माल वाहतूकदारांचा आरटीओवर मोर्चा

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 22 जुलै 2018

महाराष्ट्र राज्य वाहनचालक, मालक प्रतिनिधी महासंघ, पिंपरी-चिंचवड विद्यार्थी वाहतूक संघातर्फे कात्रज-देहू रस्त्यावर वाकड येथे धरणे आंदोलन करण्यात आले. 

पुणे : दूध उत्पादकांपाठोपाठ माल वाहतूकदारांनी केलेल्या चक्का जाम आंदोलनात पुण्यातील व्यावसायिक सहभागी झाले असून, आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी (शनिवारी) विविध संघटनांनी प्रादेशिक परिवहन कार्यालयावर मोर्चा काढला. 

विविध प्रलंबित मागण्यांसाठी माल वाहतूकदारांनी शुक्रवारपासून देशव्यापी बेमुदत चक्का जाम आंदोलन सुरू केले आहे. आंदोलनाच्या पहिल्या दिवशी शालेय विद्यार्थी वाहतूक करणाऱ्यांनी लाक्षणिक सहभाग घेतला होता. मागण्या मान्य न झाल्यास पुढील काळात आंदोलन अधिक तीव्र करून विद्यार्थी वाहतूक बंद करण्याचा इशारा संघटनांनी दिला आहे.

आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी पुण्यातील वाहतूकदारांच्या विविध संघटनांनी आरटीओ कार्यालयावर मोर्चा काढला. कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. महासंघाचे अध्यक्ष बाबा शिंदे, प्रकाश जगताप, विक्रांत विगरुळकर, बापू भावे, इक्‍बाल सय्यद आदींचा समावेश असलेल्या शिष्टमंडळाने प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन दिले. 

महाराष्ट्र राज्य वाहनचालक, मालक प्रतिनिधी महासंघ, पिंपरी-चिंचवड विद्यार्थी वाहतूक संघातर्फे कात्रज-देहू रस्त्यावर वाकड येथे धरणे आंदोलन करण्यात आले. 

बाजारावर अद्याप परिणाम नाही 

माल वाहतूकदारांच्या संपाचा परिणाम पुण्यातील भाजीपाला बाजार आणि किराणा भुसार मालाच्या बाजारावर पडला नसला तरी, पुढील आठवड्यात किराणा भुसार मालाच्या बाजारातील आवकेवर परिणाम होऊ शकतो. भाजीपाला माल वाहतूक थांबली तर भाजीपाल्याच्या उपलब्धतेचा प्रश्‍न निर्माण होऊ शकतो. 

Web Title: Morcha on RTO of freight transporters