esakal | ‘मोझ्याक’चा टोमॅटोला तडाखा
sakal

बोलून बातमी शोधा

tomato

‘मोझ्याक’चा टोमॅटोला तडाखा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

खेड शिवापूर: शिवगंगा खोऱ्यातील भोर तालुक्याच्या पट्ट्यातील टोमॅटो पिकावर ‘मोझ्याक’ या विषाणूचा प्रादुर्भाव झाला असून, या भागातील पिकाचे मोठे क्षेत्र संक्रमित झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानाला सामोरे जावे लागत आहे. या विषाणूचा प्रादुर्भाव वेळीच नियंत्रणात आला; तर नवीन टोमॅटोचे पीक वाचवता येईल, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

हेही वाचा: अधिकाऱ्यासह दोघेजण 8 हजाराची लाच घेताना 'एसीबी'च्या जाळ्यात

या भागातील कळवडे, साळवडे, कांजळे, खोपी, शिवरे, वरवे या गावात टोमॅटो पिकाचे उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे. या भागात दरवर्षी ऑगस्ट महिन्यातील हंगामात टोमॅटोचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. नसरापूर विभागात या वर्षी सुमारे ७० हेकटर क्षेत्रावर टोमॅटो पिकाची लागवड झाली आहे. मात्र, यावर्षी टोमॅटो पिकावर ‘मोझ्याक’ या विषाणूचा प्रादुर्भाव झाला आहे. या गावांतील अनेक शेतकऱ्यांच्या टोमॅटोच्या पिकावर रोग आला आहे.

टोमॅटोला फळ लागण झाल्यावर या विषाणूचा प्रादुर्भाव होतो. त्यामुळे फळ प्लॅस्टिकसारखे टणक होते किंवा नासून जाते. फळावर चित्र-विचित्र रंगाचे डाग पडतात. तसेच, झाडाची पाने जळून जातात. त्यामुळे हाता-तोंडाला आलेले टोमॅटोचे पीक या विषाणूमुळे असे हातातून जात असल्याने शेतकरी वर्ग हताश झाला आहे. या विषाणूचा प्रादुर्भाव रोखायचा कसा, असा यक्ष प्रश्न येथील टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांसमोर आहे.

हेही वाचा: पुणे : कंपनीचे तीन कोटी ६८ लाख स्वतःच्या खात्यात वळविले

एक एकर क्षेत्रावर टोमॅटो लागवड केली असून, त्यासाठी सुमारे एक लाख रुपये भांडवल गुंतवले आहे. मात्र, यावर्षी आलेल्या मोझ्याक विषाणूमुळे संपूर्ण पीक हातातून जाणार आहे. उत्पादन खर्चही निघणार नाही. त्यामुळे टोमॅटोच्या पिकात या वर्षी मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागणार आहे - दादा पवार, शेतकरी, खोपी (ता. भोर)

मोझ्याक या विषाणूचा प्रादुर्भाव झालेल्या क्षेत्राची गावनिहाय माहिती घेऊन पाहणी करण्यात येईल. तसेच, ताबडतोब त्यावर काय उपाययोजना करायच्या यासंबंधी शेतकऱ्यांना योग्य ते मार्गदर्शन करण्यात येईल. - देवेंद्र ढगे, तालुका कृषी अधिकारी, भोर

loading image
go to top