केंद्र सरकारने श्रमिक स्पेशल ट्रेन सुरू केली खरी पण...

Shramik Special Trains
Shramik Special Trains

पुणे - देशात विविध ठिकाणी अडकलेल्या स्थलांतरित मजूर, कामगारांना गावी परतण्यासाठी केंद्र सरकारने श्रमिक स्पेशल ट्रेन सुरू केली खरी, परंतु, त्याचा फटका मेट्रोच्या पुणे आणि पिंपरीतील प्रकल्पांना बसला आहे. या ट्रेनमुळे मेट्रोचे सुमारे ५० टक्क्यांहून अधिक मजूर गावी निघून गेले आहेत. 

विशेष म्हणजे मेट्रोने त्यांना सुमारे ४५ दिवस सांभाळले होते. कोरोना लॉकडाउनमुळे मेट्रोचे काम २५ मार्चपासून बंद होते. पुणे आणि पिंपरीतील मेट्रो मार्गांसाठी सुमारे २८०० मजूर मेट्रोकडे होते. उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल, झारखंड आदी ठिकाणांहून हे मजूर आलेले होते. लॉकडाउनच्या काळात मेट्रोच्या १० लेबर कॅंपमधील मजुरांना महामेट्रोने धान्यासह जीवनावश्यक वस्तू पुरविल्या होत्या. त्यामुळे मजूर थांबलेले होते. तसेच काम बंद असले तरी, त्यांना मजुरीही देण्यात येत होती. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

केंद्र सरकारने सुमारे १२ दिवसांपूर्वी, मजुरांसाठी श्रमिक स्पेशल रेल्वेगाड्या सुरू केल्या. त्यानंतर मजुरांमध्ये चुळबूळ सुरू झाली. त्यांनी गावी जाण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आठ दिवसांत महामेट्रोच्या लेबर कॅंपमधून सुमारे १५०० कामगार निघून गेले. सध्या महामेट्रोकडे १२८७ कामगार आहेत. गावी गेलेल्या कामगारांमध्ये कुशल आणि अकुशल कामगारांचा समावेश आहे. मेट्रो प्रकल्पासाठी परराज्यातील लेबर कॉन्ट्रॅक्टरकडून मजूर पुरविले जातात. येताना त्यांच्यामार्फत आलेले मजूर जाताना स्वतंत्रपणे निघून गेल्याचेही निरीक्षण महामेट्रोच्या अधिकाऱ्यांनी नोंदविले. 

नदीपात्रात सात जूनपर्यंतच काम 
महामेट्रोचे दोन्ही शहरांतील काम २५ मार्चपासून ३० एप्रिलपर्यंत बंद होते. मेट्रो प्रकल्पासाठी मुठा नदीपात्रात गरवारे महाविद्यालय ते शिवाजीनगर न्यायालय दरम्यान, मुळा- मुठा संगमाजवळ बंडगार्डन पुलाजवळ आणि बोपोडीमध्ये काम करायचे आहे. पाऊस सुरू झाल्यावर नदीपात्रात काम करण्यास जलसंपदा विभागाकडून बंदी घालण्यात येते. त्यामुळे ३० एप्रिल ते ७ जून दरम्यान नदीपात्रात काम करण्यास जलसंपदा विभागाने महामेट्रोला परवानगी दिली आहे. त्यानुसार तेथे काम सुरू करण्यात आले आहे. परंतु, महामेट्रोला आता अन्यत्र काम करण्यासही गेल्या आठवड्यात परवानगी मिळाली आहे. त्यामुळे आता काम जोरात सुरू झाले मात्र, मनुष्यबळाची टंचाई महामेट्रोला भासू लागली आहे. 

मेट्रो प्रकल्प लांबणार  
मेट्रोचा प्रकल्प पुढील तीन वर्षांत पूर्ण करण्याचे महामेट्रोचे नियोजन आहे. लॉकडाउनमुळे सलग ३५ दिवस काम झालेले नाही. तसेच नंतरचे १५ दिवसही मर्यादीत काम झाले आहे. पुढील काळातही मेट्रोला मजुरांची उपलब्धता कशी होईल, यावर प्रकल्पाचा वेग अवलंबून असेल. परिणामी मेट्रो प्रकल्पाचा कालावधी लांबणार आहे. परंतु, तो किती असेल, हे काही दिवसांतील घडामोडींवर अवलंबून असेल. 

पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील महामेट्रोचे काम सुरळीतपणे सुरू आहे. मजुरांची संख्या कमी झाल्यामुळे काही मर्यादा आल्या आहेत. परंतु, त्यावर मार्ग काढण्यात येत आहे. मेट्रोचे काम मजुरांअभावी बंद पडलेले नाही. मजुरांना परत आणण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. त्याला लवकरच यश येईल, अशी अपेक्षा आहे. 
हेमंत सोनवणे, महाव्यवस्थापक, महामेट्रो. 

- वनाज- रामवाडी ः १६ किलोमीटर 
- पिंपरी चिंचवड - स्वारगेट ः १५.५ किलोमीटर 

पहिल्या टप्प्यात मेट्रो धावणार 
- वनाज ते गरवारे महाविद्यालय - ५.७ किलोमीटर 
- पिंपरी चिंचवड ते संत तुकारामनगर - ५.५ किलोमीटर 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com