महाप्रसादाने महोत्सवाची उत्साहात सांगता (व्हिडिओ)

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 28 डिसेंबर 2018

पिंपरी - श्री मोरया गोसावी समाधी महोत्सवाची गुरुवारी (ता. २७) विविध धार्मिक कार्यक्रम आणि महाप्रसादाने सांगता झाली. चिंचवडगाव येथील देऊळमळा प्रांगणात सुमारे ६० हजार भाविकांनी या वेळी महाप्रसादाचा लाभ घेतला; तसेच समाधी मंदिरात भाविकांची दर्शनासाठी रीघ लागली होती.

पिंपरी - श्री मोरया गोसावी समाधी महोत्सवाची गुरुवारी (ता. २७) विविध धार्मिक कार्यक्रम आणि महाप्रसादाने सांगता झाली. चिंचवडगाव येथील देऊळमळा प्रांगणात सुमारे ६० हजार भाविकांनी या वेळी महाप्रसादाचा लाभ घेतला; तसेच समाधी मंदिरात भाविकांची दर्शनासाठी रीघ लागली होती.

चिंचवड देवस्थान ट्रस्ट, महापालिका व चिंचवड ग्रामस्थांच्या वतीने या महोत्सवाचे आयोजन केले होते. गुरुवारी सकाळी ट्रस्टचे मुख्य विश्‍वस्त मंदार महाराज देव व चिंचवड ब्रह्मवृंद यांच्या हस्ते मोरया गोसावी समाधीची महापूजा व अभिषेक करण्यात आला. वारकऱ्यांच्या दिंडीने मंदिराला प्रदक्षिणा घातली. हेक्‍झाकॉप्टरमधून मंदिराच्या कळसावर पुष्पवृष्टी करण्यात आली. या प्रसंगी ट्रस्टचे विश्‍वस्त विश्राम देव, आनंद तांबे, ॲड. राजेंद्र उमाप, विनोद पवार आदी उपस्थित होते. 

श्री मोरया गोसावी चरित्र पठणाच्या कार्यक्रमात भाविकांनी उत्साहाने सहभाग घेतला. कीर्तनकार प्रमोद महाराज जगताप यांचे काल्याचे कीर्तन झाले. दुपारपासून सायंकाळपर्यंत भाविकांसाठी महाप्रसादाची व्यवस्था केली होती. त्यासाठी नगरसेवक मोरेश्‍वर भोंडवे यांनी विशेष सहकार्य केले.   

मोरया गोसावी समाधीसमोर धुपारती झाली. वर्षभरातून एकदाच ही धुपारती होते. मंदार महाराज देव यांच्या हस्ते पंचारती करण्यात आली. त्यानंतर मंगलमूर्ती वाडा येथे आरती होऊन महोत्सवाची सांगता झाली.

लहानपणापासून सावरकरांमध्ये स्वातंत्र्याचे बीज - शरद पोंक्षे
‘‘स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे संपूर्ण जीवन आणि विचार राष्ट्रभक्तीने ओतप्रोत भरलेले होते. देशसेवा हाच त्यांच्या जीवनाचा ध्यास होता. लहानपणापासूनच त्यांच्यात संपूर्ण स्वातंत्र्याचे बीज पेरले गेले होते. त्यांनी जातीपातीच्या पलीकडे जाऊन राष्ट्रीय हिंदुत्वाचा पुरस्कार केला,’’ असे मत अभिनेते शरद पोंक्षे यांनी बुधवारी (ता. २६) चिंचवड येथे व्यक्त केले.

‘स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर’ विषयावर बोलताना पोंक्षे म्हणाले, ‘‘स्वातंत्र्यवीर सावरकर हे देशसेवेच्या ध्यासाने झपाटले होते. मात्र, काही लोकांनी जाणीवपूर्वक त्यांना एका विशिष्ट साचामध्ये बांधून ठेवले. त्यामुळे त्यांचे विचार सर्वांपर्यंत पोचविण्यात अडथळे आले. धर्माबद्दलची कट्टरता नको, कट्टरता राष्ट्रभक्तीची असायला हवी. ’’ 

बासरीच्या सुरांनी रसिक भारावले
महोत्सवात बुधवारी रात्री बासरीवादक राकेश चौरसिया यांच्या बासरीतून उमटणाऱ्या सुरांनी चिंचवड येथील रसिक भारावले. थंडीतही चौरसिया यांचे बासरीवादन ऐकण्यासाठी मोठ्या संख्येने रसिक उपस्थित होते. त्यांच्या बासरीने अवघे वातावरण सूरमयी झाले. तबलावादक पंडित विजय घाटे आणि पखवाजवादक पंडित भवानी शंकर यांनी त्यांना सुरेल साथसंगत केली.

‘सद्‌गुरूंच्या कृपेचा पुरस्कार’
‘‘निराधार मुले व वृद्धांसाठी केलेल्या कामाबद्दल मिळालेला पुरस्कार हा सद्‌गुरूंच्या कृपेचा, आशीर्वादाचा पुरस्कार आहे. हा पुरस्कार स्वीकारताना मला खूप आनंद होत आहे. माझ्या कार्यात समाजाचा खूप मोठा हातभार आहे. सरकारची मदत न घेता समाजाकडून मिळालेल्या भरघोस अर्थसाह्यामुळेच मला निराधारांची सेवा करण्याची संधी मिळाली आहे,’’ असे मत सामाजिक कार्यकर्ते विजय फळणीकर यांनी व्यक्त केले.   

या महोत्सवात फळणीकर यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रांत कार्यवाह डॉ. प्रवीण दबडघाव यांच्या हस्ते मोरया जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित केले. त्या प्रसंगी पुरस्काराला उत्तर देताना फळणीकर बोलत होते. महापौर राहुल जाधव, चिंचवड देवस्थान ट्रस्टचे मुख्य विश्‍वस्त मंदार महाराज देव, नगरसेवक सुरेश भोईर, नगरसेविका अश्‍विनी चिंचवडे, स्वीकृत सदस्य ॲड. मोरेश्‍वर शेडगे, शिक्षण मंडळाचे माजी सदस्य गजानन चिंचवडे, चिंचवड देवस्थानचे विश्‍वस्त विश्राम देव, ॲड. राजेंद्र उमाप, विनोद पवार, आनंद तांबे आदी उपस्थित होते. वेदमूर्ती माधव परांजपे, गिरिजा लांडगे, रमाकांत पवार, प्रा. राजकुमार कदम, अशोक देशमाने, ओमप्रकाश पेठे, सुनील तापकीर, किसन चौधरी, गायक अक्षय घाणेकर, चलसानी वेंकटसाई, श्रीकांत देव तसेच संस्कृती युवा प्रतिष्ठान या संस्थेला मोरया पुरस्कार देऊन गौरविले. गुणवंत कामगार पुरस्काराने चंद्रशेखर बोरकर यांना सन्मानित केले.  

दबडघाव म्हणाले, ‘‘शहराचे औद्योगिकीकरण झाले असतानाही आध्यात्मिक महत्त्व टिकून आहे. देशात अनेक ठिकाणी धर्मांतर होत आहे. अशा परिस्थितीत धर्माचे जागरण करण्याची गरज आहे. देश परमवैभवाला कसा पोचेल, यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. कुटुंबपद्धती टिकविण्याची गरज आहे.’’

जाधव म्हणाले, ‘‘मोरया गोसावी संजीवन समाधी महोत्सवाच्या परंपरेला कधीही खीळ बसणार नाही. त्यासाठी आवश्‍यक सहकार्य महापालिकेकडून केले जाईल. जयंती, पुण्यतिथी आदी कार्यक्रमांसाठी खर्च करण्यासंदर्भात न्यायालयाच्या असलेल्या आदेशाला धक्का न लावता त्याबाबत मार्ग काढला जाईल. शहरवासीयांमुळे सध्या शहर स्मार्ट सिटीकडे वाटचाल करीत आहे.’’


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Moray Gosavi Samadhi Mahotsav