Vidhan Sabha 2019: पुणे जिल्ह्यात तुलनेत जास्त मतदान 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 23 ऑक्टोबर 2019

शहरी भागात मतदानाची पन्नाशीही पार पडत नसताना जिल्ह्यात मात्र सरासरी 67 टक्‍क्‍यांहून अधिक मतदान झाले. चुरशीच्या लढतींमुळेच जिल्ह्यातील मतदानाची टक्केवारी जास्त असल्याचे आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे.

विधानसभा 2019 :

पुणे - शहरी भागात मतदानाची पन्नाशीही पार पडत नसताना जिल्ह्यात मात्र सरासरी 67 टक्‍क्‍यांहून अधिक मतदान झाले. चुरशीच्या लढतींमुळेच जिल्ह्यातील मतदानाची टक्केवारी जास्त असल्याचे आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे. इंदापूरमध्ये 75, तर मावळमध्ये 71.16 टक्के मतदान झाले. त्याचा फायदा कोणत्या उमेदवाराला होईल, याबद्दल राजकीय वर्तुळात तर्कवितर्क व्यक्‍त होत आहेत. इंदापूरमध्ये सर्वाधिक, तर भोरमध्ये कमी मतदान झाले आहे. 

इंदापूरमध्ये आमदार दत्तात्रेय भरणे यांच्यासमोर भाजपचे हर्षवर्धन पाटील यांचे आव्हान आहे. दोन्ही बाजूने दणकून प्रचार झाला. त्यामुळे मतदानाचे प्रमाण तुलनेत वाढले आहे. मात्र, गेल्या विधासनभा निवडणुकीत येथे उच्चांकी 78.74 टक्के मतदान झाले होते. यंदा हे प्रमाण ओलांडता आलेले नाही. मावळमध्येही भाजपचे राज्यमंत्री बाळा भेगडे आणि राष्ट्रवादीचे सुनील शेळके यांच्यात चुरशीची लढत असल्यामुळे तेथेही 71.16 टक्के मतदान झाले. गेल्या वेळी 71. 11 टक्के मतदान झाले होते. 

दौंड आणि जुन्नरमध्येही यंदा मतदान कमी झाले. मात्र, दौंडमध्ये भाजपचे राहुल कुल आणि राष्ट्रवादीचे रमेश थोरात यांच्यात पारंपरिक लढत आहे. जुन्नरमध्ये शिवसेनेचे शरद सोनवणे, राष्ट्रवादीचे अतुल बेनके आणि शिवसेनेतील पूर्वाश्रमीच्या कार्यकर्त्या आणि सध्या अपक्ष असलेल्या आशा बुचके यांच्यातील लढत चुरशीची झाली. मतविभागणीवर या लढतीचा निकाल अवलंबून असेल. तर, बारामतीमध्ये राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यासमोर भाजपचे गोपीचंद पडळकर कशी लढत देतात, याबद्दल औत्सुक्‍य आहे. खेड-आळंदी, शिरूर, आंबेगाव, पुरंदर, भोरमध्येही चुरस आहे. 

पिंपरी, भोसरी, चिंचवडला चुरशीच्या लढती 
चिंचवडमध्ये भाजपचे लक्ष्मण जगताप आणि राष्ट्रवादीपुरस्कृत राहुल कलाटे, भोसरीमध्ये भाजपचे महेश लांडगे आणि राष्ट्रवादीपुरस्कृत विलास लांडे; तर पिंपरीत भाजपचे गौतम चाबुकस्वार आणि राष्ट्रवादीचे अण्णा बनसोडे यांच्यातील लढत चुरशीची ठरणार आहे. या तिन्ही मतदारसंघांत 50 ते 58 टक्‍क्‍यांपर्यंत मतदान झाले. 

मतदानाची अंतिम टक्केवारी 
1- इंदापूर - 75.92 
2- मावळ - 71.16 
3- दौंड - 68.70 
4- बारामती - 68.38 
5- जुन्नर - 67.33 
6- खेड-आळंदी - 67.27 
7- शिरूर - 67.21 
8- आंबेगाव - 66.77 
9- पुरंदर - 65.56 
10- भोर - 62.93 
11- भोसरी - 58.65 
12 - चिंचवड - 53.38 
13 - पिंपरी - 50.17 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: More voting in Pune district than city