‘कोरोना’त पेलले इंग्रजीचे शिवधनुष्य; शहरातील सत्तरपेक्षा अधिक महिला लाभार्थी

जितेंद्र मैड
Saturday, 16 January 2021

गेली सहा वर्षे ग्यानरुची महिलांच्या सक्षमीकरणाचे काम करत असून,पुण्यातील १९ वस्त्यांमध्ये गृह ग्रंथालय व सक्षमीकरण केंद्र चालवले जाते.लॉकडाउन काळात कामे बंद झाल्यामुळे महिला डिप्रेशनमध्ये आल्या होत्या

कोथरूड - कोरोना लॉकडाउनच्या काळात एकीकडे शिक्षण संस्थांसह कामधंद्यालाही टाळे लागले असताना वस्तीमधील कष्टकरी महिला इंग्रजी शिक्षणाचे धडे देण्याची किमया ग्यानरुची संस्थेने साधली. पुणे शहरातील सत्तरहून अधिक महिला ऑनलाइन पद्धतीने इंग्रजी लिहिणे, वाचणे, बोलणे शिकत आहेत.

गेली सहा वर्षे ग्यानरुची महिलांच्या सक्षमीकरणाचे काम करत असून, पुण्यातील १९ वस्त्यांमध्ये गृह ग्रंथालय व सक्षमीकरण केंद्र चालवले जाते. लॉकडाउन काळात कामे बंद झाल्यामुळे महिला डिप्रेशनमध्ये आल्या होत्या. त्यांना सावरण्यासाठी मानसिक आधाराची गरज होती. ग्यानरुचीच्या महिलांना भेडसावणा-या समस्येबाबत त्यांच्याशी फक्त फोनवर संपर्क साधून भागणार नव्हते. त्यासाठी त्यांचे मन सकारात्मक बाबीत गुंतवणे आवश्‍यक वाटले. यातून ऑनलाइन शिक्षण देण्याचा विचार पुढे आला. महिलांना गुगल मीट, झूम वापरण्याची सवय व्हावी म्हणून प्रथम गाण्याच्या भेंड्या, लोकगीते, खाणाखजाना यांसारखे महिलांचे आवडते उपक्रम ऑनलाइन घेण्यात आले.

धनंजय मुंडे Genuine माणूस, पक्ष योग्य निर्णय घेईल : रोहित पवार

प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉ. आशिष तावकर, हमजोली संस्थेच्या सानिया सीद्दीकी, डॉ. रीना गौतम, डॉ. हेमांगी पाटसकर, लायन सरिता सोनावळे यासारख्या तज्ज्ञांनी महिलांशी ऑनलाइन संवाद साधत त्यांना ताणतणावातून बाहेर काढत बोलते करण्याचा प्रयत्न केला.

पुण्याच्या दक्षिण भागाला आता दररोज पाणीपुरवठा 

ग्यानरुचीच्या वस्तीमधील असंख्य महिलांकडे स्मार्ट फोन नव्हता व तो कसा वापरायचा हेसुद्धा माहीत नव्हते. पुरुष मंडळीच मुख्यतः स्मार्ट फोन वापरत होते. मुलांचे शिक्षण ऑनलाइन सुरू झाल्यामुळे घरामध्ये जुना का होईना पण स्मार्टफोन आला. तो कसा वापरायचा याचे शिक्षण महिलांनी जवळच्या मैत्रिणी व मुलांच्याकडून घेतले. इंटरनेटची रेंज कमी असणे व नेट संपणे यासारख्या समस्यांना तोंड देत सहाशे पैकी ११२ महिलांनी इंग्रजी शिक्षण घेण्याची इच्छा व्यक्त केली. घरात मुलांचे ऑनलाइन शिक्षण सुरू असल्यामुळे यातील काही महिलांना शैक्षणिक उपक्रमात सहभागी होणे जमत नाही. पुन्हा कामे सुरू झाल्यामुळे काही महिलांना क्‍लास अर्ध्यावरच सोडावा लागला. तरीसुद्धा ७८ महिला इंग्रजी शिक्षणाचे धडे घेत आहेत. 

हेही वाचा - ...आता मेट्रो स्टेशनजवळील बांधकामांचा मार्ग झाला मोकळा

इंग्रजीबद्दलची महिलांची जाण व समज लक्षात घेऊन या महिलांचे तीन गट करण्यात आले. सुनंदा लुथ्रा, निलोफर टायरवाला, रुखसाना जमादार या महिलांना इंग्रजी शिकवत आहेत.

काम बंद झाल्यामुळे महिला तणावाखाली होत्या. लॉकडाउनचे आव्हान पेलण्याचे बळ त्यांच्या आंतरिक ऊर्जेतूनच त्यांना मिळावे, यासाठी आम्ही प्रयत्न केले. महिलांना स्वतःमधील सुप्त शक्तीची जाणीव झाली, तर त्यांची प्रगती कोणी रोखू शकत नाही, याचा अनुभव आम्ही घेत आहोत. 
- नसीमा मर्चंट,  संस्थापक, ग्यानरुची

महिलांच्या प्रतिक्रिया
मंगल फाले, गणेशनगर -
मोबाईल शिक्षणाची गंमत अशी की इथे कोणी छडी मारणारे नाही. चुकले तरी मी क्‍लासमध्ये इंग्रजी बोलण्याचा प्रयत्न करते. व्हॉटसअपवर गृहपाठ पाठवते. मॅडम व्यवस्थित समजावून सांगतात. माझी लहान मुलेपण ‘आई काय शिकतेय’ हे पाहत असतात.

नीलिमा भोसले, किष्किंधानगर - आमच्या वस्तीतील नऊ महिला इंग्रजी शिकत आहोत. आमच्याकडे इंटरनेटचा वेग कमी आहे. मुलांच्या शिक्षणामुळे नेट संपते. त्यामुळे आम्ही आमच्यातील एका महिलेचा मोबाईल घेऊन त्यावर इंग्रजी शिकतो.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: More than seventy women in Pune are learning to write and speak English online