आहे, की केवळ प्रणाली बघून पावसाच्या अंदाजावर आपले नियोजन करू नका.
—----------------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.