esakal | पुणे विद्यापीठाची प्रयोगशाळा अजूनही ‘निगेटिव्ह

बोलून बातमी शोधा

Pune-University
पुणे विद्यापीठाची प्रयोगशाळा अजूनही ‘निगेटिव्ह’
sakal_logo
By
​ ब्रिजमोहन पाटील

पुणे : कोरोनाच्या पहिल्या लाटेतच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात कोविड निदानासाठी प्रयोगशाळा उभारण्याचा निर्णय झाला. त्यानंतर आता दुसऱ्या लाटेचा हाहाकार माजला असतानाअजूनही प्रयोगशाळेत एकही चाचणी झाली नाही. विद्यापीठाकडून सर्व तयारी झाल्याचे सांगण्यात येत असले, तरीही प्रयोगशाळेला कोरोना निदानासाठी अजून अंतिम मान्यता मिळाली नाही.

गेल्यावर्षी मार्च महिन्यात राज्यात कोरोनाची साथ सुरू झाली. त्यावेळी केवळ राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेमध्ये (एनआयव्ही) कोरोना नमुन्यांची चाचणी होत होती. राज्यात चाचणी करणारी ही एकमेव संस्था असल्याने येथे ताण निर्माण झाला होता. त्यानंतर पुण्यामध्ये ससून रुग्णालय आणि आयसर या संस्थेमध्ये कोरोना चाचणी करण्यास परवानगी देण्यात आली. तसेच खासगी प्रयोगशाळांनाही परवानगी मिळाली. त्याचवेळी राज्यातील विद्यापीठांमध्ये कोरोनासह विविध साथरोगांच्या नमुन्यांची चाचणी व्हावी, त्यावर संशोधन व्हावे यासाठी राज्यपातळीवर चर्चा सुरू झाली. त्यासाठी पुणे विद्यापीठाने तयारी देखील दर्शविली होती. त्यानंतर राज्य सरकारने विद्यापीठाला प्रयोगशाळा सुरू करण्यासाठी परवानगीही दिली होती.

हेही वाचा: परराज्यातून रेल्वेने महाराष्ट्रात येताय? मग, १५ दिवस 'होम आयसोलेशन'मध्ये राहा

विद्यापीठात सध्या असलेल्या प्रयोगशाळा या साथ रोगांचे निदान व संशोधन करण्याच्या क्षमतेच्या नाहीत. त्यासाठी बायोलॉजिकल सेफ्टी लेव्हल तीन (बीएसएल) या स्तरावरील आण्विक निनाद आणि संशोधन केंद्र (सेंटर फॉर मॉलीक्युलर डायग्नॉस्टिक अँड रिसर्च) उभारण्यात आले. या प्रयोगशाळेसाठी सुमारे दीड कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला. फेब्रुवारी महिन्यात या प्रयोगशाळेचे उद्घाटन देखील झाले.

शहरात सध्या कोरोनाची दुसरी लाट आली आहे. आरटीपीसआर चाचण्यांचा अहवाल प्राप्त होण्यासाठी दोन ते तीन दिवसांचा कालावधी लागत आहे. तसेच शहरात रोज २० हजारांपेक्षा जास्त नमुने घेतले जात असल्याने त्याचा ताण अन्य प्रयोगशाळांवर येत आहे. विद्यापीठाच्या प्रयोगशाळेत रोज ४०० ते ५०० चाचण्यांची क्षमता आहे; पण अद्याप अंतिम मान्यता मिळाली नसल्याने या ठिकाणी चाचण्या होत नाही. याबाबत कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

हेही वाचा: रेमडेसिव्हिर उपलब्ध केले तर बिघडले कोठे? चंद्रकांत पाटील

विद्यापीठातील पहिलीच प्रयोगशाळा

पुणे विद्यापीठाने उभारलेल्या प्रयोगशाळेला मान्यता मिळाल्यानंतर तेथे कोविड नाही, तर इतर सर्व प्रकारच्या साथ रोगांचे निदान होऊ शकणार आहे. तसेच त्यावर संशोधनही शक्य आहे. याचा विद्यार्थी आणि प्राध्यापकांना फायदा होईल. अशा प्रकारे विद्यापीठात उभारलेली ही एकमेव प्रयोगशाळा असणार आहे.

''विद्यापीठाने उभारलेल्या प्रयोगशाळेत यंत्रसामग्री, मनुष्यबळ याची सर्व तयारी झाली आहे, पण काही परवानगी मिळाल्या नसल्याने तेथील चाचणीचे काम अद्याप सुरू झाले नाही. पुढील १० ते १५ दिवसांत परवानगी येण्याची शक्यता आहे.''

-डॉ. एन. एस. उमराणी, प्र-कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

हेही वाचा: पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी; वीकेंड लॉकडाउनचा चांगला इफेक्ट!